घरमुंबईमुंबईकरांची पूलकोंडी

मुंबईकरांची पूलकोंडी

Subscribe

आजारापेक्षा औषध त्रासदायक

सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर महानगर पालिका आणि रेल्वे प्रशासनाने धोकादायक पूल या नावाखाली मुंबई शहरातील तसेच रेल्वेच्या हद्दीतील अनेक पूल धोकादायक म्हणून घोषित करून हे पूल तात्काळ वाहतुकीसाठी बंद केले. परिणामी मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात पूल कोंडी झाली असून मुंबईत पूर्वेकडून पश्चिमेला जोडणारे अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, तर काही पुलांवरून जड वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आल्यामुळे वाहतुकीचा देखील बोजवारा वाजलेला आहे. पूल बंदीचा परिणाम हा वाहतुकीवर होऊन सर्वत्र वाहतूक कोंडी होत असल्यामुळे मुंबईकरांसह वाहतूक पोलिसांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जानेवारी महिन्यात सीएसएमटी येथील हिमालय पूल कोसळून ६ रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. सुरूवातीला मनपा आणि रेल्वे प्रशासनाने एकमेकांवर याचे खापर फोडले. परंतु अखेर हा पूल मनपाच्या देखरेखीखाली असल्याचे उघड झाले. याप्रकरणी मनपाच्या काही अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली होती. त्यानंतर मात्र मुंबई महानगर पालिकेने तसेच रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीतील पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करून मुंबई महानगर पालिकेने मुंबईसह पूर्व- पश्चिम उपनगरीतील सुमारे २९ पूल धोकादायक घोषित करून हे पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्यात आले आहेत. मुंबई महानगर पालिकेने हे पूल बंद करण्यापूर्वी पर्यायी उपाय न केल्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेला जोडणारे पूल महानगर पालिकेकडून बंद करण्यात आले असून काही पुलांवरून अवजड वाहनांस जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

बेस्ट वाहतुकीला फटका

पूर्व द्रुतगती महामार्गावरून घाटकोपर पश्चिमेला जाणारा घाटकोपर आगरजवळील लक्ष्मी नाल्याजवळील पूल महापालिकेने बंद केल्यामुळे बेस्टच्या घाटकोपर आगारातील बस गाड्यांचे नियोजन पुरते ढासळले असून बेस्टला दिवसांचे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात नियमितपणे प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यात या पुलाबाबत अजूनही कोणतीही कार्यवाही पालिकेने हाती घेतली नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

- Advertisement -

घाटकोपरचा हा महत्वाचा पूल बंद झाल्यामुळे घाटकोपर आगारातूच रेल्वे स्थानकाच्या पश्चिमला जाण्यासाठी पंत नगर व घाटकोपर स्टेशन (पूर्व) येथून उड्डाणपुलाचा वापर करावा लागत आहे. हा पंत नगर येथील रस्ता निमुळता असल्याने व तेथे वडाळा – कासारवडवली मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांसाठी पर्यायी म्हणून कांजूरमार्ग येथील गांधी नगर, तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड या पुलाचा वापर होत असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या भेडसावत आहे.

गणपती मिरवणुकीवर परिणाम होणार

करी रोड, चिंचपोकळी हे दोन पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्यामुळे येथील जड वाहनांची वाहतूक दादरच्या टिळक पूल आणि परळच्या पुलावरून होत असल्यामुळे येथील वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. करी रोड आणि चिंचपोकळीचा पूल हा गणेशोत्सवात महत्वाचा मानला जातो. गणेश विसर्जनसाठी गिरगाव येथे जाणार्‍या मिरवणुकीसाठी या दोन्ही पुलांचा सर्वाधिक वापर होतो. येथील मंडळांची ठरवलेल्या मार्गावरून या मिरवणूक निघते. त्यामुळे वाहतूक विभागाला गणेश विसर्जन मिरवणुका कुठून आणि कशाप्रकारे वळवायच्या हा प्रश्न पडला आहे. लालबाग ,परळ विभागातील गणेश मंडळांचे विसर्जनाचे मार्ग ठरलेले असतात. येथील मंडळे गिरगाव येथे जाण्यासाठी करी रोड आणि चिंचपोकळी पुलाचा वापर करतात. अवजड वाहनांस बंदी घातलेल्या करीरोड आणि चिंचपोकळी या पुलामुळे गणेश मिरवणुकीवर परिणाम होण्याशी शक्यता नाकारता येणार नाही.

या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि गणेश भक्त सामील होत असतात. महापालिकेने अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेल्या या दोन्ही पुलांवरून या मिरवणुका जावू देणे म्हणजे हजारोंचा जीव धोक्यात घालणे आहे. यासाठी काय उपाय योजना करता येईल यासाठी मनपा अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी सांगितले.

रेल्वेचे महत्वाचे दोन पूल बंद होणार ?

मुंबईत अगोदरच झालेल्या पूलकोंडीमुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना आणखी नवीन पूल कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा शीव रेल्वे स्थानक येथील पूल आणि लोकमान्य टिळक हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल) येथील धारावीकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी रेल्वेने मुंबईत वाहतूक विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र मुंबईतील इतर पूल बंद असल्यामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे वाहतूक विभागाने हे दोन्ही पूल बंद करण्यासाठी रेल्वेला तात्पुरती परवानगी नाकारली आहे. मध्य रेल्वेला सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान दोन नवीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी हे दोन्ही पूल पाडावे लागणार आहेत. पूल बंद केल्यानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचा विचार करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे,असे मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी सांगितले.

येथे आहे पूलबंदी

रेल्वे प्रशासन, मुंबई आयआयटी, महानगर पालिकेने केलेल्या पाहणीत ठरलेले धोकादायक कल्याण , ठाण्यासह मुंबईतील 15 पादचारी पूल मार्च महिन्यापासून बंद करण्यात आले आहे. मात्र, त्या बदलत्या नव्या पुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पर्यायी असलेल्या पुलापर्यंत पोहचण्यात प्रवाशांना नाहक पायपीट करावी लागत असून त्यातच एकाच पुलावर भार वाढत आहे. आज अनेक स्थानकांवरील एल्फिस्टनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे.

कुर्ला : 2 एप्रिलपासून कल्याण दिशेकडील पादचारी पूल बंद
– नव्या पुलाचे बांधकाम सुरू नाही
– कल्याणच्या दिशेला असणार्‍या पुलावर ताण
– एक किलोमीटरचा लांबीचा पूल पार करायला 10 ते 15 मिनिटे

भांडुप – 20 एप्रिलला कल्याणच्या दिशेकडील पादचारी पूल पाडला.
– पर्यायी पूल त्याच दिशेकडे बांधण्यात आला.
– फलाटवरील पत्रे काढल्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

विक्रोळी – सीएसएमटी दिशेला असणार्‍या धोकादायक पुलावरून अजूनही प्रवाशांकडून ये
– जा होत आहे.
– हा पूल 30 एप्रिल रोजी पाडण्यात येणार होता,मात्र पूल अद्याप सुरू आहे.

शिवडी- 60 वर्षांची कालमर्यादा ओलांडलेल्यामुळे पूल बंद
– नवा पादचारी पूल प्रवाशांसाठी उपलब्ध
– मात्र प्रवासी रेल्वे रुळाचा वापर करत आहेत .

अंधेरी – गोखले पूल 3 जुलै 2018 रोजी बंद
– अद्याप या पुलाची दुरुस्ती सुरू
– वाहतुकीसाठी खुला मात्र पुलाची एक बाजू अजूनही बंद

मालाड- 29 मार्च ते 28 जूनपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी बंद
– रेल्वे प्रशासनाने नुकताच नवीन पादचारी
पूल प्रवाशांसाठी खुला केला.
– एकूण 4 पादचारी पुलांचा वापर प्रवाशांकडून

बांद्रा – या स्थानकातील स्कायवॉक 20 मार्च रोजी बंद
– बंद केल्यामुळे बीकेसी, म्हाडा, एसआरए तसेच वांद्रे न्यायालय या परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी भर

माहीम- एप्रिलमध्ये पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद -नव्या पुलांचे बांधकाम अद्याप सुरू नाही

– पर्यायी पूल प्रवाशांसाठी उपलब्ध

लोअर परळ – 28 एप्रिल रोजी उत्तर दिशेकडील पूल दुरुस्तीसाठी बंद
– हा पूल अनिश्चित वेळेपर्यत बंद राहणार
– प्रवाशांसाठी 10 मीटर रुंद पूल खुला

महालक्ष्मी- 28 एप्रिल रोजी या पुलाच्या पायर्‍या दुरुस्तीसाठी बंद
-प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागतो
– दोनच फलाट असल्यामुळे प्रवाशांची नेहमी गर्दी

दादर – दादर (द) एमसीजीएम पादचारी पूल 17 मार्चपासून बंद
– पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक 1 वरील पायर्‍याच्या पुनर्निर्माणासाठी 90 दिवस बंद
-प्रवाशांसाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे पादचारी उपलब्ध
-या पुलावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ

मरीन लाईन्स- 22 मार्च रोजी हा पादचारी पूल पालिकेच्या सी विभाग कार्यालयाने पाडला
– दोन महिन्यांपूर्वी हा पूल पादचार्‍यांसाठी बंद
-आता पायर्‍या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्त पत्र
काही महिन्यांपूर्वी झालेल्या हिमालय पुलाच्या दुघर्टनेनंतर जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने कुर्ला, कल्याण, गोवंडी, भांडुप, घाटकोपर स्थानकांवरील पादचारी पूल तोडण्याचे काम हाती घेतल्यामुळे एकापाठोपाठ पूलबंदी आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. यावेळी नवे पादचारी पूल तयार करण्यासाठी जागोजागी खोदकाम केले असल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला तर काही ठिकाणी गर्दीला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकांत अनेक ठिकाणी पुलांसाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जिवालाही धोका उत्पन्न झाला असल्याने ही कामे तातडीने थांबवून पावसाळ्यानंतर उर्वरित कामे पुन्हा सुरू करावीत, असे रेल्वे सुरक्षा आयुक्त जैन यांनी मध्य रेल्वेला पत्र लिहून कळवले होते.

डोंबिवली पूल बंद
मध्य रेल्वेवरील डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल २७ मे पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई आयआयटीने स्ट्रक्चरल ऑडिट करत हा डोंबिवलीचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला आहे. रेल्वे प्रशासनाने कल्याण- डोंबिवली महापालिकेला पूल धोकादायक झाल्याचे पत्राने कळवले असून हा पूल बंद करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल हा एकमेव पूल होता. या धोकादायक पुलाची क्षमता आणि होणारी वाहतूक कोंडी यामुळे हा पूल अतिशय जीर्ण झालेला असून ठिकठिकाणी पुलाची अवस्था जर्जर झाली आहे. यावर पर्यायी पूल महापालिका प्रशासनाने स. वा. जोशी हायस्कूल येथे रेल्वे उड्डाणपूल उभारला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा पूल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून या पुलावरील ताण थोडासा कमी झाला होता. मात्र वाहतुकीची कोंडी ही दोन्ही पुलांवर होत असल्याने वाहन चालक आणि डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. आता हा पूलच धोकादायक झाल्याचे पत्र रेल्वे प्रशासनाने पालिकेला दिल्याने हा पूल बंद करण्यात आला आहे.

पुलाच्या ऑडिटवर कोट्यवधी खर्च

एफओबी आणि आरओबीची सामान्य सुरक्षा ऑडिट संबंधित मध्य रेल्वेच्या पूल विभागाला आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांना माहिती दिली मागितली होती. त्यामध्ये एफओबी आणि आरओबीची सामान्य सुरक्षा ऑडिट खासगी एजन्सीला दिले जात नाहीत. विविध अभियंत्यांच्या निश्चित केलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून रेल्वे दरवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असते. तसेच करण्यात आलेल्या सुचनांवर काम करीत असल्याचे म्हटले आहे. ऑगस्ट २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत १९१ एफओबी आणि ८९ आरओबीचे सुरक्षा ऑडिट आयआयटी मुंबईतर्फे केले गेले आहे. या एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर ३ कोटी ३७ लाख ८०० रुपये खर्च निश्चित करण्यात आलेला आहे. त्यातील ५० टक्के म्हणजे१ कोटी ६८ लाख ५० हजार ४०० रुपये रक्कम आगाऊ देण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईने दिलेल्या अहवालानुसार आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही पादचारी पूल बंद करण्यात आले आहेत. -ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क, अधिकारी, मध्य रेल्वे

रेल्वे मंत्र्यांचा दावा फोल

२०१४ पासून प्रवाशांसाठी उत्तम सुविधा पुरविण्यात आल्या असून मुंबईतील कामे प्रगतीपथावर असल्याचा दावा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडून नेहमीच करण्यात येतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी २०१४ पासून ८७ पादचारी पूल बनविण्यात आले आहेत. प्रभादेवीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर यात ४४ पादचारी पुलांचा समावेश केला आहे. यासह २०१९ वर्षामध्ये ७० पादचारी पूल खुले करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या अनेक भाषणांत दिली होती. मात्र आज हा दावा फोल ठरतोय.

संकलन – संतोष वाघ, नितीन बिनेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -