घरलाईफस्टाईलसाताराची दुर्गा खानावळ

साताराची दुर्गा खानावळ

Subscribe

खानावळ तशी मोठी, पण अस्सल गावरानी आहे. खानावळ परिसरात गेल्यावर अगदी गावात आल्यासारखे वाटते. सासू-सुनांनी ही खानावळ सुरू केली असून येथील सर्व वाडपी या महिला आहेत आणि अतिशय आग्रह करून त्या खाऊ घालतात.

साधारणत: तीन वर्षांपूर्वी एका कामानिमित्त सातार्‍यात गेलो होतो. कुठल्याही नव्या प्रांतात गेलो की, तेथील पदार्थ चाखायचे हा माझा अट्टाहास असतो. सातार्‍यात गेलो तेव्हाही अस्सल सातार्‍यातील म्हणता येईल असे अन्नपदार्थ चाखण्याची माझी इच्छा होती. वर्तमानपत्राच्या कामासाठी गेलो असल्यामुळे स्थानिक वार्ताहराला हाताशी धरले आणि त्याला येथील चांगल्या खानावळीत ने असा आग्रह केला. मग त्याच्यासोबत आमचा मोर्चा वळला तो वठारा स्टेशनवर. तेथील दुर्गा खानावळीत तो मला घेऊन गेला. या दुर्गा खानावळीचा इतिहास फार मोठा आहे. पण तो काही या लेखाचा विषय नाही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी सवडीने लिहिन.

वठारा हे गाव दुष्काळग्रस्त ते सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात येते. सातारा-फलटण रस्त्यावर ही खानावळ आहे. खानावळ तशी मोठी आहे. पण तिला अस्सल गावरान ढंग असल्यामुळे मला ती खूपच आवडली. मुळात शहरासारखे भव्यदिव्य इंटिरियर, चांगले टेबल, खुर्च्या नाहीत. खानावळ परिसरात गेल्यावर अगदी गावात आल्यासारखे वाटले. विमल आणि दुर्गा या सासू-सुना ही खानावळ चालवत होत्या. मुख्य म्हणजे येथील सर्व वाडपी या महिला आहेत आणि अतिशय आग्रह करून त्या खाऊ घालतात. कमी खाल्ले तर अशा काही नजरेने बघतात की आपल्याला इच्छा नसतानाही एक भाकरी खावीच लागते. इतक्या आपुलकीने त्या सर्वजण खाऊ घालतात. या ठिकाणी जेवण करताना बाजरीची भाकरी, घुंट, पिठलं, उसळ, भात, कांदा, लोणचे असा अस्सल सातारी बेत होता. पण मागणी केल्यावर चपाती, तिखट भाजी, सुकी भाजी असेही मिळत होते. पुन्हा जेवणाची चव अशी की ताटातील सर्व संपतेच, पोटही भरते पण मन मात्र भरत नाही. या खानावळीत त्यावेळी दहा महिला मदतनीस होत्या. भाज्या परिसरातील शेतकर्‍यांकडूनच खरेदी केल्या जात असल्यामुळे त्यांचा ताजेपणा जाणवत होता. संपूर्ण जेवण चुलीवरचे होते. त्यामुळे त्यालाही एक खमंग चव होती.

- Advertisement -

या खानावळीत येणार्‍या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे गेल्यावर काही मिनिटे वाट ही पहावीच लागते. पुन्हा येथील जेवण हे खूपच स्वस्त. भात खाताना मी त्यावेळी, तूप असते तर मजा आली असती, असे माझ्या सहकार्‍याशी पुटपुटलो. ती बहुतेक वाडपी महिलेने ऐकले असावे. कारण लगेचच त्या तूप घेऊन आल्या आणि माझ्या भातावर अस्सल गावरान तुपाची धार सोडत्या झाल्या. इतकं आग्रहाने खमंग जेवू घालणारी खानावळ मी क्वचित पाहिली असेन. त्यामुळे कधी सातार्‍याला गेल्यास दुर्गा खानावळीत नक्की जा. आता तर या खानावळीतील मेन्यूमध्येही बदल झाल्याचे ऐकले आहे. पण पुन्हा काही त्याठिकाणी जाण्याचा योग आला नाही. तुम्ही त्या भागात गेलात तर या खानावळीतील जेवणाचा आस्वाद नक्की घ्या.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -