घरमुंबईविद्यार्थी पुस्तकांविना; पुस्तके धुळखात

विद्यार्थी पुस्तकांविना; पुस्तके धुळखात

Subscribe

पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे लाखो रुपयांची पुस्तके वाया

मुंबई महापालिकेतील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे संपले तरी अद्याप पुस्तके मिळाली नाहीत. मात्र समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत आलेली पुस्तके पालिकेच्या भांडुप येथील शहर साधन केंद्रामध्ये धुळखात पडली आहेत. शैक्षणिक वर्षे संपत आले तरी अनेक शाळांमध्ये पुस्तके व शैक्षणिक साहित्य मिळाले नसल्याची ओरड सुरू असताना पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे राज्य सरकारचे पुस्तकांसाठीचे लाखो रुपये वाया गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी पुस्तकांविना व पुस्तके धुळखात अशी परिस्थिती झाली आहे.

समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तक योजनेंर्तगत मुंबई महापालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवी आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके व शैक्षणिक साहित्य देण्यात येते. त्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून पालिकेतील विद्यार्थ्यांची माध्यमनिहाय माहिती मागवण्यात येते. ही माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून संकलित करून बालभारतीच्या पोर्टलवर भरण्यात येते. पालिकेकडून पोर्टलमार्फत भरलेली माहिती व यू डायसमधील विद्यार्थ्यांची संख्या पडताळण्यात येते. ही संख्येत फरक असल्यास मागणी फेटाळून लावण्यात येते.

- Advertisement -

पोर्टलवर भरलेली विद्यार्थी संख्या व यू डायसमधील संख्या समान असल्यावर बालभारतीकडून माध्यमनिहाय पुस्तके पालिकेला वितरित करण्यात येतात. ही पुस्तके पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विभागनिहाय शहर साधन केंद्रामध्ये (यूआरसी) पाठवली जातात. शहर साधन केंद्रातून पुस्तके विभागातील शाळा व शाळेकडून विद्यार्थ्यांना वितरित केली जातात. मात्र, मुंबई महापालिकेच्या एस वॉर्डमधील भांडुप येथील विठ्ठल रामजी शिंदे मार्ग शाळेतील शहर साधन केंद्रामध्ये बालभारतीकडून आलेली बहुतांश पुस्तके धूळखात पडली आहे. भांडुप शहर साधन केंद्रामध्ये एस व टी विभागातील शाळांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्षे संपत आले तरी अद्यापही पुस्तके मिळाली नसल्याची या विभागातील काही शाळांमधील पालकांकडून होत आहे. पुस्तके मिळत नसल्याने अनेक पालकांना ती विकत घ्यावी लागल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. तर विद्यार्थ्यांना पुस्तकाअभावी अभ्यास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

भांडुपमधील विठ्ठल रामजी शिंदे मार्ग शाळेतील शहर साधन केंद्रामधील वर्गखोलीत असलेल्या पुस्तकांमध्ये इंग्रजी, उर्दू, मराठी व हिंदी माध्यमाची गणित, भाषा, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांची पुस्तके मोठ्या प्रमाणात धुळीमध्ये पडून आहेत. त्याचप्रमाणे भाषा, गणित, विज्ञान या विषयाचे शैक्षणिक साहित्यही मोठ्या प्रमाणात येथे ठेवले आहे. शाळेच्या इमारतीच्या डागडुजीचे काम सध्या सुरू आहे, वर्गखोलीमध्ये सर्वत्र राडारोडा पडलेला असून त्या ढिगार्‍यामध्येच पुस्तके व शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे. ही पुस्तके अन्यत्र हलवण्याचेही कष्टही पालिका प्रशासनाने घेतलेले नाही. त्यामुळे पुस्तके व शैक्षणिक साहित्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ व डेब्रिज पडलेले आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे लाखो रुपयांची पुस्तके धूळखात पडली असताना विद्यार्थी मात्र पुस्तकांपासून वंचित राहत आहेत.

- Advertisement -

वर्गखोलीचा दरवाजा बंद
विठ्ठल रामजी शिंदे मार्ग शाळेची डागडुजी सुरू असल्याने वर्गखोलीच्या मागील बाजूची भिंत पाडण्यात आली आहे. परंतु वर्गखोलीचा पुस्तक ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापर केला जात आहे. परंतु हे कोणाला समजू नये यासाठी वर्गखोलीच्या दरवाजाला बाहेरून टाळे लावण्यात आले आहे.

शैक्षणिक साहित्य जादा आल्याचा दावा
पालिकेला यू डायसमधील संख्येनुसारच पुस्तके व शैक्षणिक साहित्य दिले जाते. असे असतानाही पुस्तके जादा व शैक्षणिक साहित्याच्या पेट्या बहुसंख्येने आल्याचा दावा पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी आरती खैरे यांनी केला आहे.

सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके दिली आहेत. शाळा न देता ती ठेवण्यात काहीच अर्थ नाही. ज्या शाळांची डागडुजी सुरू आहे, त्या शाळांकडून पुस्तके नेण्यास विलंब झाला आहे. गतवर्षी जादा पुस्तके आली होती. ती शिल्लक राहिली आहेत. याबाबत शिक्षण विभागाला कळवले आहे. परंतु, त्याबाबत अद्याप काहीच उत्तर आलेले नाही.
– आरती खैरे, प्रशासकीय अधिकारी, पालिका शिक्षण विभाग

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -