घरमुंबईडोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ; मनसेची पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ; मनसेची पोलीस ठाण्यात धाव

Subscribe

अत्यंत घातक असलेल्या हायड्रोजन गॅसने भरलेल्या आठ गाडया बेकायदेशीरपणे आणि निष्काळजीपणे एमआयडीसीच्या रस्त्यावर उभ्या केल्या जात असल्याने एखाद्या वेळी अपघात झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ सुरू असून, या गाडयांवर आणि संबधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने पोलीस ठाण्यात केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

रविवारी सकाळच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी फेज २ येथील इंडो अमाईन केमिकल कंपनीच्या रस्त्यावर हायड्रेाजन गॅसने भरलेल्या ७ ते ८ गाडया उभ्या होत्या. हायड्रोजन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने मनसेने त्यावर हरकत घेतली आहे. बेकायदेशीर आणि निष्काळजीपणे एकामागोमाग या गाडया उभ्या करण्यात आल्या होत्या. एखादया वेळेस यातील एका गाडीला चुकून अपघात झाला तर सभोवतालच्या उभ्या असलेल्या सगळया गाडयांना त्याची झळ बसून प्रचंड स्फोट होण्याची शक्यता नाकरता येत नाही, अशी तक्रार परिसरातील रहिवाशांनी मनसेच्या कार्यालयात केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डेांबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, मनसे विदयार्थी सेनेचे अध्यक्ष सागर जेधे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

सदर ठिकाणी पाहणी केल्यानंतर अत्यंत घातक असणाऱ्या गाडया अशा पध्दतीने उभ्या केल्याने त्यांनी स्थानिक पोलिस, एमआयडीसी, कामा, इंडस्ट्रीयल सेफ्टी, फायर ब्रिगेड, प्रदुषण महामंडळ यांच्याकडे तक्रार दाखल करून संबधित कंपनीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीस आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घातक आणि ज्वलनशील गाडया त्वरीत बाहेर काढण्याचे कंपनीला आदेश दिले. लाखो डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी इंडो अमाईन कंपनी विरोधात त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणीही मनसेने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -