घरमुंबईईडी परिसरात जमावबंदी हा सरकारचा अतिरेक - जयंत पाटील

ईडी परिसरात जमावबंदी हा सरकारचा अतिरेक – जयंत पाटील

Subscribe

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवावा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेचा उपाय म्हणून ईडीचं कार्यालय परिसरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ‘दक्षिण मुंबईमध्ये कलम १४४ लागू करणं हा सरकारचा अतिरेक आहे’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ न करता कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवावा, कुठेही गोंधळ करू नये’, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलं आहे.

शरद पवार दुपारी जाणार ईडीच्या कार्यालयात

राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये बँकेचं संचालक मंडळ आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं देखील नाव ईडीने टाकलं आहे. दरम्यान, ईडीकडून शरद पवारांची चौकशी होणार, अशी अटकळ बांधली जात असतानाच स्वत: शरद पवारांनीच आपण ईडीच्या कार्यालयात ‘पाहुणचार’ घेण्यासाठी जात आहोत, असं जाहीर केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईचा आणि सरकारचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच; आज होणार फक्त शिष्टाचार?

आव्हाड म्हणतात, पवारांचं ऐकणार नाही!

शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांनी येऊ नये आणि आंदोलन करू नये, असं आवाहन करून देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी थेट ‘यावेळी आम्ही पवारांचं ऐकणार नाही’, असं म्हणत ईडी कार्यालय परिसरात जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळेच जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.

सत्तेचा दुरुपयोग करून खोटे आरोप

दरम्यान, जयंत पाटील यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शरद पवारांना महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळीकडेच लोक त्यांचं स्वागत करत आहेत. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे’, असा आरोप पाटील यांनी केला. तसेच, ‘ईडीच्या कारवाईला शरद पवार पूर्णपणे सहकार्य करत आहेत. पवार संचालक किंवा सदस्य अशा कोणत्याही पदावर नसताना देखील त्यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग करून खोटे आरोप केले जात आहेत. हे आरोप आम्ही सहन करणार नाही’, असं देखील जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -