घरमुंबईउरणच्या ओएनजीसी प्रकल्पात अग्नितांडव

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात अग्नितांडव

Subscribe

वरिष्ठ अधिकार्‍यासह ४ जवानांचा होरपळून मृत्यू

देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या येथील ओएनजीसी प्रकल्पात मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून त्यात महाव्यवस्थापक दर्जाच्या अधिकार्‍यासह सीआयएसएफच्या तीन जवानांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघेजण किरकोळ जखमी झाले. अत्यंत ज्वलनशील नाफ्त्या वायूचा साठा असलेल्या एपीयू प्रकल्पात हे अग्नितांडव सुरू झाले आणि एकच हलकल्लोळ उडाला. या आगीमुळे गणेशोत्सवात मग्न असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांनी भीतीपोटी पळापळ सुरू केली.पहाटे 4 ते 4.30 च्या दरम्यान एपीयू प्लांटमध्ये नाफ्त्याची गळती झाली आणि आग लागली. ही आग विझविण्यासाठी सीआयएसएफचे जवान व्हॅन घेऊन आले होते.

मात्र या व्हॅनलाच आगीने वेढले आणि त्याचा स्फोट झाला. यात महाव्यवस्थापक चल्लापिल्ला नरसिंह राव यांच्यासह सीआयएसएफचे एन.ए. नायका (48), एस.पी. कुशवाहा (36) आणि महेंद्रकुमार फिरंगीप्रसाद पासवान (33) असे चौघेजण होरपळून मृत्यू पावले. गळती झालेला नाफ्ता पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यात वाहून आल्याने नाल्यातील पाण्यालाही आग लागली. हा नाला नागरी वस्तीतून जात असल्याने नागरिकांची भीतीने तारांबळ उडाली आणि पळापळ सुरू झाली. त्यातच आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने आसमंत ज्वाळा व धुराच्या लोटांनी भरून गेले.

- Advertisement -

आगीची माहिती मिळताच ओएनजीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आगीचे स्वरुप भीषण असल्याने आणि ओएनजीसीकडे आग विझविण्यासाठी मुबलक फोम नसल्यामुळे जेएनपीटी, रिलायन्स, सिडको, जीटीपीएस, महाजनको, पनवेल ओएनजीसी आदी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. सकाळी 10 वाजेपर्यंत ही आग पूर्णपणे आटोक्यात आली. मात्र या आगीमुळे उरणकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहराला लागून असलेल्या नागाव आणि म्हातवली ग्रामपंचायत क्षेत्रात हा प्रकल्प येतो. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात अशा प्रकारच्या आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे आग लागली तेव्हा सुरक्षा यंत्रणांची आबाळ होती. तेव्हा स्थानिक नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीचे रूप पाहाता त्यांचे प्रयत्न फारसे कारणी लागले नाहीत.

या आगीत दोन इंडिका कारदेखील जळून भस्मसात झाल्या. आगीचे लोळ उठू लागल्याने परिसरातील नागरिकांना नेमके काय झाले हे समजत नव्हते. कारण इशार्‍याच्या कोणतीही यंत्रणा प्रकल्पाबाहेर लावण्यात आलेली नाही. जो-तो आपल्या घरातून मुलाबाळांना घेऊन बाहेर पडत होता. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने मृतदेह ओळखण्यापलिकडे होते. ओळख पटविण्यासाठी स्थानिक इंदिरा गांधी रुग्णालयात तीन, तर पालवी हॉस्पिटलमध्ये एक मृतदेह ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

या आगीमुळे आकाश काळवंडून गेले होते. यातच प्रचंड पाऊस असल्याने धुराने उरण परिसराला घेतले होते. यामुळे परिसरात काही ठिकाणी काळा पाऊस पडल्याच्या घटनादेखील घडली. नाफ्त्याची गळती झाल्यामुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असली तरी ओएनजीसीचे तज्ज्ञ आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. आगीची घटना समजल्यानंतर आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, भाजपचे नेते महेश बालदी, तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या घटनेनंतर पिरवाडी समुद्र किनार्‍यावर होणारे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाला सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली.

गॅस पुरवठ्यावर होणार परिणाम
या आगीमुळे सीएनजी आणि पीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार असून, याचा फटका रिक्षा, टॅक्सी वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील वडाळा येथील महानगर गॅस लिमिटेडच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावरही परिणाम झाला असल्याचे महानगर गॅस कंपनीने(एमजीएल) म्हटले आहे. या दुर्घटनेनंतर पाइपलाईनमधून कमी दाबाने गॅस पुरवठा होत असल्याने मुंबई आणि परिसरातील अनेक सीएनजी स्टेशन्सवर सीएनजीची कमतरता जाणवू शकते, असे कंपनीने म्हटले आहे. या बरोबरच औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी आपल्या इंधनासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचनाही कंपनीने केली आहे. आग विझविल्यानंतर तात्काळ ओएनजीसीच्या या प्लांटमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 10-15 दिवस सीएनजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुरक्षेची ऐसी की तैसी
ओएनजीसीच्या याच प्रकल्पात २००७मध्ये नाफ्थ्याची गळती होऊन आगीने रौद्ररूप धारण केले होते. तेव्हा रामा घरत नावाचे नागावमधील ग्रामस्थ मृत्यूमुखी पडले होते. या घटनेवेळी ओएनजीसीच्या अधिकार्‍यांनी नागाव आणि म्हातवली ग्रामपंचायतींकरिता सुरक्षेच्या विशेष बाबी देण्याचे आश्वासन दिले होते. यात नाले बंदिस्त करणे, ग्रामपंचायत कार्यालयांवर सुरक्षा भोंगे बसवणे, ओएनजीसी परिसरात स्थानिकांची फायरफायटर टीम तयार करणे यांचा समावेश होता. पण आजवर ओएनजीसीने याबाबत काहीही केले नाही.
मोहन काठे उपसरपंच, नागाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -