घरमुंबईराज ठाकरेंना कोळी महिला भेटताच शिवसेनेला आली जाग

राज ठाकरेंना कोळी महिला भेटताच शिवसेनेला आली जाग

Subscribe

शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील बाजार आता मानखुर्द-ऐरोली या ठिकाणी हलवण्यात येणार असल्यामुळे कोळी महिला राज ठाकरेंना भेटण्यासाठी गेल्या होत्या. राज ठाकरेंना भेटल्यानंतर आता शिवसेना जाग आली आहे.

क्रॉफर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार असलेल्या शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील बाजार आता मानखुर्द-ऐरोली या जकात नाक्याच्या जागेवर हलवला जाणार आहे. याविरोधात कोळी समाज आक्रमक झालेला असून यासंदर्भात राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्ष जागा झाला आहे. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी तातडीने आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह महापालिका अधिकारी यांच्यासोबत बैठक घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये इमारत बांधकामाबाबत टॅक समितीचा अहवाल येईपर्यंत या मंडईतील मासे विक्री व्यवसाय करणार्‍यांना स्थलांतरित केले जावू नये. तसेच कोळी महिलांना ऐरोलीला स्थलांतरित न करता याच विभागात स्थलांतरित करावे, असे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार आयुक्तांनी तुर्तास स्थगिती दिल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

शिवाजी मंडईतील मासे विक्रेत्यांवरील कारवाई तूर्तास स्थगित

शिवाजी मंडईची इमारत धोकादायक असल्याने यातील घाऊक मासळी बाजार एरोलीच्या जकात नाका जागेवर स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेच्या बाजार विभागाने घेत त्यांना जागा रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली आहे. याबाबत कोळी महिलांनी तीव्र विरोध करत कोणत्याही परिस्थितीत जागा खाली न करण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात गुरुवारी या महिलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनीही कोळी महिलांना जागा खाली न करण्याच्या सूचना केल्या होत्या. कोळी महिला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्यानंतर महापालिकेतील चक्रे फिरली आणि महापौरांनी तातडीने शुक्रवारी सकाळीच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेत यासंदर्भातील निवेदन दिले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, नगरसेवक मिलिंद वैद्य, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, बाजार विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे उपस्थित होत्या.
टॅक समितीचा अहवाल येईपर्यंत हटवणार नाही

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील कोळी महिलांना ऐरोली येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोळी महिला अनेक वर्षे या मंडईत व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. तसेच मुंबईतील जनतेला चांगल्या प्रतीचे मासे उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे एक प्रकारे मुंबईकारांची काळजी घेत आहेत. मुंबईतील कोळी महिला या भूमिपुत्र असून यांना अचानक स्थलांतरित केल्यामुळे विभागातील नागरिकांशी त्याचे जोडलेले नाते संपुष्टात येईल. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होऊन त्याची आर्थिक चणचण होईल, असे महापौरांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. मंडईतील मासेविक्रीचा व्यवसाय करणार्‍या कोळी महिलांना स्थलांतरित करण्याचा निर्णय टॅक समितीचा अहवाल प्राप्त होइपर्यंत स्थगित करण्यात यावा, असे निर्देश देत महापौरांनी या कोळी महिलांना ऐरोलीला स्थलांतरित न करता त्याच विभागातच त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांना केल्या.

- Advertisement -

मार्केट हटवण्याचा भाजपचा आणि लोढांचाच डाव

पाच वर्षांपूर्वी भाजपचे आमदार आणि विद्यमान भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबई हा मांसाहारीमुक्त बनवला जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांचा ससुन डॉकमधील घाऊक मासळी बाजार बंद करण्याचा डाव आहे, त्यानंतर आता शिवाजी मंडईतील हा मासळी बंद करून ऐरोलीत हलवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे. शिवाजी मंडईत दरदिवशी ५ कोटींची उलाढाल चालत आहे. २०१७ मध्ये महापालिकेने या मासळी मंडईला न हलवण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. त्याचे पालन केले जात नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. आतापर्यंत या मंडईतील ६०० महिला गाळेधारकांना आणि ४०० होलसेल विक्रेत्यांना नोटीस बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. या मंडईमध्ये डहाणू, उत्तन, वसईपासून होलसेल मासळी विक्रीसाठी रोज १५० ट्रक येत असतात. यातील २ कोटी रुपयांची मासळी मुंबईतील मंडईंमध्ये तसेच ३ कोटी रुपयांची मासळी पुणे, नाशिक, सातारा,कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि परदेशात निर्यात होते, असेही तांडेल यांनी सांगितले. महापौरांनी मध्यस्थी करत या तोडगा काढल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले आहे. परंतु हेच जर यापूर्वी पाऊल उचलले असते तर कोळी बांधवांना आक्रमक होण्याची वेळ आली नसती, असे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – राज ठाकरे कोळी बांधवांना म्हणाले; ‘कुणीही येऊ दे, तुम्ही तिथून हलू नका’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -