घरमुंबईएकला चलो रे

एकला चलो रे

Subscribe

रविवारपासून उध्दव ठाकरेंचा लोकसभा  निवडणूक झंझावात, नगरपासून सुरूवात

सत्तेत राहूनही भाजपशी दोन हात करण्याची हाक देणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या निवडणूक दौर्‍यावर जात आहेत. रविवारी त्यांचा हा दौरा नगरपासून सुरू होत आहे. हा दौरा म्हणजे आगामी काळात सेनेच्या एकला चलो रे! धोरणाचा भाग मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीच्या दौर्‍यात मिशन -२०१९चा पाया रचल्याचे स्पष्ट झाल्यावर उध्दव ठाकरे यांनी आपल्या दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यासाठी नगर जिल्ह्याचीच निवड केली आहे. पंतप्रधानांच्या दौर्‍यात राज्यातील संभाव्य दुष्काळाच्या मदतीची घोषणा होईल, अशी चर्चा होती. पण त्यांनी यासंबंधी एक शब्दही काढला नाही. उलट जलयुक्त शिवारची भलामण करत दुष्काळापासून १६ हजार गावं वाचली अशी मखलाशी केली. हा संदर्भ उध्दव ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील दौर्‍याचा असेल, असे बोलले जात आहे.
 राज्यात आणि देशात सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करणार्‍या शिवसेनेने दसरा मेळाव्यात भाजपवर जोरदार टीका केली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा सेनेने याआधीच केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीची घोषणा करत नोव्हेंबरच्या २५ तारखेला अयोध्येत जाण्याची तयारी ठाकरेंनी केली होती. भाजपवर निशाणा साधणार्‍या सेनेकडून आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली जात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपर्क दौरा जाहीर केला आहे.
येत्या २१ तारखेला म्हणजेच रविवारी उध्दव आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांसह शिर्डी आणि नगर जिल्ह्यात रवाना होत असून, त्यांच्या सोबत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आणि आणि आमदार सुनील शिंदे उपस्थित राहणार आहेत. पहिल्या टप्प्यातील दौरा तीन दिवसांचा असून, पहिल्या दिवशी नगर जिल्ह्याची निवड करताना सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याचा संदर्भ नजरेसमोर धरला आहे. राज्यात दुष्काळाची झळा निर्माण झाली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची काडीची दखल घेतली नसल्याची बाब या दौर्‍यात लोकांच्या लक्षात आणून दिली जाणार आहे. मोदी यांनी दुष्काळानिमित्त काय मदत करणार यासंबंधी काहीच वाच्यता केली नाही. उलट सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची भलामण करताना मोदींनी १६ हजार गावं दुष्काळातून बाहेर आल्याचा दावा केला. मोदींच्या या दाव्याचा उध्दव नगरमध्ये पोलखोल करतील आणि भाजप सरकारला घरचा आहेर देतील, असे बोलले जाते.
या दौर्‍यात उध्दव ठाकरे शेतकर्‍यांसह कामगार, शेतमजुरांच्या विविध अडचणींबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पिचलेल्यांना मदतीच्या निमित्ताने सेनेच्या गटप्रमुखाचे मेळावे ही उद्धव ठाकरे घेणार आहेत. हे करताना लोकसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावाही उध्दव घेणार आहेत. उध्दव ठाकरेंच्या या दौर्‍यात विभागीय नेते, पालकमंत्री,संपर्क प्रमुख सहभागी होणार आहेत. नगरचे विभागीय नेते शिवसेना मंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर,आमदार सुनिल शिदे तर शिरूर, मावळ विभागीय दोर्‍यात खासदार संजय राऊत,संपर्क प्रमुख बाळा कदम आणि बीड,औरंगाबाद,लातूरचे विभागीय नेते खासदार चंद्रकांत खैरे संपर्कप्रमुख सुधीर मोरे,विठ्ठल गायकवाड, विनोद घोसाळ्कर या शिवसेना नेत्यांवर लोकसभा विभागीय मतदारसंघाची जवाबदारी देण्यात आली आहे.

उमेदवारांचीही चाचपणी

या दौर्‍यात उध्दव ठाकरे स्थानिक प्रश्नांबाबत जाणून घेतील. आपल्या मंत्र्यांकडून सोडवायच्या प्रश्नांबाबत ज्येष्ठ मंत्र्यांना अवगत करतील आणि सैनिकांशी संवाद साधत आगामी निवडणुकीतील ताकदीचा अंदाज घेतील. याशिवाय सेनेच्यावतीने उमेदवारी द्यायच्या कार्यकर्त्यांचीही चाचपणी केली जाण्याची शक्यता आहे.
भाजप आणि पंतप्रधान टार्गेट
या दौर्‍यात उध्दव ठाकरे यांच्याकडून सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधतील, असे सांगण्यात आले. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याऐवजी महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्याची चर्चा आहे. यावर उध्दव ठाकरे हल्लाबोल करतील. मोदींच्या शिर्डीत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्येच दौर्‍याला सुरुवात करून उध्दव मोदींना टार्गेट करतील.
पहिला टप्पा नगर ते मराठवाडा
21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या दरम्यान योजण्यात आलेला उध्दव ठाकरेंचा दौरा हा नगरपासून सुरू होईल आणि मराठवाड्यात संपेल. बीड, औरंगाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये उध्दव ठाकरेंच्या दौर्‍याची सांगता होईल. मराठवाड्याच्या दौर्‍यात उध्दव स्थानिक शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील. सेनेच्यावतीने करायच्या मदतीचा अंदाज घेतील आणि त्याची आखणी करतील. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेनेच्या विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांशी चर्चा करून मदतीसंबंधी मार्गदर्शन करतील.

उध्दव ठाकरेंचा दौरा महामेळावा

रविवारपासून सुरू होणार्‍या उध्दव ठाकरेंच्या या दौर्‍याला आम्ही महामेळावा म्हणून गणतो. या दौर्‍यात पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, आगामी निवडणुका लढवण्यासाठी सज्ज होणे, एकहाती निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. 
-भाऊ कोरगावकर,संपर्कप्रमुख, नगर जिल्हा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -