घरमुंबईचैनीसाठी चोरीची शक्कल, डोंबिवलीतून चार अल्पवयीन अटकेत

चैनीसाठी चोरीची शक्कल, डोंबिवलीतून चार अल्पवयीन अटकेत

Subscribe

डोंबिवलीतील राहणारे हे चौघेही मित्र असून ते व्यसनाच्या आहारी गेले आहेत. आपले शौक पूर्ण करण्यासाठीच त्यांनी हा लुटीचा मार्ग पत्करल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली.

व्यसनाची नशा आणि चैनीतलं जीवन जगण्यासाठी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे.असाच एक प्रकार उजेडात आला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्यांनी मोटारसायकल विक्रीची शक्कल लढवली. त्यासाठी ओएलक्सवर जाहीरातही अपलोड केली. सावज त्यांच्या जाळयात सापडले. याला चाकूचा धाक दाखवित त्याच्याकडील ३० हजार रूपये लुटले. किसको कुछ बोला तो मार दुंगा…. असा दमही त्याला भरला एका चित्रपटाला साजेसा हा प्रसंग डोंबिवलीत घडला.अवघ्या १६ ते १७ वर्षे वयाच्या महाविद्यालयीन मुलांनी हा प्लॅन आखला होता. मात्र त्यांच्या पहिल्याच प्लॅनने त्यांना सरळ पोलीस कोठडीच दाखवली.

डोंबिवलीतील राहणारे हे चौघेही मित्र असून ते व्यसनाच्या आहारी गेले आहेत. आपले शौक पूर्ण करण्यासाठीच त्यांनी हा लुटीचा मार्ग पत्करल्याची कबुलीही त्यांनी पोलिसांना दिली. त्यांच्यातील एका अल्पवयीन मुलाने स्वत:ची केटीएम ही मोटारसायकल विक्रीची शक्कल लढवली होती. ती विकत घेण्यासाठी आलेल्यांना आपण लुटूयात असा प्लॅन त्यांनी आखला होता. त्याची ही आयडीया त्यांनी त्याच्या तिघा मित्रांना सांगितली. त्याने ओएलएक्सवर मोटारसायकल विक्रीची जाहिरात टाकली. मुंबईतील जागेश्वरी येथे राहणारा सुफियाना नौशाद अहमद या तरुणाने ही जाहीरात वाचून संबधित मोबाईलवर फोन केला. त्यांचे एकमेकांशी वॉट्सअपवर बोलणेही झाले. दीड लाख किंमतीची मोटारसायकल, एक लाखापर्यंत देण्याचा सौदा ठरला. त्या तरुणांनी सुफियाला एक लाख रूपये घेऊन ये. असेही सांगितले. पण त्या दिवशी सुफियाना अ‍ॅडव्हान्स म्हणून ३० हजार रूपये घेऊन आला होता.

- Advertisement -

स्वस्तात मोटारसायकल मिळत असल्याने सुफियाना हा आपले मित्र शोएब अन्सारी, शकिल खान आणि सद्दाम खान यांच्यासह गुरुवारी रात्री दहा वाजता डोंबिवलीत आला. बावनचाळ परिसरातील आंबेडकर चौकात यांची भेट झाली. सुफियाना बरोबर त्याचे मित्र असल्याने त्यांनी त्या मित्रांना तेथेच थांबायला सांगितले आणि मॅकेनिकलला गाडी दाखवण्यासाठी सुफियानाला मोटारसायकलवर बसवून घेऊन गेले. काही अंतरावरच पुढे सुफियानाला एका अंधाराच्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे आणखी दोघेजण मोटारसायकलवरून तेथे आले. या चौघांनीही सुफियानाला मारहाण करून त्याला चाकूचा धाक दाखवित त्याच्या खिशातील ३० हजार रूपये हिसकावून घेऊन पळ काढला. घाबरलेल्या सुफियानने एका रिक्षा चालकाच्या मदतीने त्याने विष्णुनगर पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. सुफियाना हा वर्सोवा येथील वालीया कॉलेजमध्ये बीएससी आयटीमध्ये शिकत आहे.

तो आई वडीलांबरोबर राहत असून, त्याचे दोन भाऊ कतार देशात नोकरीला आहे. तीन अल्पवयीन मुलांसह तेजस खैरनार अशा चौघांनाही अटक करण्यात आली आहे. हे मध्यवर्गीय कुटूंबातील आहेत. पहिल्यांदाच त्यांनी हा प्रकार केला आहे. त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यांच्याकडून २८ हजार ८४० रुपये आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील यांनी दिली.

- Advertisement -

व्यसनाच्या आहारी गेलेली ही मुले कोणताच काम धंदा करीत नव्हती. शौक करण्यासाठी पैसा कमावण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची त्यांनी कबुली दिली. यातील तिघेजण हे अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडीतील बालसुधारगृहात पाठवले आहे. झटपट पैसा कमावण्याच्या नादात तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. ही चिंतेची बाब आहे.
राजेंद्र मुणगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णुनगर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -