घरमुंबईकल्याण-डोंबिवलीत मुसळधार; १३ झाडे आणि विजेचे खांब कोसळले

कल्याण-डोंबिवलीत मुसळधार; १३ झाडे आणि विजेचे खांब कोसळले

Subscribe

जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल १३ झाडे, १ विजेचा खांब आणि एका धोकादायक इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या.

कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या २४ तासात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहरातील विविध भागात आणि मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते. जोरदार पडलेल्या पहिल्याच पावसात पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ९६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल १३ झाडे, १ विजेचा खांब आणि एका धोकादायक इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने कोणतिही जिवितहानी झाली नाही. मात्र या पावसामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू असल्याने डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली होती.

सखल भागात साचले पाणी 

गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मुसळधार पडत आहे. नालेसफाईची कामे व्यवस्थितपणे पार पडली नसल्याने रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रकार घडले. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता पाण्याखाली गेला होता. कोपर तुकारामनगर आदी परिसरात पाणी साचले होते. तसेच कल्याणातील चिकणघर परिसरातील चाळींमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची धावपळ उडाली. बेतूरकरपाडा, अटाळी आदी परिसरात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने त्यातून शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत होते. वाहनांमध्ये पाणी शिरत असल्याने वाहने बंद पडत होती.

- Advertisement -

नालेसफाईची झाली पोलखोल

दरम्यान, पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पाणी साचलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले. तसेच मोठया नाल्यांची सफाई योग्य पध्दतीने झाली आहे की नाही यासंदर्भात जलअभियंता चंद्रकांत कोलेते यांना पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. झाडे पडल्याने अग्निशमन दल आणि उद्यान विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी झाड आणि विजेचे खांब उचलण्याची कार्यवाही केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -