घरमुंबईठाण्यात नाका कामगारांच्या जिवाशी खेळ, ७ जखमी

ठाण्यात नाका कामगारांच्या जिवाशी खेळ, ७ जखमी

Subscribe

पोटाची खळगी भरण्यासाठी दुलार शेख हा पश्चिम बंगालमधून तर इस्ताफ हा झारखंड येथून महिनाभरपूर्वीच मुंबईत आला. नाक्यावर जे काम मिळेल ते काम ते करू लागले. सोमवारी ठाण्यात रंगकामासाठी लावलेली बांबूची लाकडी परांची कोसळून सात कामगार जखमी झाले त्यात या दोघांचाही समावेश आहे. नाका कामगारांना कंत्राटदाराकडून सुरक्षा पुरवली जाते. पण सुरक्षा म्हणजे काय हे त्यांना माहिती सुध्दा नाही. या घटनेमुळे नाका कामगारांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

ठाण्यातल्या बाळकूम येथील रुणवाल गार्डन सिटी इमारतीचे रंगकाम झाल्यानंतर लाकडाची परात सोडण्याचे काम सुरू होते. परातची सोडण्यासाठी १३ कामगार त्यावर चढले होते. त्याचवेळी अचानक परात कोसळल्याने सात कामगार जखमी झाले आहेत. काही कामगारांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले तर हसनअली (वय २४), मोहबुद्दीन अब्दूल शेख (वय २७), दुलाल शेख (वय ३७), आणि इस्ताफ शेख (वय २०) या जखमी चार कामगारांना ठाणे सिव्हील रूग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी हसनअली आणि मोहबुद्दीन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सायन रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर उर्वरित मोहमद रॉयल शेख (२१), जमाल शेख (५०), मनीरूद्दीन शेख (२७) या चौघांना या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हे सगळे नाका कामगार आहेत.

- Advertisement -

दुलाल शेख आणि इस्ताफ या दोन कामगारांवर सिव्हील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुलाल शेख याचा इथल्या कामाचा दुसरा दिवस होता, तर इस्ताफचा पहिला दिवस होता. कंत्राटदाराकडून त्या कामगारांना सेफटी बेल्ट अथवा कॅप अशी कोणतीच सुविधा पुरविण्यात आली नव्हती. ते काय असते, असा उलट प्रश्न त्या कामगारांनी विचारला. त्यांना या गोष्टीची माहितीही नाही. दुलाल शेख हात फ्रॅक्चर झाला आहे. तर इस्ताफच्या कमरेला दुखापत झाली आहे. दुलार हा पश्चिम बंगाल येथे राहणार आहे. त्याला पत्नी आणि तीन मुले आहेत. दोन पैसे जास्त मिळतील या आशेने तो ३ नोव्हेंबरला मुंबईत आला. गेल्या दोन दिवसांपासून तो या साईटवर कामाला येत आहे.

परात तुटल्याने खाली कोसळल्याचे दुलार याने सांगितले. एका कंत्राटदाराने त्याला कामावर आणले असे दुलार याने सांगितले. इस्ताफ हा झारखंड येथे राहणार असून त्याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले आहे. महिनाभरापूर्वीच तो मुंबईत कामाला आला आहे. या साईटवर त्याच्या कामाचा पहिलाच दिवस होता. त्याच्या कमरेला मुका मार लागला आहे. हा प्रकार समजताच दुलाल शेख याचे नातेवाईक फतीसुल आणि इस्ताफचे नातेवाईक मसीदुलारी यांनी रूग्णालयात धाव घेतली. हे दोघेही नातेवाईक चर्नीरोड येथे कामावर होते. जखमी कामगारांचा सर्व खर्च कंत्राटदार करणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. नाका कामगाराला दररोज सहाशे रूपये हजेरी मिळते. काही कामगार हे अनेक दिवसांपासून कंत्राटदाराकडे काम करीत आहेत.

- Advertisement -

परातीची दोरी कुजली होती

बाळकूम परिसरातील रूणवाल गार्डन सिटी या १८ मजल्याच्या इमारतीच्या रंगकामासाठी ही लाकडी बांबूची परात बांधण्यात आली होती. वर्षभरापासून ही परात बांधून ठेवली हेाती अशी माहितीही उजेडात येत आहे. आम्ही बांबू सोडण्यासाठी चढलो, त्यावेळी बांबूला बांधण्यात आलेल्या दोरी सडलेल्या होत्या, असे दुलार या कामगाराने सांगितले. दादा कुंभार नामक कंत्राटदार आहे. या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा सिध्द होईल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रत्येक नाका कामगारांना सुरक्षिततेच्यादृष्टीने सेफ्टी बेल्ट, कॅप देणे गरजेचे आहे. पण कंत्राटदार अथवा विकासकांकडून नाका कामगारांना कोणतीही सुरक्षितता दिली जात नाही. नाका कामगार जीव धोक्यात घालूनच काम करीत असतात. बांबूची परात (काथ्या) रस्सीने बांधली जाते. ही नारळाच्या काथ्याची असतो. हा काथ्या दोन वेळा पाण्यात भिजला तर कुजतो आणि तुटतो. बांबूची रस्सी कमकुवत झाल्याने ही परात तुटली असेल तर संबधित कंत्राटदार अथवा जो कोण विकासक असेल त्यांचा निष्काळजीपणा व हलगर्जीपणा आहे.
-लक्ष्मण हजारे, अध्यक्ष राष्ट्रीय असंघटीत कामगार संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -