घरमुंबईशिक्षकांचा पगार विलंब जाणूनबुजून

शिक्षकांचा पगार विलंब जाणूनबुजून

Subscribe

आमदार कपिल पाटील यांचा घणाघात

मुंबईतील शिक्षकांच्या पगारावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादात आता नवी भर पडली आहे. शिक्षकांचे हे पगार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा घणाघात आमदार कपिल पाटील यांनी केला. तर ट्रेझरीतून युनियन बँकेकडे ईसीएस करण्यास जाणीवपूर्वक उशीर करणे यामुळे पगाराची बिले वेळेवर जात नसल्याचा आरोप ही पाटील यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे याप्रश्नी आमदार कपिल पाटील यांनी वित्त विभागाच्या प्रधान सचिवांकडे धाव घेतली असून याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी पाटील यांनी पत्रव्यवहारातून केली आहे.

मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यासंदर्भात सुप्रिम कोर्टाने निर्णय जाहीर केला आहे. मात्र त्यानंतरही गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांच्या पगाराला लेटमार्क लागत असून यावरुन शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आणि निवेदन शिक्षण विभागाकडे देण्यात आली आहेत. मात्र त्यानंतरही हा प्रश्न न सुटल्याने आता यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यामुळे या मुद्यावरुन शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

- Advertisement -

मुंबईतील शिक्षकांचे पगार पुन्हा एकदा राष्ट्रीयकृत युनियन बँकेतून सुरु झाले आहेत. मात्र या निर्णयामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत, त्यांच्याकडून पगार वेळेवर होऊ नयेत यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. पगार बिले वेळेवर सादर न होणे, पे अ‍ॅण्ड अकाऊंट डिपार्टमेंटमधून साध्या साध्या त्रुटींसाठी बिले परत परत पाठवणे, ट्रेझरीतून युनियन बँकेकडे ईसीएस करण्यास जाणीवपूर्वक उशीर करणे यामुळे पगाराची बिले वेळेवर जात नाहीत, ईसीएस वेळेवर होत नाहीत, त्यामुळे मुंबईतील शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत. असे वारंवार घडत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यासंदर्भात वित्त सचिवांना दिलेल्या निवेदनात त्यांनी याप्रकरणाची कारवाई करण्याची मागणी करताना कपिल पाटील म्हणाले की, वित्त विभागाच्या निर्णयानुसार दर महिन्याच्या ७ तारखेला बिले सादर होणे, २० तारखेपूर्वी बिलांची तपासणी होणे, २० तारखेला ट्रेझरीकडे बिले सादर होणे, २७ तारखेला बँकेकडे ईसीएस आणि बिले पाठवणे आवश्यक आहे. मात्र हे टाईमटेबल गेले चार महिन्यांपासून पाळलेच जात नाही. हे जाणीवपूर्वक घडत असेल तर ती गंभीर बाब आहे आणि मा.सुप्रिम कोर्टाच्या आदेशाचे ते उल्लंघन असून ही एक अवमानना असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -