घरमुंबईकोट्यवधींचे सल्ले बिनकामाचे

कोट्यवधींचे सल्ले बिनकामाचे

Subscribe

पालिकेच्या सल्लागार नेमण्यावर स्थायी समितीची नाराजी

मुंबई महापालिकेतील प्रत्येक कामांसाठी सध्या सल्लागार नेमला जात असून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही त्याचा परिणाम दिसून येत नसल्याने स्थायी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. सल्लागारांची गरजच नसून केवळ अधिकारी व सल्लागार यांचे संगनमत असल्याने त्यांना कामे दिली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे सल्लागारांचा महापालिकेचा विळखा सोडवण्यासाठी त्यांच्याऐवजी महापालिकेच्या निष्णांत अभियंत्यांची मदत घेतली जावी,अशी मागणी समितीने केली आहे.मुंबईतील पूर्व व पश्चिम विभागातील चार परिमंडळांमधील रस्ते कामांसाठी निविदा बनवण्यासाठी सल्लागारांना वाढीव शुल्क देण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी सल्लागारांचे लॉबींग असल्याचा आरोप केला. सल्लागारांना नेमूनही रस्त्यांची आणि पुलांची हालत काय झाली आहे हे आपण पाहिलेच आहे. सल्लागार नेमूनही लोकांचा त्रास कमी झालेला नाही,असे सांगितले. यावर भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी मनोज कोटक यांनी काही महिन्यांपूर्वी सल्लागारांवर आतापर्यंत किती खर्च केला होता, याची माहिती मागवली होती,याची आठवण करून देत या सल्लागारांना अधिदान करण्यास विलंब का झाला असा सवाल केला.

महापालिकेत अधिकारी व सल्लागार यांची लॉबी असल्याच्या आरोपाचे समर्थन करत सपाचे रईस शेख यांनी पुलांबाबत प्रमुख अभियंता यांची एक कमिटी नेमण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेला सल्लागारांनी विळखा घातला असल्याचे सांगत भाजपचे अभिजित सामंत यांनी सर्वच खात्यांमध्ये किरकोळ कामांसाठीही सल्लागार नेमले जात आहेत. आज महापालिकेने स्वत:चे इन्क्युबेशन सेंटर तयार करून इतर महापालिकेला मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे. महापालिकेचे अभियंते त्यांना मार्गदर्शन करत असतात, मग त्याच महापालिकेला सल्लागारांची गरज का लागते असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी महापालिकेत असे नामवंत अभियंते घडून गेलेत, ज्यांनी कुठल्याही सल्लागाराशिवाय प्रकल्प साकारले आहेत. यापूर्वी कधीही सल्लागारांची मदत घेतली जात नव्हती. आपले अभियंतेच सर्व काही असायचे. पण आता सल्लागारांचा ट्रेंड आला आहे. तो बंद करायला हवा. महापालिकेत आजही निष्णांत अभियंते असून त्यांची मदत घेतली गेली पाहिजे,अशी सूचना त्यांनी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी वाढत्या सल्लागारांच्या नियुक्त्यांबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाने सदस्यांच्या सर्व प्रश्नांची लेखी उत्तर द्यावी,असे निर्देश त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -