घरमुंबईपर्यावरण मंत्र्यांनी कसली कंबर; प्लास्टिकविरोधात स्वत: मारली धाड!

पर्यावरण मंत्र्यांनी कसली कंबर; प्लास्टिकविरोधात स्वत: मारली धाड!

Subscribe

मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कारवाई केली जात असतानाच आता स्वत: पर्यावरण मंत्र्यांनीच कंबर कसली असून बुधवारी त्यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसरातल्या प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानांवर धाडी टाकल्या.

काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने प्लास्टिकवर बंदी आणली आहे. मात्र अजूनही मुंबईच्या अनेक दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होत असल्याचे पहायला मिळते. काही ठिकाणी प्रशासनाने कठोर अंमलबजावणी केली असली, तरी अनेक ठिकाणी विक्रेते-दुकानदार प्रशासनालाही जुमानेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर आता स्वत: पर्यावरण मंत्रीच कंबर कसून रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद आणि फुले देणाऱ्या दुकानदारांवर स्वत:हून धाडी टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.

म्हणून टाकली दुकानांवर धाड!

पर्यावरण मंत्री रामदास कदम आज सिद्धिविनायक मंदिर परिसरात गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या भाविकांच्या हातात त्यांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले असल्याचे दिसून आले. या संदर्भात त्यांनी भाविकांना विचारले असता मंदिर परिसरातील संबंधित दुकानातून या पिशव्या देण्यात आल्याचे भाविकांनी त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी या दुकानांची पाहणी केली असता त्यांना या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या प्लास्टिकचा साठा आढळून आला.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – प्लास्टिक बंदी फसण्याच्या मार्गावर? पूर्वतयारी अपूरी?


इतरही प्लास्टिकच्या गोदामांवर धाडी

दरम्यान, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाने मुंबईतील मालाड, चिंचबंदर, मस्जिद बंदर या ठिकाणी प्लास्टिकच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो किलो प्लास्टिकचा माल आज जप्त केला. भरारी पथकाने अजंठा ट्रान्सपोर्ट, मालाड पूर्व या गोदामांवर कार्यवाही करून बंदी असलेला एकूण १ हजार ३५९ किलो प्लास्टिक माल जप्त केला. तसेच या गोदामाला ५ हजार रुपये दंड देखील या भरारी पथकाने आकारला.

- Advertisement -

गुजरातहून आला प्लास्टिकचा माल

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भरारी पथक आणि मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मुंगीपा रोडवेज प्रा. लि.च्या चिंचबंदर येथील गोदामावर धाड टाकली असता तेथील गोदामांमध्ये नॉन ओव्हन पॉलिप्रापीलीन व प्लास्टिक पी.पी.बॅग्स (५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) साठवलेल्या आढळून आल्या. हा माल १ हजार ३०० कि. ग्रॅ. इतका असून, गोदामाचे सहाय्यक व्यवस्थापक महावीर ओंकारमल शर्मा यांना ५ हजार रुपये दंड करण्यात आला. याच भरारी पथकाने मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत मस्जिद बंदर येथे एका दुकानावर कार्यवाही केली असता या ठिकाणी ४ हजार किलोग्रॅम वजनाचे प्लास्टिक पॅकेजिंग, बॅग भरलेले आढळले. हा माल दमण, गुजरात येथून आणल्याचे आढळून आले आहे. तसेच या मालावर इपीआर नंबर नसल्याने मुंबई महानगरपालिकेच्या ब विभागामार्फत तो जप्त करण्यात आला.


हेही वाचा – प्लास्टिक बंदीच्या प्रदर्शनावरुन पालिकेत ‘प्रोटोकॉल वॉर’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -