घरमहाराष्ट्रनाशिकश्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा गड आला, पण सिंह गेला

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा गड आला, पण सिंह गेला

Subscribe

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपला ११ जागांवर विजय मिळाला, तर आघाडीला अवघ्या ८ जागा राखता आल्या. नगराध्यक्षपद आघाडीच्या हाती गेले असले तरी भाजपच्या मतदान टक्केवारीत मोठी वाढ झाल्याने पक्षासाठी ही जमेची बाजू मानली जाते आहे.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा दारुण पराभव झाला, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या शुभांगी पोटे १६०८ एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या. या निवडणुकीत बाळासाहेब नाहटा, प्रा. तुकाराम दरेकर व कुमार लोखंडे या पाचपुते समर्थकांचाही पराभव झाला. आमदार राहुल जगताप यांच्या आर. जे. ग्रुपने निवडणुकीत बाजी मारली. दुसरीकडे पाचपुते यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक २७ जानेवारीला झाली. त्यात प्रामुख्याने २३,६०४ मतदारांपैकी १९,८२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवार, २८ जानेवारीला सकाळी मतमोजणी सुरू झाली. त्यात नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत आघाडीच्या शुभांगी पोटे विजेत्या ठरला. नगरसेवक पदाच्या १९ जागांसाठी भाजपला ११ जागा, तर आघाडीला ८ जागा मिळाल्या. अपक्ष बसपा संभाजी ब्रिगेड यांना आपले खातेही उघडता आले नाही. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीता शिंदे यांचा झालेला पराभव पाचपुते यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक मानला जातो आहे. तसेच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीकडून भाजपात आलेल्या बाळासाहेब नाहटा यांचे बंधू भरत नाहटा, तुकाराम दरेकर याचे चिरंजीव संतोष दरेकर व कुमार लोखंडे यांच्या मातोश्री रेखा लोखंडे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. आघाडीचे नेते आमदार राहूल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, आण्णासाहेब शेलार यांनी नगराध्यक्ष पद खेचून आणण्यासाठी मोठी व्यूहरचना आखून अखेर पोटे यांना विजयी केले. मात्र, नगरसेवक पदाच्या केवळ ८ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले.

- Advertisement -

नेत्यांच्या सभांचा आधार

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री राम शिंदे, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांच्या जाहीर सभा घेत वातावरण आपल्या बाजूने तयार करण्याचा प्रयत्न केला. तर, आघाडीनेही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अजित पवार यांच्या जाहीर सभा घेऊन भाजपला चोख उत्तर दिले होते. शेवटच्या दोन दिवसांत आमदार राहुल जगताप यांनी त्यांच्या आर. जे. ग्रुपला सक्रिय केल्याने पाचपुते यांची तारांबळ उडाली होती. अखेर नगराध्यक्षपद खेचून आणण्यात जगताप नागवडे यशस्वी झाले.

भाजपची टक्केवारी वाढली

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपला ११ जागांवर विजय मिळाला, तर आघाडीला अवघ्या ८ जागा राखता आल्या. नगराध्यक्षपद आघाडीच्या हाती गेले असले तरी भाजपच्या मतदान टक्केवारीत मोठी वाढ झाल्याने पाचपुते यांच्या जमेची बाजू मानली जाते आहे.

ShriGonda1
विजयोत्सव साजरा करताना समर्थक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -