घरमुंबईमुलाने आत्महत्या करण्यापूर्वी आईची केली हत्या

मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी आईची केली हत्या

Subscribe

मीरा रोड परिसरामध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुलानेच आईची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याची बाब त्याच्या लॅपटॉपवर लिहिलेल्या सुसाईड नोटमधून उघड झाली आहे.

मुंबईच्या जवळच असणाऱ्या मीरा रोड परिसरामध्ये मंगळवारी सकाळी एका बंद फ्लॅटमध्ये वृद्ध आई आणि मुलगा असे दोन मृतदेह आढळून आले. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. फ्लॅटमध्ये मृतदेहाजवळच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या नोटवरूनच मयत दोघे आई आणि मुलगा असल्याचं स्पष्ट झालं. तसंच, मुलानेच आपल्या आईची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचं देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासही सुरु केला आहे.

- Advertisement -

मृत महिलेचे नाव मीनाक्षी अय्यर (वय ७५) असून मुलाचं नाव व्यंकटेश्वरम अय्यर (वय ४२) असं आहे. २०१७ मध्ये व्यंकटेश्वरम हा आपल्या आईसोबत मुंबईत आला होता. हे दोघेजण मीरा रोड येथील मॅरीगोल्ड अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. एप्रिल महिन्यात त्यांच्या घराची भाडे कराराची मुदत संपली होती. पण घरमालकाकडे अय्यर कुटुंबाने काही दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. ‘आमचं महत्त्वाचे काम असल्याने आम्हाला काही दिवस या घरात राहू देत’, असे अय्यर कुटुंबाने घरमालकाला सांगितले. त्यांची विनंती घरमालकाने मान्य केली होती.

धारदार शस्त्राने आईची हत्या

‘मुलाने आत्महत्या करण्याआधी धारदार शस्त्राने आईची हत्या केली होती. त्यानंतर मुलाने स्वतः आत्महत्या केली. शेजारी असणाऱ्या कुटुंबाला अय्यर यांच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली’, असे पोलीस अधिकारी शेखर डोंबे यांनी सांगितले. पोलिसांना माहिती मिळताच क्षणी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी अय्यर यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाज तोडला. घरात मीनाक्षी अय्यर यांचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर व्यंकटेश्वरम याच्या मृतदेहावर कोणत्याही खुणा आढळल्या नव्हत्या. त्या दोघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. मागील चार दिवसांपासून हे दोघं मायलेक घराच्या बाहेर दिसले नाही, असं त्यांच्या बिल्डींगमधील इतर लोकांचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -