घरमुंबईकोरोनाला रोखण्यासाठी मुंबई काँग्रेसची टास्क फोर्स मैदानात

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई काँग्रेसची टास्क फोर्स मैदानात

Subscribe

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सरकारी, पालिका, खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. अनेक कोरोना बाधित रुग्णांना बेड, रक्त, रेमडेसिवीर इंजेक्शन यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांना सर्वतोपरी म्हणजे अगदी २४ तास मदत करण्यासाठी मुंबई काँग्रेसने जिल्हानिहाय सहा ‘टास्क फोर्स’ गठीत केल्या आहेत. तसेच, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी संपर्क करता यावा याकरिता मुंबई काँग्रेस कार्यालयात एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून नागरिकांनी ०२२ -२२६२१११४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

या टास्क फोर्समार्फत गरजू कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, रक्त, प्लाझ्मा, ऑक्सिजन आणि अन्य स्वरूपाच्या वैद्यकीय सेवांबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना वैद्यकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील माहिती, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे. याप्रसंगी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई युवक काँग्रेसचे सुरज ठाकूर, मुंबई काँग्रेसचे अतुल बर्वे व पप्पू ठाकूर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

तसेच, मुंबईत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गंभीर बाब पाहता मुंबई काँग्रेसने १० मे पर्यंत रक्तदान शिबिरे ठिकठिकाणी आयोजित करून १० हजार रक्ताच्या बाटल्या जमा करण्याचा निर्धार व्यक्त केला असून आतापर्यंत दीड हजार रक्ताच्या बाटल्या जमा करून रुग्णालयाला दिल्या आहेत, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली. त्याचप्रमाणे रुग्णांना रुग्णालयात तातडीने नेण्यासाठी मुंबईत जिल्हानिहाय सहा रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन, रक्ताची, प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना ते सहज उपलब्ध व्हावे आणि त्यांची परवड थांबवी, यासाठी हेल्पलाईन द्वारे नागरिकांना टास्क फोर्स मोलाची मदत करणार असल्याचा दावा भाई जगताप यांनी यावेळी केला.

मुंबई काँग्रेसने प्लाझ्माची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोरोनावर मात केलेल्या २२ कोरोना योद्ध्यांची व्यवस्था केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -