घरमुंबईगोवंडीत विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

गोवंडीत विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

Subscribe

रेशनिंगसाठी पैसे दिले नाहीत म्हणून ठार मारले

गोवंडी येथे राहणार्‍या एका 30 वर्षांच्या शिक्षिकेची तिच्याच अल्पवयीन विद्यार्थ्याने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून एका बारा वर्षांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रेशनिंगसाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने रागाच्या भरात आपल्याच शिक्षिकेची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात घडली. गोवंडीतील के/03 परिसरात आयेशा अस्लम हुशीये ही महिला राहत असून त्या खाजगी शिकवणी घेतात. त्यांचा घटस्फोट झाला आहे. या दोघांना दोन मुले असून ते दोन्ही मुले त्यांच्या पतीसोबत राहतात. गेल्या दोन वर्षांपासून आयेशा आपल्या उदरनिर्वाहासाठी खाजगी क्लासेस घेतात. बारा वर्षांचा आरोपी मुलगा हा देखील याच परिसरात राहत असून तो आयेशा यांच्याकडे शिकवणीसाठी येत होता.

- Advertisement -

त्याच्या आईने आयेशा यांच्याकडे रेशनिंगसाठी पैसे उधार मागितले होते. मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेला तो मुलगा सोमवारी रात्री आठ वाजता चाकू घेऊन आयेशा यांच्या घरी गेला. त्याने आयेशा यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर तो पळून गेला. त्याला पळताना त्याला काही स्थानिक रहिवाशांनी पाहिले होते. त्याच्या हातात चाकू होता.

आयेशा यांच्यावर वार झाल्याचे समजताच स्थानिक रहिवाशांनी शिवाजीनगर पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या आयेशाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळालेल्या आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -