घरमुंबईनवी मुंबईसह पनवेलमध्ये मंडळांनी डॉल्बी नाकारला

नवी मुंबईसह पनवेलमध्ये मंडळांनी डॉल्बी नाकारला

Subscribe

दोन्ही ठिकाणी मंडळांनी डाल्बी, डीजेला नाकारून पारंपरिक वाद्यांनी विसर्जन मिरवणुका काढून हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान केला. कोणताही अनुचित प्रकार न घडता या ठिकाणी विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.

नवी मुंबई : गणपतीबाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, अशा नामगजरात नवी मुंबई महानगरपालिकेसह पनवेल महापालिका क्षेत्रात उत्साहात विसर्जन सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षी अवघ्या महाराष्ट्रात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डीजेच्या वापराचा विषय जोरदार चर्चेत होता, मात्र नवी मुंबई आणि पनवेल परिसर याला अपवाद ठरला. या दोन्ही ठिकाणी मंडळांनी डॉल्बी, डीजेला नाकारून पारंपरिक वाद्यांनी विसर्जन मिरवणुका काढून हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान केला. कोणताही अनुचित प्रकार न घडता या ठिकाणी विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.

नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 23 विसर्जन स्थळांवर गणरायाचा विसर्जनसोहळा निर्विघ्नपणे पार पडला. महापालिका क्षेत्रात एकूण 526 सार्वजनिक व 8253 घरगुती अशा एकूण 8779 गणेशमूर्तींचे विसर्जन अत्यंत उत्साहात झाले. विसर्जनामध्ये सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या आकाराच्या गणेशमूर्तींचा समावेश असल्यामुळे सर्वच विसर्जनस्थळांवर मोठ्या तराफ्यांसोबत फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 1400 घरगुती व 40 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 1069 घरगुती व 65 सार्वजनिक, वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 626 घरगुती व 60 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जनस्थळांवर 904 व 61 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 3 विसर्जनस्थळांवर 1366 घरगुती व 113 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 1577 घरगुती व 91 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 763 घरगुती व 23 सार्वजनिक, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळांवर 548 घरगुती व 73 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 23 विसर्जनस्थळांवर 8253 घरगुती व 526 सार्वजनिक अशा 8779 गणेशमूर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. विसर्जनस्थळी येणार्‍या भाविकांच्या, विशेषत्वाने मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच संभाव्य गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते, अशा आग्रोळी तलाव, चिंचवली तलाव शिरवणे, सेक्टर 6 तलाव वाशी, तुर्भे तलाव, सेक्टर 19 धारण तलाव कोपरखैरणे, रबाळे तलाव, दिवा तलाव, दिघा तलाव अशा 8 विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेमार्फत प्रत्येकी 10 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आले होते. गणपती विसर्जनासाठी विसर्जनस्थळांवर 750 हून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाईफ गार्ड्स तैनात होते.

शहरातील मुख्य 14 तलावांमध्ये गॅबियन वॉल पध्दतीच्या रचनेव्दारे निर्माण केलेल्या विशिष्ट जागेत भाविक भक्तांनी व मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेस अनमोल सहकार्य दिले. विसर्जन कालावधीत 66.5 टन निर्माल्य जमा झाले. निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊन त्यावर तुर्भे प्रकल्पस्थळी प्रक्रिया केली जात आहे. याशिवाय श्रीमूर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू तेथील स्वयंसेवकांमार्फत वेगळ्या ठेवण्यात येऊन निराधार व गरजूंना वितरीत करण्यात आल्या.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -