घरमुंबईUPSC : निकष बदलल्याने विद्यार्थांना फटका!

UPSC : निकष बदलल्याने विद्यार्थांना फटका!

Subscribe

- दोन वर्षांचा अनुभवही निरुपयोगी - भारतीय माहिती सेवा गट-ब पद परीक्षा - ७२ जागांसाठी मागविले होते अर्ज

केंद्रीय माहिती प्रसारण खात्याच्या भारतीय माहिती सेवा गट-ब पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अर्ज मागविण्यात आले होते. मात्र परीक्षेचे निकष डालवल्याने या पदासाठी तयारी करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा पुन्हा घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

भारतीय माहिती सेवा गट-ब (राजपत्रित) या पदाकरिता गेल्या वर्षी २०१७ ला मे महिन्यात पत्रकारितेचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडून एकूण ७२ जागांसाठी अर्ज मागिविण्यात आले होते. यामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, ओरिया, तामिळ, मलयालम, तेलगू, कन्नड, उर्दू, आसामी, पंजाबी, काश्मिरी, मणीपुरी या भाषांचा यामध्ये समावेश होता. जास्तीत जास्त अर्ज आले की स्पर्धा परीक्षेच्यामार्फत जागा भरण्यात येणार होत्या किंवा उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार होती. जाहिरात देताना आयोगाने पदासाठी पत्रकारितेचा दोन वर्षाचा अनुभव मागितला होता. त्यामुळे पदवीबरोबर पत्रकारितेत पदविका, पदवी किंवा स्नातकोत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना अर्ज करायचे होते. याशिवाय अशा उमेदवारांना पब्लिसिटी किंवा न्यूज एजन्सी, ऑटोनॉमस संस्था, सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात जनसंपर्क कामे, आरएनआयशी रजिस्टर्ड असलेल्या वृत्तपत्रात काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव मागितला होता. हे अर्ज ३० जून २०१७ पर्यंत मागविण्यात आले होते. त्यामुळे भारतीय माहिती सेवा परीक्षेसाठी देशभरातून ३ हजार उमेदवारांनी अर्ज केले.

- Advertisement -

मात्र आयोगाने अनुभव कमी असल्याचे सांगून काही उमेदवारांचे अर्ज नाकारले. तर अनेक उमेदवारांना त्यांचे अर्ज रद्द का झाले, याचे स्पष्टीकरणही आयोगाकडून मिळाले नाही. तर, फार मोजक्या उमेदवारांना जास्त अनुभव असल्याने त्यांनाच बोलविण्यात आले असल्याचे सूत्राने सांगितले. वरील पदाकरिता फक्त दोन वर्षाचा अनुभव मागण्यात आला होता. त्यामुळे जास्तीत जास्त अर्ज आले असतील तर अशावेळी स्पर्धा परीक्षेमार्फत उमेदवारांची चाचणी घ्यायला पाहिजे होती. त्यानंतर मुलाखत व त्यामधून आयोगाने या पदासाठी उमेदवाराची निवड करावयास हवी होती. याशिवाय जी यादी आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जारी केली आहे, ती कोणत्या निकषावर करण्यात आली. इतर उमेदवारांचे नाव सिलेक्शन किंवा रिजेक्शनमध्ये नाही, त्यांचे काय झाले, यावरही आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी उमेदवार करत आहेत.

स्पर्धा परीक्षा घ्यावी  

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय माहिती सेवा परीक्षेकरिता निकष स्पष्ट करायला हवे होते. बहुतांश उमेदवारांचे नाव हे सिलेक्शन किंवा रिजेक्शन यादीत नाही, त्यांचे काय झाले हा प्रश्न निर्माण झाला आहे. आयोगाने अशा पद्धतीने परीक्षार्थी उमेदवारांची दिशाभूल करू नये. योग्य निकष ठरवले असते तर असा गोंधळ झाला नसता. हे पद स्पर्धा परीक्षेमार्फत भरण्यात यावे.
– निलेश राऊत, परीक्षार्थी, मुंबई.

- Advertisement -

संघ लोकसेवा आयोगाची सूची संशयास्पद

संघ लोकसेवा आयोगाने आतापर्यंत कधीही अशाप्रकारची विद्यार्थ्यांची दिशाभूल केली नाही. परंतु या पदासाठी राजकीय दबाव असू शकतो.अशाप्रकारे अचानक निकष बदलणे हे उमेदवारांसाठी अन्यायकारक आहे. आम्ही जाहिरात आल्यानंतर परीक्षेच्या अभ्यासाला लागलो होतो. मात्र मोजक्याच पात्र उमेदवारांची लिस्ट जाहीर झाल्यामुळे आमचा हिरमोड झाला. आयोगाने हे निकष कसे काय लावून पात्र उमेदवारांची सूची जाहीर केली. हा प्रकार संशयास्पद वाटत आहे.
– प्रमोद गणवीर, परीक्षार्थी, नागपूर.

आयोगाने यावर पुनर्विचार करावा

केंद्रीय माहिती प्रसारण खात्याच्या भारतीय माहिती सेवा गट-ब पदासाठी जाहिरात आल्यानंतर आम्ही परीक्षेच्या अभ्यासाला लागलो होतो. आयोगाने पदासाठी पत्रकारितेचा दोन वर्षाचा अनुभव मागितला होता. मात्र आता अनुभव कमी असल्याचे सांगून काही उमेदवारांचे अर्ज नाकारले. त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. संघ लोकसेवा आयोगाने यावर पुनर्विचार करून यावर तोडगा काढावा. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
– सचिन पाटील, परीक्षार्थी, कोल्हापूर.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -