घरमुंबईमदत पूरग्रस्तांना

मदत पूरग्रस्तांना

Subscribe

डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या वतीने २३३ बॅग रक्त पुरवठा

डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठान, लातूर व सर जे.जे. महानगर रक्तपेढी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्त यादव यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने प्रथमच मंत्रालयात कोल्हापूर-सांगली-सातारा परिसरात पूरग्रस्त नागरिकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्‍यातून मंत्रालयात येणार्‍या सामान्य नागरिकांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पूरग्रस्त भागात आर्थिक मदतीसह जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा महाराष्ट्रासह देशभरातून आजतागायत सुरूच आहे.

डॉ. हरिवंशराय बच्चन प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने संसार उपयोगी वस्तू यापूर्वी गरजू व्यक्तींना पुरवण्यात आल्या. दरम्यान भागात असताना जाणवले की, साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे.त्यामुळे आरोग्य संबंधीत समस्यात भेडसावत आहेत. याची गरज लक्षात घेता पूरग्रस्त भागातून रक्त पुरवठ्याची मागणी होत आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन, नागरिक, सेवाभावी संस्था व वैद्यकीय सुविधा देणार्‍या संस्था यांची एकत्रित सांगड घालून कमीत कमी वेळात एकाच ठिकाणहून रक्त पुरवठा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्रातील सर्व निर्णयाचे केंद्रबिंदू असलेले मंत्रालय हे ठिकाण निवडण्यात अले होते.

- Advertisement -

या वेळी आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध विभागाचे सचिव यांच्यासह प्रतिष्ठीत व नामवंंंंंंत मंडळींनी शिबीर स्थळी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. या शिबिरातून एकूण २३३ रक्तदात्यांकडून रक्त संकलित करण्यात आले व ते पूरग्रस्त भागात पाठण्यात येणार असल्याचे विश्वस्त योगेश अडकिणे, शंतनू चव्हाण यांनी सांगितले.

पूरग्रस्त भागातील नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करा

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश
pankaja munde palwe
आमदार पंकजा मुंडे-पालवे

महापुरामुळे ग्रामीण भागात झालेल्य नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास त्वरीत सादर करावा. यामध्ये ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांचा समावेश असावा, अशा सूचना ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

- Advertisement -

जिल्ह्यात महापुरामुळे ग्रामीण विभागाकडील झालेल्या नुकसानीचा आढावा महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेत घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांच्या नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास सादर करावा. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पुरबाधीत गावांमधील पाणी पुरवठा योजना, हातपंप, पाझर तलाव, जॅकवेल, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग रस्ते, प्रा.आ.केंद्र इमारत उपकेंद्र इमारत, पशुवैद्यकीय दवाखाने, शाळा इमारती, पशुधनाचे झालेले नुकसान याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. या

नुकसानीबाबत अहवाल ज्या-त्या मंत्रालयीन विभागास सादर करुन त्याची प्रत ग्राम विकास विभागास द्यावी. ग्राम विकास विभाग याबाबत पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 35000 घरांचे नुकसान झाले असून, सदर गावांना नुकसानीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष घरांना भेटी देवून, नुकसान झालेल्या घरांची माहिती आवास सॉफ्टमध्ये नोंद करण्यात यावी. त्या सर्वांना घरे मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. जी घरे अतिक्रमणात आहेत, त्या नुकसान झालेल्या घरांचे अतिक्रमण नियमीत करुन देण्यात येतील किंवा पर्यायी जागा उपलब्ध झाल्यास त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या.

फोर्टिस हॉस्पिटलकडून २ हजार पूरग्रस्तांवर वैद्यकीय उपचार

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत करण्यासाठी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीने २ हजारांहून अधिक पूरग्रस्तांवर वैद्यकीय उपचार केले. महापुरात असंख्य लोकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. महापुरानंतर रोगराई पसरण्याची भीती असते.

दुषित पाणी, चिखल, मृत जनावरे इत्यादींमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे, यातून समाजाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. या ठिकाणी आता वैद्यकीय मदत पुरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलनेही पुढाकार घेतला आहे. फोर्टिस हॉस्पिटलची पथके पूरग्रस्त भागात रवाना झाली असून त्यांनी तेथील लोकांना वैद्यकीय उपचार पुरवण्यास प्रारंभ केला आहे. त्याकरता २५ डॉक्टर आणि कर्मचारी यांचा समुह या ठिकाणी रवाना झाला आहे.

सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत

मुंबई स्थित ‘रामचंद्र प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने सांगली व कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात येत आहे. या मदतकार्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी शासनाकडेदेखील आर्थिक मदत पाठविण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे तसेच संचालिका नयना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरु आहे. पूरग्रस्तांची अवस्था हृदय पिळवटणारी असून त्यातून मानवतेच्या दृष्टीकोनातून आपदग्रस्तांच्या मदतकार्याला थोडाफार हातभार लागावा, या उद्देशाने तसेच अधिकाधिक पूरग्रस्तांपर्यंत पोहचण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या कार्यात स्वयंसेवकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘कोल्हापूर रोटरी मुव्हमेंट’ला सहाय्य

महाराष्ट्रातील महाभयंकर पूरस्थितीमध्ये सर्वात जास्त नुकसान झालेल्यांपैकी कोल्हापूर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले. ‘कोल्हापूर रोटरी मुव्हमेंट’च्या सदस्य क्लबने यामध्ये बचाव आणि तात्पुरता निवारा यासाठी कार्य केले. आता वैद्यकीय सेवा बजावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुढे पुनर्वसनात प्रशासनाला प्रत्यक्ष मदत करण्यासाठी हे सर्व हात एकत्रितपणे ‘रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर’ म्हणून कार्यरत आहेत. या त्यांच्या कामात त्यांना पाठबळ आणि मदत करण्याचा निर्णय स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांनी घेतला आहे.

तातडीची मदत म्हणून 5 लाखाचा पहिला हप्ता रोटरी क्लबकडे स्मारकाने पाठवला आहे. या कामात सगळ्यांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे. मदत त्यांच्या खाली दिलेल्या बँक खात्यावर द्यावी. बँकेचा तपशील असा ROTARY MOVEMENT KOLHAPUR (RI DIST 3170) श्री वीरशैव सहकारी बँक लि., ताराराणी चौक शाखा, कोल्हापूर. खाते क्रमांक 010010600001154 Ifsc code: SVSH0000010 स्मारकाच्या नावाने मदत दिल्यासही आम्ही ती त्वरित त्यांना पाठवून देऊ, असे रणजित सावरकर यांनी सांगितले आहे.

स्मारकाच्या बँकेचा तपशील – खाते नाव : स्वातत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, खाते क्रमांक 053310021592, देना बँक (शिवाजी पार्क शाखा), IFSC कोड BKDN0460533. (मदत पाठविताना नाव व पॅन क्रमांक आवश्यक आहे.)

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलकडून वैद्यकीय मदत

सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला, या महापुरात असंख्य लोकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. पूरग्रस्तांना ही मदत पोहोचवली जात आहे. मात्र महापुरानंतर रोगराई पसरण्याची भीती असते.

दुषित पाणी, चिखल, मृत जनावरे इत्यादींमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे, याच सामाजिक बांधिलकीतून नेरुळ, नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे १० डॉक्टर व आरोग्य सेवा पुरविणारे ८ (पॅरा मेडिकल स्टाफ) असे १८ जणांचे वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना झाले असून त्यांनी ताप, कॉलरा, सर्दी, खोकला तसेच इतर संसर्गजन्य आजाराची औषधांचा साठा मुबलक प्रमाणात नेला आहे.

या औषधांमध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे होणार्‍या जुलाब, अतिसार, कॉलरा अशा आजारांसाठी औषधे पाठवण्यात आली. त्याचप्रमाणे, अनेक आजारांवर उपयोगी पडणार्‍या औषधे देखील पाठवण्यात आली आहेत. पूरानंतर पसरलेल्या चिखलाचे ढिग, मरून पडलेली जनावरे, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींमुळे संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका ओळखून अनेक प्रभावी अँटिबायोटीकदेखील मुबलक प्रमाणात पाठवण्यात आले.

या सगळ्या औषधांची जुळवाजुळव करण्यात तेरणा हॉस्पिटलचे डॉक्टरांनी तसेच तेरणा महाविद्यालयातील डॉक्टरांनी बरीच मदत केली असल्याचे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.टी. देशमुख यांनी सांगितले. या डॉक्टरांच्या मदतीने पुराचा फटका बसलेल्या नागरिकांवर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -