घरमनोरंजनलवयात्री...जुन्या प्रेमकथेचा नवा गरबा

लवयात्री…जुन्या प्रेमकथेचा नवा गरबा

Subscribe

दिवाळी, गुजरातमधली पतंगबाजी, गणेशोत्सव, रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमध्ये सिनेमे बनवलेले आहेत. तसाच नवरात्रीतल्या गरब्यावर ‘लवयात्री’ बनवण्यात आलाय. हा चित्रपट आणखी २५ दिवसांनी नवरात्रीच्या दिवसांत प्रदर्शित झाला असता तर त्याला तरुणाईतला हक्काचा प्रेक्षक नवरात्रीच्या सणविषयामुळे उपलब्ध झाला असता. पण आता ती वेळ टळलेली आहे.

त्यामुळे केवळ तरुणाईला समोर ठेवून बनवलेला ‘लवयात्री’ वेळकाळातच नाही तर कथानकातही फसलेला आहे. ‘धडक’ नंतर हिंसक लव्हस्टोरीजच्या कथानकांची लाट येण्याची शक्यता होती. पण तसं झालेलं नाही. बॉलिवूडचा पडदा अजूनही अनिवासी भारतीय मुला-मुलींच्या लव्हस्टोर्‍यांच्या डबक्यातून बाहेर यायला तयार नसल्याचं लवयात्रीनं स्पष्ट केलंय. सलमानची निर्मिती असलेला सिनेमा म्हणूनही या चित्रपटाकडे पाहिलं जाऊ शकतं. पण तो केवळ निर्माता म्हणून उरलेला असून अनेक महिन्यांपासून हिंदी पडद्यावर न झळकलेले त्याचे दोन भाऊ सोहेल आणि अरबाज यांना विस्मृतीत जाऊ न देण्याचा प्रयत्न म्हणूनच ‘लवयात्री’कडे पाहावं लागेल.

चित्रपटाची कथा म्हणजे गैरसमजातून मतभेद झाल्यानं रागावलेल्या हिरॉईनला लंडनमध्ये जाऊन शोधण्याचा हिरोचा प्रयत्न इतकीच आहे. आता या विषयावर बॉलिवूडमध्ये ढिगाने सिनेमे आलेत. अशा सिनेमातल्या हिरोंच्या होम प्रोडक्शनचेच हे चित्रपट होते. कमल सदाना नावाचा हिरो आठवावा लागतो. तो ‘रंग’ नावाच्या ९० च्या दशकांत आलेल्या चित्रपटांतील गाण्यामुळे आणि त्यातली नायिका दिव्या भारतीमुळेच लक्षात राहतो. त्यानं त्याच्या होम प्रोडक्शनमधून अशाच कथानकाचा १९९२ मध्ये ‘बेखुदी’ नावाचा एक चित्रपट बनवला होता. यातला कमल विस्मृतीत गेला तर काजोलने पुढे शाहरुखच्या साथीनं बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलं. तो काळ नव्वदच्या दशकातला होता.

- Advertisement -

आता २५ वर्षांनंंतर परिस्थिती कमालीची बदलली असल्याचं अशाच कथानकाचा ‘लवयात्री’ पाहताना जाणवतं. प्रेमकथेतला हाणामारी, गोळीबार, अ‍ॅक्शन सीन, श्रीमंत, प्रतिष्ठित आणि शेकडो गुंड पाळणार्‍या खलनायिकी ढंगातला हिरॉईनचा बाप आणि ‘दो वक्त की रोटी’च्या विवंचनेत असलेला गरीब घरातला मुलगा, त्याला त्याच्या आईनं शिलाई मशिनवर कामं करून बहुतेकदा मोठं केलेलं असतं. त्यांच्यातलं कॉलेजातलं प्रेम आणि त्याला आड येणारी दोघांमधली आर्थिक दरी…‘प्यार अमिरी गरीबी नही देखता…’असले तद्दन पिटातल्या प्रेक्षकांच्या शिट्ट्या मिळवणारे डायलॉग. ऐंशीच्या दशकातल्या ‘बेताब’, ‘लव्हस्टोरी’, ‘आग ही आग’ची ही परंपरा ‘लवयात्री’ने आता पुढे चालवली आहे. पण काळ बदललाय.

त्यामुळे हिरॉईनच्या बापाने पाठवलेले सुपारीबाज गुंड हिरोला बदडत असताना छोड दो मेरे…..(इथं हिरोचं नाव असतं) त्यानंतर दंडाला पकडून आलिशान मर्सिडीज गाडीत ढकललेली नायिका घरी गेल्यावर आपल्या खोलीत जाऊन बेडवर उडी मारून उशीत तोंड खुपसून रडणारी नायिका…मग मुलगी आणि श्रीमंत बापात झालेले दोघांच्या प्रेमाच्या आड येणार्‍या आमिरी गरिबीवरील पल्लेदार भावनिक डायलॉगबाजीत आताच्या तरुणाईला इंट्रेस्ट नाही. त्यामुळे हे सगळं ‘लवयात्री’त दिग्दर्शक अभिराज मिनावालानं कौशल्यानं टाळलंय. पण हे करताना सिनेमा रटाळ होतो. कथेचाच जीव छोटा असल्यानं त्यावर दोन तासांच्या पटकथेची बांधणी करताना निरेन भटच्या कथेचा ‘लवयात्री’, संवादात सिनेमा फसला आहे.

- Advertisement -

सुश्रुत (आयुष शर्मा) आणि मनिषा (वरिना हुसैन) यांच्यातलं पहिल्या नजरेतलं प्रेम जुळतं ते गुजरातमधल्या शहरातल्या एका गरब्यात. या गरब्यात हिरो म्हणजेच सुश्रूत गरब्यातला नाच शिकवणारा एक साधा सरळ मुलगा.. तर मनिषा ही डॉलर्स, पौंडमध्ये कमावणार्‍या बापाची एकुलती एक मुलगी..गरब्यातच त्यांच्यात प्रेम होतं. मग पुन्हा दोघांमध्ये दोघांचा आर्थिक स्तर आडवा येतो, त्यातून मतभेद होतात. मग नायिका रागावून तावातावानं अमेरिका असलेल्या परदेशात निघून जाते. आता नायक तिला कसा, कुठं, केव्हा शोधून काढतो हे पडद्यावर पहायला हवं.

चित्रपटाचा पडदा गरब्याच्या प्रसंगामुळे सुंदर होतो. कपड्यांवर नक्षीदार आरसे लावलेले छान छान कपडे घातलेले नायक नायिका, गरब्यातली गाणी, पुन्हा लंडनचं लोकशेन, तरुण-तरुणींच्या छान छान मित्र-मैत्रिणी, सोबतीला गरब्यातला गाण्याचा ताल…रोमँटीक वातावरणातली गाणी, असलं सगळं चित्रपटांत आहे. त्यामुळे अशा गोष्टींवरच प्रेक्षकांना अवलंबून राहावे लागते. चित्रपटात विशेष काही घडत नाही. त्यामुळे कुणाचं काहीही अडत नाही. ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ बनवताना अली अब्बास जफरला अभिराजनं दिग्दर्शनात असिस्ट केलं होतं. ‘लवयात्री’मध्ये आपली छाप पाडण्याचा त्याचा प्रयत्न कौतुकाचा आहे. पण कथेचा जीवच छोटासा असल्याने हा गरबा पुरेसा रंगत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -