घरमुंबईठाण्यात ध्वनी प्रदूषणात बाप्पाचे विसर्जन !

ठाण्यात ध्वनी प्रदूषणात बाप्पाचे विसर्जन !

Subscribe

ठाणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत ठाणे जिल्ह्यातील बाप्पांचे रविवारी मोठ्या भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुमारे २८ हजार बाप्पांचे विसर्जन पार पडले. यामध्ये ७०० सार्वजनिक तर २७ हजार घरगुती गणपतींचा समावेश होता. साडेपाच हजार पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात विसर्जन सोहळा पार पडला. ढोल-ताशांचा कडकडाटात ध्वनी प्रदूषणाबाबतच्या सर्व नियमांची पायमल्ली यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. अनेक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे डीजे लावून आदेशाच्या चिरफळ्या उडवल्या.

ठाण्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत जल्लोष पाहावयास मिळाला. वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लहानथोर मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होते. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन मार्ग तसेच विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण सोहळ्यावर ड्रोनद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. विसर्जनाच्या ठिकाणी आरतीस्थळ, निर्माल्य कलश, पाणी पिण्याची व्यवस्था, वैद्यकीय सेवा, पोलीस आणि अग्निशमन दलाचे कक्ष, ध्वनी आणि प्रखर प्रकाश व्यवस्थेची उत्तम सोय होती. तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेच्या पुढाकाराने कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, च्या जयघोषात ठाण्यामध्ये भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला.

- Advertisement -

पालिका आयुक्तांनी ठेका धरला..

ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरच्या गणपतीची विसर्जन मिरवणूकही वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर आयुक्तांनी ठेका धरला होता. ढोल-ताशांचा कडकडाटात ध्वनी प्रदूषणाच्या सर्व नियमांची पायमल्ली करत काल ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ठाणे परिमंडळ १ मध्ये १०१ सार्वजनिक, ५ हजार ३०८ घरगुती गणपतींचं विसर्जन झाले. भिवंडी परिमंडळ २ मध्ये १२९ सार्वजनिक, २ हजार ५३० घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. कल्याण परिमंडळ ३ मध्ये १६९ सार्वजनिक, ९ हजार ६११ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. उल्हासनगर परिमंडळ ४ मध्ये १९९ सार्वजनिक, १ हजार १०६ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. वागळे परिमंडळ ५ मध्ये १५२ सार्वजनिक, ४ हजार ४६१ घरगुती गणपतींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत गणपती विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये उडवण्यात आलेल्या गुलालामुळे रस्ते गुलाबी झाले होते.

पोलिसांकडून अजून कारवाई नाही

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण करणार्‍या गणेश मंडळांवर कारवाई करण्याची नोटीस पोलिसांकडून गणेश मंडळांना पाठविण्यात आली होती. साऊंड सिस्टीम स्पीकरवरील मर्यादा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच ठेवाव्यात, असे निर्देशही पोलिसांनी गणेश मंडळांना दिले होते. तरीसुध्दा डीजे लावून या विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. मात्र पोलिसांकडून अजूनही कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -