घरमुंबईविम्याविनाच गोविंदाचा सराव

विम्याविनाच गोविंदाचा सराव

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेला गोंविदाची यंदा न्यायालयीन प्रक्रियेतून मुक्तता झाल्याने गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यानुसार यंदाच्या गोंविदासाठी अनेक पथकांनी सरावाचा नारळदेखील वाढविला आहे. मात्र सरावासाठी खांद्याला खांदा लावून उभे असणार्‍या गोविंदा पथकांचा विम्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. तरीही अनेकांनी या विम्याविनाच सराव सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे. तर न्यायालयाने गोविंदा पथकांना सुरक्षेचे उपाय सक्तीचे केले होते. मात्र पथकांनी या उपाययोजनांशिवायच बजरंग बली की जयचा नारा देत एकावर एक थर रचण्याचा सराव सुरू केला आहे.

मुंबई आणि उपनगरात गोविंदा या सणाचा उत्साह काही औरच असतो. मुंबईसह सातासमुद्रापार या गोविंदाने आपला ठसा उमटविला आहे. सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा हा गोविंदा गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयीन लढाईत अडकला होता. थरांच्या मर्यादेबरोबरच बाल गोविंदाच्या सहभागाबाबत निर्बंध घालण्यात आले होते. मात्र गोविंदांची ही कायदेशीर लढाई गेल्यावर्षीच निकाली निघाली आहे. त्यामुळे अनेक निर्बंधातून गोविंदाची सुटका झाली आहे. त्यामुळे यंदा गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक मंडळांनी यंदा थरांचा विक्रम मोडण्यासाठीही सराव सुरू केला आहे. पण या उत्साहात गोविंदा पथकांकडून सुरक्षेच्या उपाययोजनांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. इतकेच नव्हे तर कोर्टाने गोविंदा पथकांना विमा काढून मगच सराव करण्याची मुभा दिली होती. मात्र मोठी गोविंदा पथके वगळता लहान मंडळांकडून विमा काढण्यात आला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर अनेक मंडळांकडून मॅट न वापरताच सराव सुरू करण्यात येत आहे. कोर्टाने बंधनकारक केलेले मॅट महाग असल्याने ते विकत घेणे शक्य नाही, असे अनेक गोविंदा पथकांनी आपलं महानगरला सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, कोर्टाने उपाययोजना राबविताना गोविंदा पथकांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट वापरण्याची ताकीद दिली होती. मात्र याकडे गोविंदा पथकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून सराव शिबीर हा नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे. येत्या रविवारपासून या सरावाला सुरुवात होणार आहे. त्यांच्यावर पोलिसांची नजर असणार आहे. त्यासंदर्भातील सूचना मंडळ आणि आयोजकांना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

समन्वय समिती सरसावली

सुरक्षिततेच्या उपाययोजना पथकांनी योग्यरित्या राबवाव्यात म्हणून दहीहंडी समन्वय समिती पुढे सरसावली आहे. मंडळांमध्ये यासंदर्भात जागृती व्हावी यासाठी समितीने एक विशेष व्हिडीओ तयार केला असून लवकरच तो सर्व मंडळांकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी दिली. त्याचबरोबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आम्ही सोशल नेटवर्किंग साईटची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अनेक मंडळे उशिरापर्यंत विम्यासाठी अर्ज करतात. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे पांचाळ यांनी यावेळी नमुद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -