घरफिचर्सचतुरस्त्र गायक

चतुरस्त्र गायक

Subscribe

जितेंद्र अभिषेकी यांचा ७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळूबुवा यांचे पुत्र म्हणून त्यांचे आडनाव अभिषेकी झाले. २१ सप्टेंबर १९२९ रोजी अभिषेकींचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे वडील भिकाजी कीर्तनकार होते. वडिलांना कीर्तनात लहानपणी साथ केल्याने स्वर, ताल, लय व उच्चार यांची त्यांना चांगली जाण आली. संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांनी जितेंद्रांना दिले.

जितेंद्र अभिषेकी यांचा ७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळूबुवा यांचे पुत्र म्हणून त्यांचे आडनाव अभिषेकी झाले. २१ सप्टेंबर १९२९ रोजी अभिषेकींचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांचे वडील भिकाजी कीर्तनकार होते. वडिलांना कीर्तनात लहानपणी साथ केल्याने स्वर, ताल, लय व उच्चार यांची त्यांना चांगली जाण आली. संगीताचे सुरुवातीचे धडे त्यांनी जितेंद्रांना दिले. संगीताबरोबर संस्कृत भाषाही त्यांना शिकविली. बांदिवड्याच्या गिरिजाबाई केळेकर या त्यांच्या पहिल्या गुरू. शालेय शिक्षणासाठी १९४३ साली ते पुण्यात आले. १९४९ मध्ये ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मराठी, कोंकणी, पोर्तुगीज, इंग्रजी आदी भाषा त्यांना अवगत होत्या. पुण्यात नरहरबुवा पाटणकर व यशवंतराव मराठे यांच्याकडे ते गाणे शिकले. तेथून ते बेळगावला गेले व तेथे पेटीवादक विठ्ठलराव कोरगावकरांकडून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. पुढे भवन्स कॉलेज, मुंबई येथून संस्कृत विषय घेऊन ते बी.ए. झाले (१९५२). मुंबई आकाशवाणी केंद्रात कोंकणी विभागात संगीत संयोजक म्हणून ते रूजू झाले (१९५२). नोकरी करीत असतानाच उस्ताद अझमत हुसेन खाँसाहेब यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना मिळाली. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर (१९५९) ज्येष्ठ गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्याकडून त्यांना दीर्घकाळ तालीम मिळाली. याबरोबरच अभिषेकी यांनी निवृृत्तीबुवा सरनाईक, रत्नाकर पै, अझिझुद्दीन खाँ, मास्टर नवरंग, केसरबाई बांदोडकर इत्यादींकडून मार्गदर्शन घेऊन आपली गायकी अधिक समृद्ध केली. त्यानंतर त्यांनी गुलुभाई जसदनवालांकडून जयपूर घराण्याच्या गायकीची काही वैशिष्ठ्ये आत्मसात केली. विविधांगी व्यासंगामुळे आपली अशी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. गमकयुक्त स्वरावली, प्रतिमेचा स्वतंत्र आविष्कार, उत्कट, भावनापूर्ण आणि सौंदर्यप्रधान प्रस्तुती, रागभावाला आणि रागस्वरूपाला योग्य स्वराकृती देत केलेले आम आणि अनवट रागांचे गायन आदी गोष्टींमुळे त्यांचे सादरीकरण अविस्मरणीय होत असे.
अभिषेकी अगदी सहजपणे नाट्यगीते, अभंग, भावगीत, ठुमरी, दादरा, कजरी, टप्पा आदी उपशास्त्रीय प्रकार रंगवीत. स्पष्ट उच्चारण पद्धतीने विशिष्ट शैलीत ते अभंग म्हणत. त्यांची अभंग गायनाची पद्धती चित्तवेधक होती. त्यांच्या या गायनात वारकरी संप्रदायाप्रमाणे नामसंकीर्तनाची छटा अधिक असे. ते नाट्यगीते शांत, सुंदर व एका विशिष्ट लयीत आणि अर्थानुकूल चालीत म्हणत. मैफलीत ते विशेषकरून अनवट रागांतील (उदा. खोकर, जैत, चारुकेशी, कौंसगंधार, मिश्र शिवरंजनी इत्यादी) नवनव्या बंदिशी सादर करीत असत. ‘श्यामरंग’ या टोपणनावाने त्यांनी विविध रागात बंदिशी केल्या.
लोणावळा या गिरीस्थानात गुरुकुल पद्धतीने त्यांनी सुमारे दहा वर्षे संगीताचे शिक्षण दिले. पुढे पुण्यात स्थायिक झाल्यावरही (१९८७) त्यांनी काही शिष्यांना गुरूकुल पद्धतीने संगीत शिक्षण दिले. ‘तरंगिणी प्रतिष्ठान’ हा विश्वस्त न्यास स्थापण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वृद्ध कलावंतांना मदत आदींसाठी हा निधी होता. होमी भाभा संशोधन केंद्राकडून ‘लोकनाट्यातील संगीत’ या विषयावरील संशोधनासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याद्वारे त्यांनी प्रदेशपरत्वे कुडियाट्टम, मोहिनीआट्टम्, कथकळी, माच, नौटंकी, दशावतार इत्यादी लोकनाट्यातील संगीताचा अभ्यास केला. १९७० मध्ये पं. रविशंकर यांच्याबरोबर ते अमेरिकेस गेले. तेथे सुमारे पाच ते साडेपाच महिने त्यांनी ‘किन्नरम’ या त्यांच्या संस्थेत विद्यादानाचे कार्य केले. पं. जितेद्र अभिषेकी गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कार भारतीचे सदस्य होते. चिपळूण येथे झालेल्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते (१९९५). त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यामध्ये होमी भाभा पुरस्कार (१९६९), नाट्यदर्पण पुरस्कार (१९७८), पद्मश्री सन्मान (१९८८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), गोमंतक मराठी अकादमी पुरस्कार (१९९२), सूरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (१९९६), मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार (१९९६), स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (१९९६), बालगंधर्व पुरस्कार (नाट्य परिषद, १९९७) इत्यादींचा समावेश होतो. पुणे येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -