घरमुंबईकुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस दलाच्या दोन कॉन्स्टेबलनी धावून पकडले १५८ चोर

कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस दलाच्या दोन कॉन्स्टेबलनी धावून पकडले १५८ चोर

Subscribe

विकास पाटील आणि प्रदीप गीते यांची कामगिरी, कुर्ला रेल्वे स्थानक चोरांमुळे बदनाम

चोराला धावून पकडणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान असते. त्यात पुन्हा चोर हातातून निसटला तर पोलिसांची बदनामी होते. त्यांच्या इज्जतीचा पंचनामा होतो. कुठलाही आसभास नसताना चोर अचानक गर्दीतून चोरी करून पसार होतो, अशा वेळी पोलिसांना तात्काळ त्याचा पाठलाग करावा लागतो. गेल्या दीड वर्षांत चार किंवा पाच नव्हे तर तब्बल १५८ चोरांना पकडण्याची जबरदस्त कामगिरी कुर्ला रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस दलाच्या विकास पाटील आणि प्रदीप गीते या दोन कॉन्स्टेबलनी केली आहे.

या दोन पोलीस कॉन्स्टेबलनी जीव धोक्यात घालून थरारक पाठलाग करत नुकतेच एका महिला चोराला जेरबंद केले आहे. त्याबद्दल आरपीएफ पोलिसांकडून त्यांचे कोतुक केले जात आहे. ३० जून २०१८ ला कुर्ला रेल्वे स्थानकात महाराष्ट्र सुरक्षाबलाच्या अनिता पाटील व आरपीएफच्या फेमिदा खान या दोन महिला पोलिसांनी जैनब पठाण नावाच्या एका महिला मोबाईल चोराला पकडले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आरोपीची तपासणी सुरु असतानाच तिने हिसका देऊन पळ काढला. तेव्हा तिथे कर्तव्यावर असलेले विकास पाटील आणि प्रदीप गीते यांनी हे बघताच तिचा पाठलाग करून तिला जेरबंद केले. त्यांच्या तत्परतेमुळे हे शक्य झाले.

- Advertisement -

पाटील आणि गीते या दोघांनी मागील वर्षी ११८ तर यावर्षी ४० अशा १५८ चोरांना पकडले आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्या रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पाटील आणि गीते या जोडीने चोरांना पकडण्यासोबतच अनेक लोकल प्रवाशांचा जीवही वाचवला आहे. डिसेंबर २०१६ मधील ही घटना आहे. कुर्ला स्थानकात मुलगी आणि आई ट्रेनमध्ये बसली होती. गर्दी असल्याने त्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. लोकल ट्रेन सुरु झाली. अचानक मुलगी गाडीतून प्लॅटफॉर्मवर पडली. तिच्यासोबत तिची आईही खाली पडली. आई ट्रेनच्या खाली जाणार होती; पण तिथे कर्तव्यावर असलेले प्रदीप गीते आणि विकास पाटील या जोडीने लगेच निलूला आणि आईला बाजूला ओढले आणि दोघींचाही जीव वाचला.

- Advertisement -

चोरट्यांमुळे कुर्ला स्थानक कुप्रसिद्ध

मध्य रेल्वेचे कुर्ला रेल्वे स्थानक चोरट्यांसाठी पूर्वीपासून कुप्रसिद्ध आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कुर्ला रेल्वे स्थानकावर चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. तब्बल 30 टक्क्यांनी हे प्रमाण घटले आहे. अनेक चोरांना पोलिसांनी कोठडीत पाठवले आहे, अशी माहिती कुर्ला आरपीएफचे कुर्ला स्थानकावरील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अत्री यांनी दिली. आरपीएफकडून चोरट्यांना पकडून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. मात्र बरेच वेळा हे चोरटे शिक्षा भोगून सुटल्यानंतर पुन्हा चोर्‍या करतात. सध्या अल्पवयीन चोरट्यांचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत जात आहे.

त्या घटना विसरणार नाही

अनेक चोरट्यांना पकडण्याच्या घटना थरकाप उडवणार्‍या असतात. त्यापैकी एक घटना मागच्या वर्षीची आहे. कुर्ला बेस्ट बस डेपोमध्ये एका चोरट्याचा पाठलाग करीत होतो. त्यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून स्वत:ला जखमी करून घेतले होते. त्यात तो रक्तबंबाळ झाला होता. त्या चोरट्याचे संपूर्ण शर्ट रक्ताने माखले होते. अशा परिस्थितीत मी सुद्धा घाबरलो. पण मी भावनिक न होता त्याला पकडून लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे तो बचावला आणि त्याला शिक्षा सुद्धा झाली. तर दुसरी घटना टिळक नगर येथील आहे. तेव्हा एका चोरट्याचा पाठलाग करीत असताना चोरांनी माझ्या सहकार्‍याच्या हातावर ब्लेड मारून जखमी केले होते. त्यात तो सुदैवाने बचावला. मुंबईतील सगळ्यात जास्त चोरटे बाहेरील राज्यातील असतात. हे चोरटे तीन चार दिवस चोर्‍या करून गावाकडे परत जातात. यांच्या या कृत्यामुळे लोकल प्रवाशांच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. कारण हे चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरतात आणि पसार होता. त्यामुळे प्रवाशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सोबतच प्रवास करताना बारकाईने लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे खूप गरजेचे आहे, असे आवाहन विकास पाटील आणि प्रदीप गीते यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना केले.

कुर्ला आरपीएफचे कॉन्स्टेबल विकास पाटील आणि प्रदीप गीते यांनी मागील दीड वर्षांत १५८ चोरांना पकडले आहे. त्यांची ही कामगिरी कुर्ला आरपीएफसाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे.
– सुरेश अत्री, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरपीएफ.

२००१ मध्ये रेल्वे पोलिसात रुजू झालो होतो. तेव्हापासून मी माझे पूर्ण काम प्रामाणिकपणे करत आलो आहे. आज मला कुर्ला आरपीएफमध्ये नोकरीला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीड वर्षांत १५८ चोरट्यांना आम्हाला पकडता आले.
– विकास पाटील, कॉन्स्टेबल, आरपीएफ कुर्ला.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -