घरमुंबईतटकरेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप सरसावले!

तटकरेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप सरसावले!

Subscribe

विजय बाबर

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आपल्या हातात ठेवणार्‍या सुनील तटकरे यांचा रायगड जिल्ह्यातील राजकारणावर सुरुवातीपासूनच वरचष्मा राहिला आहे, जिल्ह्यात राष्ट्रवादीची हवी त्या प्रमाणात वाढ झाली नसली तरी सत्तास्थाने मात्र कायम तटकरे कुटुंबात राहिली आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर तटकरे यांची ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असतानाच शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षा (शेकाप) नेही बाह्या सरसावल्या आहेत. हे तिन्ही पक्ष नव्या ‘इंडिया’ आघाडीत एकत्रित असल्याने तटकरे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहू शकते.

- Advertisement -

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. सध्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर तटकरे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसोबत तटकरे यांच्यावरही सिंचन घोटाळ्यातील कारवाईची टांगती तलवार होती, मात्र भाजपसोबत गेल्याने त्यांना क्लीन चिट मिळू शकते. या पार्श्वभूमीवर तटकरे यांची जिल्ह्यातील ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांनी जोरदार कंबर कसली आहे.

त्यासाठी शरद पवारांनी आपले नातू आमदार रोहित पवार यांच्यावर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यातच शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीदेखील ‘इंडिया’ आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने रायगडात तटकरेंना कडवे आव्हान मिळणार आहे. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यानुसार, त्यांनी तयारीही सुरू केली आहे. राष्ट्रवादी आणि शेकापच्या मदतीने ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतील, असे बोलले जात आहे.

- Advertisement -

मागील लोकसभा निवडणुकीत गीते यांनी रायगडमधून सुनील तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गीते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, पण आता ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यानुसार, रायगडसह मुंबईमध्ये पक्षाचे मेळावे घेत कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये त्यांनी या महिन्यात मेळाव्यांचे नियोजन केले आहे. रायगड मतदारसंघात शेकापची ताकद आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाबरोबर बंडखोरी केली असली तरी कार्यकर्ते आणि मतदार अजूनही पक्षाबरोबर एकनिष्ठ असल्याचा दावा केला जात आहे. त्याचा फायदा मूळ पक्षांना झाल्यास तटकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.

आपले काका अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या विरोधात भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रोखठोक सवाल करणारे रोहित पवार यांचा राष्ट्रवादीतील भाव चांगलाच वधारला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्यावरच तटकरे कुटुंबीयांना रोखण्यासाठी मोठी जबाबदारी सोपविली आहे.

तटकरेंची घराणेशाही
राष्ट्रवादीची ताकद सुरुवातीपासूनच आपल्या हातात ठेवणार्‍या सुनील तटकरे यांचा रायगड जिल्ह्यातील राजकारणावर अनेक वर्षे वरचष्मा राहिला आहे. सत्तास्थाने तटकरे कुटुंबीयांच्या हातात कशी राहतील याची त्यांनी नेहमी काळजी घेतलेली दिसते. सुनील तटकरे स्वतः खासदार असून त्यांच्या कन्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत, तर पुत्र अनिकेत तटकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्येदेखील जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार असूनही आदिती तटकरे यांना मंत्रिपद आणि शिवसेनेच्या आमदारांचा कड़वा विरोध असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. भाजपचे दिल्लीतील नेते काँग्रेस, राष्ट्रवादीतील घराणेशाहीवर आसूड ओढत असतात, मात्र भाजपशी मिळतेजुळते घेतल्यानंतर हाच भाजप तटकरेंच्या घराणेशाहीवर काय भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्याचा प्रश्न विचारला जात आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर रोहित पवार यांनी तटकरे कुटुंबाला मिळालेल्या सत्तास्थानांचा उल्लेख करत जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता थेट रायगड प्रभारी म्हणून जबाबदारी आल्याने आगामी काळात पवार विरुद्ध तटकरे असे चित्र पहायला मिळणार आहे. आता रोहित पवारांची जोड मिळाल्याने जिल्ह्यातील तटकरे विरोधी आघाडी मजबूत होईल, असे बोलले जात आहे.

शेकापही मैदानात
तटकरेंच्या स्वार्थी आणि कुरघोडीच्या राजकारणात दुखावलेले शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी यापूर्वीच शरद पवार गटाला पाठिंबा दिला होता आता ‘इंडिया’ या भाजपविरोधी आघाडीला देखील आपला पाठिंबा दिल्याने ते तटकरेंना रोखण्यासाठी चांगलीच कंबर कसतील अशी चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -