घरमुंबईसागरी सुरक्षेसाठी दर्याच्या राजावरच अविश्वास

सागरी सुरक्षेसाठी दर्याच्या राजावरच अविश्वास

Subscribe

मच्छिमारांकडून संताप

ठाणे : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई व आसपसच्या सागरी सुरक्षेला खूपच महत्व आले. सागरी मार्गातूनच दहशतवादी मुंबईत आल्याने कडेकोट सागरी सुरक्षेवर लक्ष देण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण 26/11 च्या हल्ल्यापूर्वी बधवार पार्क येथून काही संशयास्पद व्यक्ती सागरीमार्गे मुंबईत आल्याची माहिती देणार्‍या मच्छिमारांनाच सुरक्षेच्या नावाखाली वेठीस धरण्यात येत आहे. मासेमारीसाठी मच्छिमारांना समुद्रात जाण्यापूर्वी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मासेमारी नको पण सुरक्षा व्यवस्थेला आवरा अशी अवस्था मच्छिमारांची झाली आहे. सुरक्षेच्या नावाखाली अविश्वास दाखवण्यात येत असल्याने मच्छिमारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

देशाला ७ हजार ५१६ किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. तर मुंबईला सुमारे ११० किमीचा सागरी किनारा आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेबाबत सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. किनार्‍यावर गस्त घालण्यासाठी व समुद्रातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी माहीम आणि गोराई येथे पोलीस ठाणी सुरू केली आहेत. तर 110 किलोमीटर सागरी किनार्‍यासाठी फक्त १५० पोलिसच तैनात केले आहेत. सुरक्षारक्षक हे महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्याऐवजी लहानसहान ठिकाणी तैनात केले आहेत. भाऊचा धक्का, ससून डॉक येथे दिवसाला 150 ते 200 ट्रॉलर्स येतात. या ठिकाणी पोलीस ठाणी व सुरक्षारक्षक तैनात करण्याऐवजी पोलिसांनी लहान स्वरुपात मासेमारी होणार्‍या माहीम व वरळी येथे पोलीस ठाणी उभारली आहेत. हे सुरक्षारक्षक मासेमारी करणार्‍यांना नियम दाखवत त्रास देत असतात. बोटीवर किती माणसे आहेत, त्यांची माहिती, कोठपर्यंत मासेमारी करणार, अशी एक ना अनेक प्रश्नांची सुरक्षेच्या कारणास्तव उत्तरे द्यावी लागत आहेत. अनेकदा मच्छिमारांच्या घरात कोणाचे निधन झाल्यास तो 11 दिवस घराबाहेर जात नाही, अशावेळी त्याच्या जागी बदली खलाशी नेला जातो. यावेळी तर त्या बदली खलाशाला प्रचंड त्रास दिला जातो, अशी माहिती स्थानिक मच्छिमारांनी दिली. मासेमारीचे परवाने नसलेले हजारो परप्रांतीय ट्रॉलर्स मुंबई व कोकणातील किनार्‍यालगत येऊन मासेमारी करतात. या बोटी कुठून येतात? त्यांच्याकडे परवाने आहे का? याबाबत कधीच गांभीर्याने चौकशी केली जात नाही. परंतु मासेमारी करून पोट भरणार्‍या दर्याच्या राजाला छळणाच्या प्रकारामुळे मच्छिमारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

दहशतवादी हल्ल्यानंतर सहा महिन्यात कोस्ट गार्डने कफ परेड मच्छिमार नगर, माहीम कोळीवाडा, खारदांडा, वर्सोवा आणि मढ सागरी किनार्‍यावर केलेल्या मॉकड्रीलवेळी दहशतवादी कपडे घालून काही जवान किनार्‍यावर उतरले. त्यांना मच्छिमारांनी अडवले असता त्यांनी बोटमालकाला 50 लाख देतो, आम्हाला गेटवर सोडा, असे सांगितले. बोटमालकाने तातडीने नेव्ही व कस्टमला याची माहिती दिली. त्यावेळी मच्छीमार सतर्क असल्याबद्दल कोस्ट गार्डने मच्छिमारांचा सत्कारही केला. पण आता त्याच मच्छिमारांना नियमांचा बडगा दाखवून त्रास देण्यात येत आहे. सुरक्षेसाठी अमलबजावणी करण्यात येत असलेल्या नियमांना आमचा विरोध नाही. पण त्या नियमांकडे बोट दाखवत आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला देण्यात येत असलेला त्रास हा प्रकार लज्जास्पद असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.

त्रिस्तरीय सुरक्षेचा बोजवारा
भारतीय तटरक्षक दलाकडे किनारपट्टयांच्या सुरक्षेचा अधिकार दिला आहे; तर भारतीय नौदलाकडे किनारपट्टी सुरक्षा आणि किनारपट्टी लगतच्या सुरक्षेसह एकूणच सागरी सुरक्षेची जबाबदारी आहे. त्याचबरोबर राज्य सागरी पोलीस, भारतीय तटरक्षक दल आणि नौदल अशा तीन स्तरांवर भारतीय किनारपट्टयांना सुरक्षा पुरवण्यात येते. सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या धर्तीवर सागरी सुरक्षेसाठी स्वतंत्र सशस्त्र पोलिस दलास मान्यता दिली. मात्र तरीही सागरी मार्गाचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -