घरमुंबईराष्ट्रवादीला धक्का! नवी मुंबईतील ५२ नगरसेवक जाणार भाजपात

राष्ट्रवादीला धक्का! नवी मुंबईतील ५२ नगरसेवक जाणार भाजपात

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे तब्बल ५२ नगरसेवक भाजपात जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आता नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील भाजपच्या वाटेवर जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अडचणींमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे तब्बल ५२ नगरसेवक भाजपात जाणार आहेत. आज, सोमवारी झालेल्या बैठकीत ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक भाजपात जाणार की नाही हा सस्पेन्स कायम आहे. मात्र ५२ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि त्यांच्या पाठोपाठ महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून चित्रा वाघ लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ही आऊटगोईंग राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

गणेश नाईकही जाणार भाजपात?

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार यावर सोशल मीडियावर तर्क वितर्क लावले जात असतानाच पुन्हा एका नवीन चर्चेला उधाण आले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी गणेश नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांचा वाढदिवस असून ते त्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चाही जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळामध्ये पक्षांतराची नवी चर्चा सुरू झाली आहे. जर राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपात गेले तर नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाईल. दरम्यान, गणेश नाईक आता काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनी बैठकीमध्ये एकमुखाने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -