घरमुंबईफसवणुकीचे दारूमुक्ती केंद्र

फसवणुकीचे दारूमुक्ती केंद्र

Subscribe

तिघांना सात वर्ष तुरुंगवास

दारूमुक्ती केंद्रात दारू सोडवण्यासाठी आलेल्याकडून रक्कम उकळणार्‍या तिघा भावांना ठाणे जिल्हा सेशन कोर्टाने सात वर्ष तुरुंगवास आणि एक लाख 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा बुधवारी सुनावली. कांतीलाल पुरूषोत्तम देशमुख, नंदकुमार पुरूषोत्तम देशमुख आणि उमेश पुरूषोत्तम देशमुख अशी या तिघा भावांची नावे आहेत. हा निकाल न्या. शैलेंद्र तांबे यांनी दिला असून सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. तर पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून तिघाही भावांचे कारनामे चव्हाट्यावर आणले होते.

वाडा तालुक्यातील तुसे या गावात 2015 रोजी देविदास पानसरे या नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक हजारे यांनी देशमुख बंधूंची भोंदूगिरी उघडकीस आणली. यातील कांतीलाल देशमुख हा या केंद्राचा म्होरक्या असून महादेवाच्या पिंडीजवळ बसून तो स्वतः ईश्वरी अवतार असल्याचे भासवत असे. तसेच, औषध देण्याची कोणतीही परवानगी नसताना दारू सोडवण्यासाठी येणार्‍या लोकांना व त्यांच्यासोबत आलेल्या महिलांना आपल्याकडील गोळ्या खाण्यास देत असे.

- Advertisement -

भयानक भोंदूगिरीही उघड
मला माझा गुरू प्रसन्न असून मी जे तुम्हाला सांगतो त्याची बाहेर वाच्यता केल्यास तुमचा संसार मोडून व घरातील व्यक्तींना अपघाती मृत्यू येऊ शकतो. अशी भिती घालीत असे. दारू सोडवण्यासाठी सुरूवातीला प्रत्येकी 28 हजार 600 रुपये स्वीकारल्यानंतर नवरा जर पुन्हा दारू पिऊ लागला तर नवर्‍याच्या शरीरावर गपचुप बिबव्याचे पेटत्या दिव्याने किंवा मेणबत्तीने तेल टाकून आलेल्या फोडावर उपचाराकरता स्वत:कडे आणण्यास धमकावत असे. यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क आकारून स्वत:ची आर्थिक प्राप्ती करून घेत असे. पोलिसांनी त्याची ही भोंदूगिरी उघड करून त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची अंतिम सुनावणी होऊन न्या.तांबे यांनी साक्षी पुराव्याच्या आधारे तिघांनाही सात वर्ष तुरुंगवास व एक लाख 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -