घरमुंबईप्रचाराच्या रणधुमाळीत काव्यातून आरोप-प्रत्यारोप

प्रचाराच्या रणधुमाळीत काव्यातून आरोप-प्रत्यारोप

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला असून सर्वत्र प्रचारसभांमध्ये नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे आरोप-प्रत्यारोप मात्र कवितांच्या माध्यमातून होऊ लागले आहेत. तसेच सोशल मीडियामधूनही या कवितांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: ‘ट्वीटर’मधून या राजकीय कवितांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांच्या कवितांतून होणारे आरोप-प्रत्यारोप मतदारांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सरार्सपणे एकमेकांवर टीका केली जाते. यासाठी आतापर्यंत नेते मंडळीकडून सभा आणि परिषदांच्या माध्यमातून सर्रासपणे टीका केली जाते. पण आता हे चित्र बदलत चालले आहे, नेते मंडळींकडून ट्वीटरवर आणि सोशल नेटवर्कींग साईटवर कवितेच्या माध्यमातून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुळात केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे अनेकवेळा आपल्या भाषणांमधून कविता करत राजकीय कोट्या करत असतात. त्यांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता सध्या अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी चारोळी आणि कवितेचा वापर करण्याचा नवा फंडा सुरू झाला आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कवितेच्या माध्यमातून भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर टीका करताना कवितेतून निशाणा साधला. सावंतांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर पोस्ट लिहिताना ‘आठवले झाले गुरू चेला त्यांचे शेलार, दोघांनाही काम नाही कविता करतात टुकार, मोदी-शाह जोडीला म्हणा शिक्षा भोगा आता, जनतेला फसवलेत ऐका यांच्या कविता’, अशा शब्दात टीका केली. या टीकेला शेलार यांनीदेखील कवितेतूनच उत्तर दिलेे.

शेलार यांनी यावेळी म्हटले की, ‘सत्तार’ आळवत बसलेत नाराजीचा सूर, सातव मैदान सोडून गेलेत कुठेतरी दूर, हर्षवर्धन जाधवांचे सगळेच झालेय बेसूर, सूने सूने झालेय एका पाटलांना इंदापूर, नांदेडचे अशोकवन वाचवायला राष्ट्रीय अध्यक्षासह इंजिनाचा काळा धूर!, चौकीदारामुळे ‘कितने सपने हुए चुरचुर!’ अशी कविता केली. दरम्यान, शेलार आणि धनजंय मुंडे यांच्यातही याआधी अशाच प्रकारे काव्यातून जुगलबंदी रंगली होती. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘मोदीजी पहले मुद्दे पर आये’, या कवितेतून आगपाखड केली.

- Advertisement -

व्यंगचित्रांद्वारेही होतेय टीका
प्रचाराच्या रणधुमाळीत कवितेसह सध्या व्यंगचित्रातूनही आरोप-प्रत्यारोप करण्याचा नवा फंडा सुुरू झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून विरोधकांची पोलखोल करण्यासाठी व्यंगचित्राचा वापर करण्यात आला, याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता इतर पक्षांनी देखील व्यंगचित्राचा वापर सुरू केला आहे. यात मनसे आणि भाजप आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -