घरमुंबईगणेश आगमनाच्या मिरवणुकांनी वाहतूक कोंडी

गणेश आगमनाच्या मिरवणुकांनी वाहतूक कोंडी

Subscribe

मुंबईत सध्या गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. दीड आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप सज्ज झाले असून सजावट अंतिम टप्प्यावर आली आहे.

मुंबईत सध्या गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. दीड आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप सज्ज झाले असून सजावट अंतिम टप्प्यावर आली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधून मुंबईतील आणि उपनगरातील बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती मूर्तीशाळांमधून आपापल्या मूर्ती मंडपात आणून स्थानापन्न केल्या. त्यामुळे लालबाग, परळ भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते हे ढोल पथकांसोबत आगमन मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे दादर, लालबाग, परळ भागात वाहतूक कोंडी झाली. अशा प्रकारे मोठ्या गणेश मूर्तींचे आगमन होणार याची पूर्वकल्पना असूनसुद्धा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली नाही.

परिणामी वाहतूक कोंडी होऊन मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागला. रविवारी मुंबईतील अनेक प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या बाप्पाला मंडपात आणण्यासाठी लालबाग, परळ येथील गणेश मूर्तीशाळांमध्ये गर्दी केली होती. अगदी लहान मुलांपासून, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांचाही या आगमन मिरवणुकीत सहभाग होता. सकाळी ११ वाजल्यापासून बाप्पाचा आगमन सोहळा सुरू झाला. यात फोर्टचा राजा, मुंबईचा महाराजा, ग्रॅण्ट रोडचा महागणपती, चेंबूरचा विघ्नहर्ता, अभ्युदयनगरचा गणराज या सारख्या अनेक मंडळांनी मोठ्या थाटात आपल्या बाप्पाची आगमन मिरवणूक काढली. ढोल, ताशा, लेझीम, रंगबेरंगी फेटे आणि टी शर्ट घालून मंडळातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले होते.

- Advertisement -

शहर, उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी

मूर्तीशाळांमधून उंच मूर्ती जेव्हा बाहेर पडल्या, तेव्हा मात्र मोठी तारांबळ उडाली होती. कार्यकर्ते एकमेकांना धक्के देत होते. त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत होती. यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. या वेळी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडच्या गाड्याही बराच वेळ रखडल्या होत्या. खरे तर रविवारी मोठ्या गणेशमूर्ती मंडपांत नेण्यात येतील, याची पूर्वकल्पना असूनही पोलिसांनी सांभाव्य वाहतूक कोंडीचा गांभीर्याने विचार केला नाही. त्यामुळे लालबाग, परळ, दादरपासून ते पश्चिम मुंबई, मध्य मुंबईच्या रस्त्यावर या मोठ्या गणेश मूर्तींच्या आगमन मिरवणुकांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -