घरमुंबईमोबाईल नोंदणीतून विजेसंबंधी ग्राहकांना घरबसल्या माहिती

मोबाईल नोंदणीतून विजेसंबंधी ग्राहकांना घरबसल्या माहिती

Subscribe

महावितरणकडे २० लाख १३ हजार ग्राहकांकडून नोंद

कल्याण परिमंडलातील 20 लाख 13 हजार ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना रिडींग, वीज बिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठवण्यात येत आहे. परिमंडलातील उर्वरित 4 लाख 68 हजार वीज ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. याबाबतची माहिती महावितरण, कल्याण परिमंडळाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली आहे.

तक्रारीसाठी टोल फ्री नंबर
कल्याण परिमंडळात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर असे एकूण 24 लाख 82 हजार वीज ग्राहक आहेत. यातील जवळपास 81 टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणाशी जोडले आहेत. या ग्राहकांना मीटर रिडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा ‘एसएमएस’ महावितरणकडून पाठवण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तक्रार करण्यासाठीचा टोल फ्री क्रमांक 1912 हा ‘एसएमएस’च्या शेवटी नमूद आहे. या तपशिलाची पडताळणी करून चुकीच्या नोंदीबाबत वेळीच तक्रार करण्याची सुविधा यातून ग्राहकांना मिळते. त्यामुळे बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीज बिल तयार झाल्यानंतरही काही तासांमध्ये बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठविला जातो. हा ‘एसएमएस’ बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ‘एसएमएस’ दाखविणार्‍या ग्राहकांकडे बिलाची मूळ किंवा दुय्यम प्रत मागू नये, अशी सक्त ताकीद सर्व बिल भरणा केंद्रांना देण्यात आली आहे.

- Advertisement -

याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीज पुरवठा व वीजपुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याबाबत आगाऊ माहिती देणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठविण्यात येतो. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा बंद झाल्याची व हा पुरवठा केव्हा पूर्ववत होऊ शकेल, याची माहितीही ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना पाठविण्यात येते. एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे अशक्य असल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन महावितरणला सादर करण्याबाबतही ‘एसएमएस’द्वारे कळविले जाते. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीसही नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे बजावण्यात येते. तेव्हा परिमंडळातील उर्वरित ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे तातडीने नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणीकृत मोबाईल बंद, चुकीचा असेल किंवा क्रमांक बदलला असल्यास नवीन क्रमांक प्राधान्याने अद्यायावत करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता अग्रवाल यांनी केले आहे.

असा नोंदवा मोबाईल क्रमांक

नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून एमआरईजी नंतर स्पेस द्यावा व त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -