घरमुंबईविद्यापीठाची नवी उत्तरपत्रिका वादात

विद्यापीठाची नवी उत्तरपत्रिका वादात

Subscribe

विद्यार्थ्यांची नावे छापल्याने संघटनांचा आक्षेप

मुंबई:मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन मूल्यांकनातील त्रुटी दूर करण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून नव्या उत्तरपत्रिकांची छपाई केली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या उत्तरपत्रिकांमध्ये विद्यापीठाने थेट विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख असलेला रकाना नमूद केला आहे. या नावाच्या छपाईमुळे नवा वाद सुरू झाला असून यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना नवा मार्ग मिळेल, अशी टीका जोर धरू लागली आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांमध्ये बदल करण्याची मागणी आता विद्यार्थी संघटनांकडून होऊ लागली आहे. तर विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख हा प्रशासकीय कामांसाठी करण्यात आला असून त्याचा कोणताही परिणाम परीक्षा पध्दतीवर होणार नाही, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन मूल्यांकन ही पध्दत सुरू केली होती. या ऑनलाइन मूल्यांकनाच्या सुरुवातीलाच निकाल गोंधळ समोर आल्याने या प्रक्रियेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रक्रियेतील त्रुटीमुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाल्याचे यावेळी समोर आले होते. त्यामुळे या प्रक्रियेत अनेक बदल करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला होता. त्याचवेळी नव्याने उत्तरपत्रिका छापण्याचा निर्णय ही परीक्षा विभागाने जाहीर केला होता. या नव्याने छापण्यात आलेल्या या उत्तरपत्रिका यंदाच्या हिवाळी सत्र परीक्षांपासून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. या उत्तरपत्रिकेत अनेक बदल करताना विद्यापीठाने प्रथमपृष्टावर विद्यार्थ्यांचे नावाचा रकानाही नमूद केला आहे.

- Advertisement -

मुळात उत्तरपत्रिका लिहणार्‍या विद्यार्थ्यांची माहिती गोपनीय ठेवायची असताना अशाप्रकारे नावाचा उल्लेख केल्याने सवार्ंंच्या भुवया उंचविल्या आहेत. यामुळे संबंधित उत्तरपत्रिका कोणाची आहे, हे समजणे सहज सोप्पे झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकेत फेरफार करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या उत्तरपत्रिकेवरुन नवा वाद सुरू झाला आहे. या उत्तरपत्रिकांवरील ज्या माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्या प्राध्यापकांपर्यंत पोहचणार नसल्याचा दावा यावेळी विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. पण परीक्षा केंद्रापासून ते उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगपर्यंतच्या मार्गात ही उत्तरपत्रिकेबरोबर छेडछाड होऊ शकते, असा दावा विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

याप्रकरणाबद्दल बोलताना मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले की, आतापर्यंत उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांचे नाव नमूद करण्याची पध्दत नव्हती. पण अचानक विद्यापीठाने हा बदल केल्याने गैरप्रकार करण्यासाठी मोकळं रानच असणार आहे. त्यामुळे आमचा या उत्तरपत्रिकांना विरोध आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिका मागे घेण्याची मागणी आम्ही विद्यापीठाकडे करणार आहोत. तर विद्यापीठाने केलेला दावादेखील चुकीचा असून उत्तरपत्रिका कोणाची आहे, हे जर परीक्षा केंद्रात आणि कॉलेजात समजणार असल्यास नक्कीच यात कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -