घरदेश-विदेशमोदींच्या पहिल्याच सभेचा फियास्को!

मोदींच्या पहिल्याच सभेचा फियास्को!

Subscribe

मोदींचा करिष्मा शहरी भागातच , ४८ पैकी 32 मतदारसंघ ग्रामीण भागात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील वर्धा येथे झालेल्या पहिल्या सभेकडे राज्यातील जनतेचे मोठे लक्ष लागले होते. मात्र सुमारे 18 एकरचे स्वावलंबी मैदान सोमवारी अर्धेही न भरल्याने आणि मोदींचे भाषण सुरू असताना उरलेल्या लोकांनी मैदान सोडल्याने मोदींच्या सभेचा फियास्को झाल्याचे दिसून आले.विदर्भातील दहा लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारच्या सभेतून केला गेला. महाराष्ट्रात ४८ मतदार संघांपैकी १६ मतदारसंघ शहरी भागात असून ३२ मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. मात्र ७ खासदार एकत्र येऊन जेवढी गर्दी जमायला हवी होती, ती गर्दी जमलेली दिसली नाही. पंतप्रधानांच्या सभेला मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोदींच्या राज्यात एकूण ८ सभा होणार आहेत.

स्वावलंबी हे सुमारे 18 एकरचे मैदान असून ते पूर्ण भरेल या अपेक्षेने सारी व्यवस्था करण्यात आली होती. मैदानाच्या पाऊण भागात खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. सभास्थळी सकाळपासून कार्यकर्त्यांचा ओघही सुरू झाला. मात्र, सभा सुरू झाली तरी अर्धे मैदानही भरले नाही. एका बाजूच्या खुर्च्या तसेच मैदानाची मागील बाजू पूर्णपणे रिकामीच होती.
2014 साली झालेल्या निवडणुकीची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यातच घेण्यात आली होती. मोदींच्या त्या सभेला अलोट प्रतिसाद मिळाला होता. या निवडणुकीमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले.

- Advertisement -

वर्धा भाजपसाठी लकी ठरत असल्याने यावेळी राज्यातील प्रचाराचा शुभारंभ देखील वर्ध्यातच करण्यात आला. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींची या वर्षीच्या निवडणूक प्रचारातील पहिली जाहीर सभा झाली. मात्र 18 एकरच्या या मैदानाचा अर्ध्याहून अधिक भाग रिकामाच होता. मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचा आकार 27 एकर इतका आहे. म्हणजेच शिवाजी पार्क अर्धे भरेल इतकी गर्दीही मोदींच्या पहिल्या सभेला नव्हती.

या सभेतील रिकाम्या मैदानावरुन आयोजकांना अपेक्षित असणारी गर्दी सभेला न आल्याची चर्चा आहे. उन्हाळा आणि सभेच्या ठिकाणी मंडप नसल्याने अनेकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचीही चर्चा आहे. याआधी 28 मार्च रोजी मोदींनी लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग मेरठ येथील सभेमधून फुंकले. त्या सभेतही मागील बाजूला खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून मंडपाची व्यवस्था न करता भर उन्हात ही सभा घेण्यात आल्याने सभेला अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही, असे सांगितले जात असले तरी वर्ध्याच्या सभेतील मोकळे मैदान भाजपची चिंता वाढवणारे ठरले आहे.

पुतण्याच्या हातून शरद पवारांची हीट विकेट-मोदी
शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हीट विकेट गेली, अशी टीका करतानाच पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत, कारण त्यांना हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे माहित आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. भारतीय जनता पक्षाने भल्याभल्यांना मैदानातून पळवून लावले, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी वर्धा येथे महाराष्ट्रातील पहिली निवडणूक प्रचार सभा झाली. सभेत मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केले. मोदी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या खूप मोठे कौटुंबिक युद्ध सुरू झाले आहे. पवार यांचा पुतण्या पक्ष ताब्यात घेऊ पाहात आहे. शरद पवार यांची पक्षावरील पकड सुटत चालली आहे. याच कौटुंबिक युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारांना तिकिटे देण्यातही अडथळे आले. कोणाला कुठली जागा द्यावी, कुठून लढावे हा मोठा प्रश्न पवारांपुढे उभा राहिला. यामुळे पक्षातील इतर नेते नाराज झाले आहेत.

शरद पवार हे देशात सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक समजले जातात. ते जे काही बोलतात, जे काही करतात, ते-ते विचारपूर्वक करत असतात. अशा शरद पवार यांनी यावेळी निवडणुकीची हवा कोणत्या दिशेला वाहतेय हे लक्षात आल्यानेच ते मैदान सोडून पळाले आहेत, अशी तोफ मोदींनी डागली. शरद पवार हे शेतकरी कुटुंबातील असून देखील ते शेतकर्‍यांना पूर्णपणे विसरले आहेत. त्यांचे शेतकर्‍यांवर जराही लक्ष नाही. शेतकर्‍याना न्याय द्यायचा सोडून याच पवार कुटुंबाने शेतकर्‍यांवर थेट गोळ्या चालवण्याचेच आदेश दिले. शेतीला पाणी हवे म्हणून शेतकर्‍यांनी आपल्या समस्या अजित पवार यांच्यापुढे ठेवल्या. मात्र, यावर त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी अजित पवार काय म्हणाले तुम्हाला माहीत आहे ना?, ते काय म्हणाले हे मी व्यासपीठावरून बोलू शकणार नाही. कुणीही बोलू शकणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागील सरकार भ्रष्ट सरकार होते. पैसे खाण्याचेच काम त्या सरकारने केल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सिंचन योजना, मुंद्रांक शुल्क घोटाळा, रस्ते विकासाचा घोटाळा, सरकारी टेंडरमधून घोटाळा, असे अनेक घोटाळे करून त्यांनी पैसा कमावला आणि पैसा मिळाल्यानंतर कुंभकर्णासारख्या झोपा काढल्या, अशी टीका मोदींनी राज्यातील मागील काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारवर केली.

काँग्रेसने देशाला ५० वर्ष एप्रिल फूल केले-मुख्यमंत्री
पीकविम्यात शेतकर्‍यांना दुप्पट फायदा झाला. विदर्भात थेट मदतीमध्ये पाचपट फायदा झाला. मागच्या सरकारने वर्ध्यातल्या शेतकर्‍यांना ५२ कोटींची कर्जमाफीची रक्कम दिली. आमच्या सरकारमध्ये ४९८ कोटी इथल्या शेतकर्‍यांना मिळाले. १ एप्रिलला नवीन वहीखातं तयार होतं. नव्या वहीखात्यात मागच्यावेळीपेक्षा जास्त प्रेम द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मोदींना हरवण्यासाठी काँग्रेस-एनसीपीने ५६ पक्षांची आघाडी केली. पण त्यांना हे माहीत नाही की देश चालवायला ५६ पक्ष नाही, तर ५६ इंचाची छाती लागते. आता लोक म्हणतात हे मोदींचे राज्य आहे. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने कुणी पाहू शकत नाही. ज्यांनी तसा प्रयत्न केला, त्यांचे काय होते, हे बालाकोटमध्ये सगळ्या जगाने पाहिले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वर्ध्याचे 18 एकरचे स्वावलंबी

*मैदान अर्धे रिकामे * मोदींचे भाषण सुरू असताना लोकांनी मैदान सोडले.
*शिवाजी पार्क अर्धे भरेल
*इतकीही गर्दी नव्हती स्वावलंबी मैदानात.
*विदर्भातील 10 लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा. मात्र दहा खासदार एकत्र येऊन देखील लाखभर सुद्धा गर्दी जमली नाही.
*2014ला वर्ध्यातच मोदींनी घेतलेल्या पहिल्या सभेला तुफान प्रतिसाद मिळाला होता, मात्र यावेळी तसे न झाल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
*संपूर्ण मैदानात मंडपाची व्यवस्था न करता भर उन्हात सभा घेतल्याने सभेला अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही, अशी सारवासारव भाजपकडून केली जाते आहे.
*28 मार्चला मोदींच्या पहिल्या सभेला मेरठलाही खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे मोदींचा करिष्मा शहरी भागातच दिसून येतो.

शिवसेना-भाजप युतीच्या या उमेदवारांसाठी मोदींची सभा
बुलढाणा -प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला – संजय धोत्रे (भाजप)
अमरावती – आनंदराव अडसूळ (शिवसेना)
वर्धा -रामदास तडस (भाजप)
भंडारा-गोंदिया -सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूर – अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर – हंसराज अहिर (भाजप)

आता शिवाजी पार्कवरील सभेची उत्सुकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवातही वर्धा येथूनच केली होती. तसेच त्यावेळी हे स्वावलंबी मैदान लोकांच्या गर्दीने ओसंडून गेले होते. मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींची पहिली सभा वर्ध्यातच आणि त्याच स्वावलंबी मैदानात पार पडली, परंतु त्यावेळी तुलनेने गर्दी फारच कमी झालेली दिसली. स्वावलंबी मैदान 18 एकर इतक्या भव्य जागेवर विस्तारले आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे लोकांनी सभेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. मात्र, पंतप्रधानांची शिवाजी पार्कवरील शेवटची सभा मुंबई येथे होणार आहे. शिवाजी पार्क मैदान सुमारे 27 एकर जागेत असल्याने मोदी यांच्या महाराष्ट्रातील पुढच्या सभेची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -