घरमुंबईग्रामीण भागातील लालपरीला घरघर !

ग्रामीण भागातील लालपरीला घरघर !

Subscribe

पाच वर्षांत ३ हजार ५८३ कोटींचा तोटा

एसटी महामंडळाचे ढिसाळ नियोजन, अकार्यक्षमता, राज्यातील अवैध वाहतूक आणि कर्मचार्‍यांच्या वेतन करारामुळे एसटीचे चाक अधिकच खोलात जात आहे. २०१८-१९ आर्थिक वर्षात एसटीला ९६५ कोटींचा तोटा झाला आहे. मागील पाच वर्षांत एसटीला सरासरी ३ हजार ५८३ कोटींचा तोटा झाल्यामुळे ग्रामीण भागातील लालपरीला भिकेचे डोहाळे लागले आहेत.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हाती एसटी महामंडळाची सूत्रे येताच ग्रामीण भागातील एसटीला ‘अच्छे दिन’ येणार अशी आशा सर्वांना वाटत होती. दिवाकर रावते यांनी ‘शिवशाही’ आणि ‘विठाई’सारखे मोठे प्रकल्प सुरू केले. एसटीची १८ टक्के भाडेवाढ करून एसटीचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोटा कमी झाला नाही. मार्च २०१८ ते मार्च २०१९ चे आर्थिक वर्ष संपले आहे. या एका वर्षात एसटीला ९६५ कोटी तोटा झाला आहे. त्यामुळे पूर्वी २५०० कोटींचा असलेला तोटा आता ३ हजार ५८३ कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहे. २०१७-१८ च्या अखेर एसटीला ३३६८ कोटीचा संचित तोटा होता. ३१ मार्च २०१९ च्या अखेरीस हा संचित तोटा ४६३४ कोटी असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले होते. त्यामुळे २०१८- १९ मध्ये एकूण ९६५ कोटी तोटा एसटीला झाला आहे.

- Advertisement -

एकीकडे एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १४ जून २०१८ पासून एसटीची १८ टक्के भाडेवाढ केली. या भाडेवाढीमुळे एसटीला 1 हजार ते 1200 कोटीपर्यंत अतिरिक्त महसुलामधून तोटा भरून निघेल, अशी आशा होती. मात्र अर्थसंकल्पातील अंदाजात तसे काही चित्र दिसून येत नाही. वाढणारा इंधन दर, एसटी कर्मचार्‍यांचा वेतन करार आणि एसटीच्या प्रवाशांमध्ये होणारी घट ही एसटी महामंडळाच्या वाढत्या तोट्यामागील मुख्य कारण आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली.

खासगीकरणामुळे तोटा
एसटी हे निमसरकारी महामंडळ असूनही आशिया खंडात प्रवासी सेवेच्या बाबतीत कायमच १ नंबरवर राहिले होते. परंतु अलीकडच्या काळात वाढलेली खाजगी वाहतूक, एसटी प्रशासनाचा नियोजनचा अभाव, सरकारचे एसटीकडे दुर्लक्ष यामुळे एसटी महामंडळात खाजगी कंत्राटदारामुळे एसटीच्या तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नव्हे तर एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये हायटेक वातानुकूलित शिवनेरी, अश्वमेध व शिवशाही बसेसचा समावेश झाला आहे. या बस अपघातामध्ये नादुरुस्त झाल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था आपल्या कार्यशाळेत नाही. त्यामुळे त्या बसेस खाजगी कार्यशाळेत दुरुस्त करण्यासाठी येणार्‍या खर्चामुळेसुद्धा एसटीला तोटा होत आहे.

- Advertisement -

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मागील तीन वर्षांपासून एसटीतील अनेक कामे खासगी कंत्राटदारांना दिल्यामुळे एसटी तोट्यात जात आहे. परिवहन मंत्र्यांनी खासगी कंत्राटदारांचे हित जपल्याने आज सर्वसामान्यांची एसटी तोट्यात गेली आहे. त्याला ते जबाबदार आहेत.
– मुकेश तिगोटे, अध्यक्ष, एसटी कर्मचारी संघटना
===================
संचित तोटा / तोटा
=====================
2014-15 – 1685 / 391 कोटी
2015-16 – 1807 / 121 कोटी
2016-17 -2330 / 522 कोटी
2017-18- 3368 / 1584 कोटी
2018-19- 4634/ 965 कोटी
====================

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -