घरमुंबईMumbai : महिला लैंगिक हिंसाचारात वाढ; पालिकेकडून 'दिलासा' केंद्रांचा विस्तार

Mumbai : महिला लैंगिक हिंसाचारात वाढ; पालिकेकडून ‘दिलासा’ केंद्रांचा विस्तार

Subscribe

मुंबई : लैंगिक हिंसाचाराला सामोरे जावे लागणाऱ्या महिलांना त्यांच्या घरानजीक व अधिकाधिक प्रमाणात प्रतिसाद आणि वैद्यकीय त्याचप्रमाणे कायदेशीर सेवा पुरवता यावी, या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या ‘दिलासा’ केंद्रांचा आता महापालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये ‘दिशा’ केंद्रांच्या स्वरुपात विस्तार करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर लैंगिक व घरगुती हिंसाचाराविषयी आरोग्य आपल्या दारी योजनेतूनही जनजागृती करण्यात येणार आहे. (Mumbai Increase in sexual violence against women Expansion of Dilasa centers by the municipality)

हेही वाचा –Uddhav Thackeray : भाजपाची हलाखीची परिस्थिती, त्यांना उमेदवारही…; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

- Advertisement -

महिलांना लैंगिक हिंसाचार (जेंडर बेस्ड व्हायलन्स) घटनांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये महिलांना तत्परतेने प्रतिसाद देण्यासह आवश्यक त्या मदतीचा विस्तार करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या देखरेखीखाली पुढाकार घेण्यात आला आहे. याअंतर्गत प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या 12 रुग्णालयांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या ‘दिलासा’ केंद्रांचा विस्तार केला जाणार आहे.

कौटुंबिक हिंसाचार हा महिलांवरील हिंसाचाराचा अत्यंत व्यापक प्रकार आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण  (एनएफएचएस)-5 मधील तथ्यांनुसार, नागरी भागांमध्ये 24 टक्के महिलांना जोडीदाराकडून हिंसाचार तसेच 18 ते 49 वयोगटातील 2.5 टक्के गर्भवती महिलांना शारीरिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. हिंसाचाराच्या अशा घटनांचा एकूण विचार करता 77 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी अशा घटना अथवा अनुभवांबद्दल थेट तक्रार करणे किंवा बोलणे टाळले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात भाजपा निष्पाप लोकांचा जीव घेणार का? वडेट्टीवारांचा सवाल

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांच्या सहकार्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक उपाय केले जात आहेत. लैंगिक हिंसाचाराने (जेंडर बेस्ड व्हायलन्स) पीडित महिलांसाठी महापालिका रुग्णालयांमध्ये संकटकालीन हस्तक्षेप केंद्र (क्रायसिस इंटरव्हेन्शन सेंटर) स्वरूपातील 12 दिलासा केंद्रे आणि दोन वन स्टॉप केंद्रे कार्यरत आहेत. लैंगिक हिंसाचाराने पीडित संशयित महिलांना विविध ओपीडी किंवा आयपीडीएसमधून संदर्भित केले जाते. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) स्वरुपाची प्रकरणे तर काही वेळा वैद्यकीय-न्यायिक (मेडिकोलीगल) स्वरुपाच्या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून रुग्णांना या केंद्रांमध्ये आणले जाते. रुग्णालयात संबंधित रुग्णाची तपासणी करून त्यांचे समुपदेशन केले जाते.

आकडेवारी लक्षात घेता, वर्ष 2023 मध्ये, दिलासा केंद्रांमध्ये लैंगिक हिंसाचाराने पीडित 15 हजार 406 महिला आणि 1 हजार 251 मुलांची वार्षिक तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले. तपासणी केल्यानंतर 1 हजार 707 महिला तर 530 बालकांची या केंद्रांवर लैंगिक हिंसाचार पीडित म्हणून नोंदणी करण्यात आली. या सर्वांना समुपदेशनासोबतच आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत तसेच कायदेशीर आणि पोलीस मदत पुरविण्यात आली.

हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोडची एक मार्गिका सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत; प्रवास कधी करता येणार?

लैंगिक हिंसाचाराबाबत जनजागृती करणे आणि हिंसाचाराच्या प्रकरणात मदत मिळविण्यासाठी अधिकाधिक महिला समोर याव्यात, यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत दिलासा केंद्रांमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या संकटकालीन हस्तक्षेप सेवांचा विस्तार केला जाईल. महापालिकेच्या प्रसूतिगृह केंद्रांमध्ये लैंगिक हिंसाचाराची प्राथमिक तपासणी आणि अन्य सेवा पुरविण्यासाठी ‘दिशा’ केंद्र सुरू केले जातील. सर्व केंद्रांमध्ये तपासणी, समुपदेशन आणि संदर्भ सेवा प्रदान करण्यासाठी परिचारिकांची क्षमता वृद्धी करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे, ‘आरोग्य आपल्या दारी’ योजनेअंतर्गत तळागाळात काम करणारे आरोग्य कर्मचारी (आशा किंवा सामुदायिक आरोग्य स्वयंसेवक) लैंगिक किंवा घरगुती हिंसाचार आणि त्यावर उपलब्ध असलेल्या सेवांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करतील. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लैंगिक हिंसाचार प्रतिसादासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांची आणि सामुदायिक पोहोच अधिक बळकट करण्यासाठी दिलासा आणि दिशा केंद्रांची क्षमता वृद्धी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -