घरमुंबईभाईंदरमध्ये खोदकामामुळे वाहतुकीचा खोळंबा

भाईंदरमध्ये खोदकामामुळे वाहतुकीचा खोळंबा

Subscribe

मीरा भाईंदर शहरात महापालिका, अदानी पॉवर, महानगर गॅस यांच्याकडून केबल वाहिन्या टाकण्यासाठी शहरातील अनेक भागातील मुख्य रस्ते खोदले आहेत. मातीचा ढिगारा रस्त्यावरच टाकून दिला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत असून धुळीच्या त्रासाने शहरवासीय त्रस्त झाले आहेत.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्ग, पुनम गार्डन रोड ते जीसीसी हॉटेल रोड, मांडली तलाव रोड, दिपक हॉस्पिटल रोड जवळील अशा विविध प्रमुख रस्त्यावर सध्या महापालिकेकडून जलवाहिनी टाकण्याच्या कामासह अदानी पॉवर, महानगर गॅसकडून केबल वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठाले खड्डे ठिकठिकाणी खणून ठेवण्यात आले आहेत. आधीच शहरातील रस्त्यांवर खड्डे, अतिक्रमण, वाहनतळाचा अभाव अशा समस्यांना असताना आता हे खड्डे खोदून ठेवल्यामुळे जीव मुठीत घेवून वाहन चालवण्याची वेळ आली आहे. खोदकामानंतर मातीचे ढिगारे रस्त्यावरच टाकण्यात आल्यानेे धुळीचा त्रासही सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

खोदकाम करणारा ठेकेदार खड्डे अर्धवट बुजवून काढता पाय घेत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस योग्य राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून तर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या कडेला असे खोदकाम जोरात सुरू आहे. अमृत योजनेतील मलवाहिनी व जलवाहिन्या , वीज पुरवठा, इंटरनेट पुरवठा करणार्‍या कंपन्याकडून टाकण्यात येणार्‍या केबल्ससाठी हे खोदकाम होत आहे. यात नियोजनशून्य कारभाराचा फटका वाहनचालक व पायी चालणार्‍या नागरिकांना सोसावा लागत आहे.

शहरातील रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते आधीच अरुंद झाले आहेत. त्यात प्रमुख रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आल्याने रस्ते अजूनच अरुंद झाले आहेत. छत्रपती परिसर रोड येथे रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी संकुल, दवाखाने, निवास असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे हे रस्ते एकाबाजूने बंद झाले आहेत.

- Advertisement -

शहरातील सर्व प्रमख रस्त्यांवर महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रस्ते खोदकाम सुरू आहे. केबल टाकताना पाइप्सचे ढापे नीट वापरले जात नसल्याचे समोर आले आहे. पूनम सागर परिसरातील रस्ता तयार होवून काही वर्ष झालेले नसल्याने रस्ता खोदकाम झाल्याने रस्ता पूर्ण खराब झाला आहे.
-प्रदीप जंगम, सामाजिक कार्यकर्ते

अदानी पॉवर, जिओ व महानगर गॅस आणि महापालिकेच्या जलवाहिन्यासाठी खोदकाम सुरू आहे. ठेकेदाराकडून खोदकाम केलेल्या रस्त्यांचे काम पूर्ववत केले जाणार आहे. तर अदानी व महानगर गॅस कंपनीकडून रस्त्यांच्या कामासाठी शुल्क घेतले जात आहे.
-शिवाजी बारकुंड, शहर अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -