घरमुंबईशिवसेना येथे तलवार घेऊन उभी; सामनातून भाजपला इशारा

शिवसेना येथे तलवार घेऊन उभी; सामनातून भाजपला इशारा

Subscribe

शिवसेना येथे तलवार घेऊन उभीच आहे! असा सज्जड दमच सामनाच्या अग्रलेखातून भाजपला भरण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शिवसेनेचे राज्य हवे आहे. हे आम्ही फक्त मुद्द्यांचेच बोलत आहोत. कुणी गुद्द्यांवर येणार असेल तर आम्ही त्यालाही उत्तर देऊ. गुंडांचा धाक व पैशांचा प्रसाद कोणी वाटणार असेल तर मर्द मरगट्टा मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. नैतिक मूल्यांवर जर राजकारण आधारले नाही तर अन्याय, भ्रष्टाचार आणि अत्याचार यांना राजकारणाचे संरक्षण मिळतच राहणार. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवून कुणालाही राज्य आणता येणार नाही. शिवसेना येथे तलवार घेऊन उभीच आहे! असा सज्जड दमच सामनाच्या अग्रलेखातून भाजपला भरण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच

सत्तास्थापने वरुन भाजपला सज्जड दम भरण्याबरोबर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचासुद्धा समाचार घेतला आहे. ‘भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार ‘गोड बातमीचे’ दाखले देत आहेत. आता ही ‘गोड बातमी’ म्हणजे नेमकी कोणती? सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे ‘लग्न’ वगैरे ठरले आहे? त्यासाठी ते लाडवाची की बासुंदीची जेवणावळ देणार आहेत. शेवटी आपल्याकडे गोड बातमीचा संबंध लग्न किंवा बारसे याच्याशीच जोडला जातो. अर्थात ‘गोड बातम्यां’चे कितीही दाखले दिले तरी ‘पाळणा’ हलणार का? तो कसा हलेल? हे प्रश्न आहेतच. असे प्रश्न उपस्थित करत, आता महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच गोड बातमी अपेक्षित आहे ती म्हणजे, ‘शिवसेनेचा’ मुख्यमंत्री शपथ ग्रहण करणार आहे.’ असे ठामपणे सामनामध्ये म्हटले आहे. कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्याचा समाचार आज सामनातून घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -