घरमुंबईआमदार गोगावलेंनी २ लाखाच्या हप्त्यासाठी वाहतूकदाराला धमकावले

आमदार गोगावलेंनी २ लाखाच्या हप्त्यासाठी वाहतूकदाराला धमकावले

Subscribe

आमदारपुत्राविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

महाड येथील आमदाराने वाहतुकदाराला मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून २ लाख रुपये मासिक हप्त्याची मागणी केली, मात्र हप्ता देण्यास नकार देणार्‍या वाहतुकदाराला धमकी दिल्याप्रकरणी आमदार पुत्राविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी महाड येथे या वाहतुकदाराच्या ट्रकची तोडफोड करण्यात आली आहे. या ट्रकची तोडफोड आमदाराच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप वाहतुकदाराने केला आहे. या तोडफोडी प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ ते ६ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भरत गोगावले असे महाडचे शिवसेनेच्या आमदाराचे नाव असून मंगळवारी त्यांनी भांडुप येथे राहणारे वाहतूकदार राजेश शेटकर यांना मरिन ड्राइव्ह येथील एका पंचतारांकीत हॉटेलात भेटण्यासाठी बोलावले होते. राजेश शेटकर हे आमदार गोगावले यांना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेटण्यासाठी गेले, त्यावेळी आमदार यांच्यासोबत त्यांचा मुलगा विकास हा देखील हॉटेलमध्ये हजर होता. आमदार भरत गोगावले यांनी वाहतूकदार राजेश शेटकर यांच्याकडे महाड, न्हावाशेवा येथून वाहतूक करायची असल्यास तर दरमहा २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.

- Advertisement -

निवडणूक जवळ आल्या असून पैसे लागणार आहे, इतर वाहतूकदार देखील आम्हला पैसे देतात तुम्ही देखील द्या, असे म्हटल्यावर वाहतूकदार राजेश शेटकर यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. वाहतूकदार शेटकर यांनी दिलेल्या नकारावरून आमदार पुत्र विकास यांनी तू महाडमधून वाहतूक कशी करतो तेच बघतो, तुझा एकही ट्रक राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे वाहतूकदार राजेश शेटकर यांनी दै. ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

शेटकर हॉटेलमधून बाहेर पडताच त्यांना महाड एमआयडीसी येथे त्यांचे ट्रक काही गुंडांनी अडवून एका ट्रकची तोडफोड केली असल्याचे राजेश शेटकर यांना समजले, त्यांनी तेथील पोलीस अधीक्षक यांना फोन करून या घटनेची माहिती देऊन महाड एमआयडी पोलीस ठाण्यात वाहतूकदार शेटकर यांच्या ट्रक चालकाने तक्रार केली.

- Advertisement -

दरम्यान वाहतूकदार राजेश शेटकर यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाणे गाठून आमदार पुत्र विकास यांच्या विरुद्ध तक्रार दिली असून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी विकास गोगावले यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आमदार पुत्र विकास यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -