घरमुंबई'या' अवलियांची सायकलवर लंडन ते मुंबई भ्रमंती

‘या’ अवलियांची सायकलवर लंडन ते मुंबई भ्रमंती

Subscribe

ज्यो आणि व्हेरिटी यांनी सायकलवरून लंडन ते मुंबई असा सायकल प्रवास केला. या प्रवासात त्यांनी १७ देश आणि ९००० किलोमीटर अंतराचा प्रवास केला आहे.

भारतातील विद्यार्थ्यांना शिक्षण, गरीबी निर्मूलन आणि लैंगिक समानता याबाबतीत मदत करण्यासाठी जो आणि व्हेरीटी यांनी लंडन ते मुंबई सायकल प्रवास केला आहे. जो आणि व्हेरीटी हे हौशी सायकलपटू आहेत. मॅजिक बससाठी निधी उभा करण्यासाठी त्यांनी लंडन ते मुंबई असा सायकल प्रवास केला. हा भारतातील एक सर्वात मोठा ‘गरीबी निर्मूलन’ कार्यक्रम आहे. तीन महिन्यांपूर्वी लंडनहून हा प्रवास सुरू झाला. त्यांनी १७ देश आणि ९००० किलोमीटर अंतर सायकलने पार केले. हे सायकलद्वयी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ येथे सुरू असलेल्या चॅरिटी कार्यक्रमात २६ जानेवारी रोजी पोहचून सहभागी झाले.

‘हे’ आहेत या रॅलीचे उद्दीष्टे

मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील वस्तीमध्ये २६ जानेवारी रोजी ज्यो आणि व्हेरिटी उपस्थित होते आणि त्यांनी मॅजिक बस मुलांसमवेत रॅलीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक-आर्थिक कारणांमुळे शाळा सोडावी लागलेल्या मुलांमध्ये शिक्षणाच्या महत्त्वाचा प्रसार करणे हे या रॅलीचे उद्दिष्ट होते. मुलांशी संवाद साधताना या दोन सायकलपटूंनी त्यांना विविध देशांमध्ये आलेले अनुभव, आव्हाने आणि विविध संस्कृतींमधील लोकांशी संवाद साधताना आलेल्या गमतीजमती कथन केल्या. दुसरीकडे मुले मॅजिक बसमध्ये काय शिकली, त्यांना या सत्रांमध्ये सहभागी होताना कसा आनंद होतो, त्यांच्या भय्या आणि दिदींचा अर्थात मार्गदर्शकांचा (कम्युनिटी युथ लीडर्स) ते कशा प्रकारे आदर करतात आणि प्रेम करतात याविषयी सांगितले. ज्यो आणि व्हेरिटीला खूप सहकार्य आणि निधी मिळाला. त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रवास मुंबईहून आग्नेय आशियाच्या दिशने सुरू केला.

- Advertisement -

‘मॅजिक बससाठी निधी गोळा केला’

या प्रवासाबद्दल आणि अनुभवामागच्या प्रेरणेबद्दल बोलताना व्हेरिटी एलिस म्हणाली, “आम्ही केवळ साहस अनुभवण्यासाठी हा प्रवास केला नाही तर मॅजिक बससाठी निधी गोळा करणे आणि भारतातील हजारो मुले आणि तरुणांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणे हासुद्धा आमचा हेतू होता. हा प्रवास म्हणजे छान अनुभव होता. या प्रवासात अनेक मित्र झाले आणि संस्कृतीच्या आणि भाषेच्या सीमारेषा ओलांडून आम्ही पाहुणचार अनुभवला. या प्रक्रियेत आम्ही उभारलेल्या निधीमधून मॅजिक बस कार्यक्रमातील २० हजार तासांचे अध्ययन प्राप्त होईल. या अध्ययन कार्यक्रमामुळे त्यांना शाळा सोडावी लागणार नाही आणि ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तामिळनाडूतील पोल्लाची आणि कर्नाटकमधील म्हैसूर येथे मॅजिक बसच्या टीमचे कामही आम्ही पाहिले. भारतात ते घडवत असलेले परिवर्तन पाहून आम्ही गोळा केलेल्या निधीचा सदुपयोग होताना पाहून आम्हाला खूप समाधान वाटत आहे.

- Advertisement -

‘मॅजिक बस आमच्या हृदयाच्या अत्यंत जवळ’

मॅजिक बसशी असलेल्य संलग्नतेबद्दल ज्यो अँड्र्यूज म्हणाला, “मॅजिक बस आमच्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. मॅजिक बसचा संस्थापक मॅथ्यू स्पेसी आणि आमचा जुना परिचय आहे. इंग्लंडमधील ईसेक्स येथील ज्या शाळेत मी शिकवतो, मॅथ्यू तिथला माजी विद्यार्थी आहे. आम्ही मॅथ्यूचे काम पाहून स्तिमित होतो. खेळावर आधारीत अॅक्टिव्हिटीमधून भारतातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले आणि तरुणांना शिक्षण पूर्ण करण्यात, योग्य वयात विवाह करण्यात आणि रोजगार मिळविण्यासाठी मॅजिक बसतर्फे दृष्टिकोन विकसित करण्यात येतो. ते ही जादू कशी साध्य करतात हेही पाहण्याची ही संधी होती.”

‘मॅजिक बसवर आमचा विश्वास’

मॅजिक बसचा संस्थापक मॅथ्यू स्पेसीने या सायकलद्वयीचे आभार मानले. त्यांच्या या निधी संकलन अॅक्टिव्हिटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तो म्हणाला, “मॅजिक बसवर आमचा विश्वास आहे की खेळावर आधारीत अध्ययनामुळे खूप दूरगामी परिणाम होईल आणि मुले व तरुणांमध्ये जीवनावश्यक कौशल्ये बाणविण्यासाठी, तसेच जीवनाचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी व जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी मदत होईल. त्याचप्रमाणे ज्यो आणि व्हरिटीने स्वीकारलेल्या या साहसपूर्ण आव्हानद्वारे लोक आमच्या कार्याशी अधिक अर्थपूर्णतेने जोडले जातील. आमच्या कार्यक्रमातील मुलांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी निधी उभारल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -