घरमुंबईभाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे गायब !

भाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे गायब !

Subscribe

मनसे, शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी लाटले

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सावतामाळी भाजी मंडईतील दिव्यांगांच्या कोट्यातील गाळे हडपण्यात आल्याचा प्रकार माहितीच्या अधिकारात उजेडात आला आहे. मंडईतील अनेक गाळे हे मनसे, शिवसेना आणि भाजपच्या नेते मंडळींनी लाटले आहेत. यामध्ये एका माजी आमदाराचाही गाळा आहे. या भाजी मंडईत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा बाजार थाटण्यात आला आहे. त्यामुळे नाव भाजी मंडई, मात्र व्यवसाय इतर वस्तूंचा अशी अवस्था या मंडईची झाली आहे. कल्याणातील दिव्यांगांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर साळवे यांनी हा प्रकार माहितीच्या अधिकारात उजेडात आणल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे साळवे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रोडवरील सावतामाळी भाजी मंडई ही महापालिकेने १९९९ साली बांधली आहे. या मंडईत एकूण ३३ गाळे आणि ३०२ ओटे आहेत. त्यापैकी ८ ओटे रस्ता रूंदीकरणात बाधित झालेल्या तसेच विस्थापित झालेल्यांना वाटप करण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावरील बंदीस्त ३३ गाळे विस्थापित महिला अंध, अपंग यांना कांदे, बटाटा, लसून अशा नाशवंत नसलेली भाजी विक्री करण्यासाठी आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. मात्र हे सर्व गाळे विजय सेल्सला भाडेतत्वावर देण्यात आला आहेत. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक बाब उजेडात आली आहे.

- Advertisement -

अंध-अपंगांना पहिल्या मजल्यावर व्यवसायासाठी जाणे अवघड असल्याने त्यांना तळमजल्यावर १९ गाळे वितरीत केल्याचे पालिकेकडून साळवे यांना सांगण्यात आले. मात्र हा अपंग हक्क कायदा १९९५ च्या समान सहभाग या कायद्याचे उल्लंघन असल्याने तो गुन्हा आहे, असे साळवे यांचे म्हणणे आहे.

पहिल्या मजल्यावर अंधअपंग जाऊ शकत नाहीत, मग कर्णबधीर व मूकबधीर यांना व्यवसाय करण्यासाठी काहीच अडचण नव्हती. त्यामुळे पालिकेने हे अधिकार डावलून भेदभाव करीत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. प्रशासनाकडून अपंगांना १९ गाळे देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात एकही गाळा देण्यात आलेला नाही. दिव्यांगांचे ३३ गाळे हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संगनमताने हडप करण्यात आले. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन महिन्यात न्याय न मिळाल्यास ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनी वर्षा निवासस्थानी उपोषणास बसण्याचा इशारा साळवे यांनी दिला आहे. महापालिकेने कल्याण स्टेशन परिसरातील रस्ता रूंदीकरणात शंकर साळवे यांचीही टपरी महापालिकेने तोडली आहे. मात्र अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना अत्यंत चिंचोळा गाळा मंजूर करण्यात आला. त्यात ते व्यवसायही करू शकत नाहीत. त्या विरोधात साळवे यांचा अनेक वर्षे प्रशासनाबरोबर लढा सुरू आहे.

काय म्हणते पालिका…
महापालिकेचे गाळे भाड्याने देण्यासाठी महासभेने एक तदर्थ समिती नेमली आहे. त्या तदर्थ समितीच्या अहवालानुसारच सावतामाळी भाजी मंडईतील तळमजला व पहिल्या मजल्यावरील ओटे, बंदिस्त गाळे हे डिपॉझीटने दरमहा भाड्यावर देण्याचे धोरण ठरविले आहे. त्यानुसारच पहिल्या मजल्यावरील १२४२५ चौ फूट जागा मे त्रिमुर्ती एंटरप्रायझेसला २० वर्षे कालावधीसाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय २३ ऑगस्ट २००६ च्या महासभेत घेण्यात आला आहे. अंधअपंगांना पहिल्या मजल्यावर व्यवसायासाठी जाणे अवघड असल्याने त्यांना तळमजल्यावर १९ गाळे वितरीत केले आहे, असे पालिकेचे म्हणणे आहे.

किती पालिकेला फायदा …
तळमजल्यावर २०१ ओटे, गाळे डिपॉझीट १० हजार रूपये प्रतिमहा, ३५० रूपये भाडे दरवर्षी ५ टक्के भाडेवाढ त्यापासून २० वर्षात २० लाख १० हजार (डिपॉझीट) आणि ७० हजार ३०० प्रतिमहा भाडे मिळत आहे.
तर पहिल्या मजल्यावरील ३३ बंदिस्त गाळे वगळता उर्वरित १०१ ओट्याचे क्षेत्रपळ सुपर मार्केटला व्यवसायाकरीता डिपॉझीट दहा लाख रूपये व भाडे ८० हजार रूपये. अथवा डिपॉझिट ५ लाख व भाडे १ लाख रूपये अथवा बँक किंवा व्यापारी संस्थेने मागितल्यास भाड्याचा दर १२ रूपये प्रतिचौरस मीटर डिपॉझीट पोटी सहा महिन्याचे भाडे आगाऊ व दरवर्षी भाड्याचे मूळदरात पाच टक्के वाढ असा निर्णय महापालिकेच्या तदर्थ समितीने घेतलाआहे. त्रिमूर्ती एंटरप्रायझेसकडून २० वर्षासाठी ७० लाख रूपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत.

कुठे किती गाळे …
अत्रे रंगमंदिर – ५८ गाळे
डोंबिवली क्रीडा संकुलात – ३५ गाळे
सावतामाळी भाजी मंडईतील- ३३५ गाळे
बिर्ला कॉलेज- २७ गाळे ़

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -