घरमहाराष्ट्रलाठीचार्जनंतर राजकारण ‘चार्ज’! शरद पवार, उद्धव ठाकरेंसह दोन्ही राजेंची आंदोलकांशी चर्चा

लाठीचार्जनंतर राजकारण ‘चार्ज’! शरद पवार, उद्धव ठाकरेंसह दोन्ही राजेंची आंदोलकांशी चर्चा

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात येणार्‍या उपोषणादरम्यान शुक्रवारी जालन्यात पोलिसांकडून आंदोलकांकडून लाठीचार्ज झाल्याच्या घटनेनंतर समाजकारणासह राजकारणही कमालीचे चार्ज झाले आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि गोळीबारासारखे प्रकार घडल्याचा आरोप करत मराठा समाजाने सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सरकारविरोधात मराठा समाज पेटून उठला असून शनिवारी राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने, निदर्शने, सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणे, रास्ता रोको करण्यात आला.

एकीकडे समाजकारणात या प्रकाराचे संतप्त पडसाद उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आदी राजकीय मंडळींनी शनिवारी घटनास्थळी जावून आंदोलकांशी चर्चा केली. या प्रकरणासाठी सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली, तर विरोधक या मुद्यावरून दिशाभूल करत असून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रत्युत्तर सत्ताधार्‍यांकडून देण्यात आले. एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधकांच्या या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर लाठीचार्जवरून राजकारण ‘चार्ज’ झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

लाठीचार्जच्या ३ मोठ्या घटनांमुळे सरकार अडचणीत येण्याची चिन्हे

 जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याला आगामी लोकसभा निवडणुकांची किनार असल्याने या फैरींची धार आणखी तीव्र झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत घडलेल्या अशा लाठीचार्जच्या ३ मोठ्या घटनांमुळे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा ३ पक्षांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आधी जूनमध्ये पोलिसांनी आळंदी येथे वारकर्‍यांवर लाठीचार्ज केला होता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पोलीस आणि वारकरी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर वारकर्‍यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मंदिर व्यवस्थापनाने केवळ मानाच्या पालख्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वारकरी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली, असे सांगण्यात आले. तर त्याच्याही आधी एप्रिल महिन्यात कोकणातील रिफायनरी प्रकल्पाविरोधातही आंदोलनाचा भडका उडाला होता.

- Advertisement -

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करीत पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपले आंदोलन तीव्र केले होते. त्यामुळे राज्य शासनाकडून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. २८ एप्रिल २०२३ रोजी मोर्चा काढू पाहणार्‍या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात काही आंदोलक जखमी झाले होते.

कोल्हापूर, मुंबईतही लाठीचार्जच्या घटना
जूनमधील शिवराज्याभिषेक दिनी व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो ठेवल्यावरून वातावारण तापले होते. या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून एकत्र येत मोर्चा काढण्यात आला, पण या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. मुंबईत ऑक्टोबर महिन्यात विविध मागण्यांसाठी सांताक्रूझ बस डेपोमधील कंत्राटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका या कर्मचार्‍यांनी घेतली होती. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज तसेच त्यांची धरपकडही केली होती.

मराठा संघटनांकडून आज नाशिक बंदची हाक
मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी बिग्रेडच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानकाजवळ शनिवारी शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन केले. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शिवाजी महाराज पुतळ्यानंतर मेहेर सिग्नल परिसरात मोर्चा वळविला. या ठिकाणी मोर्चेकर्‍यांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांकडून टायर जप्त केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

मराठा आमदारांनी आरक्षणाचा आग्रह धरावा, तसेच जालन्यातील घटनेमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. नाशिकरोड येथील शिवाजी महाराज पुतळा चौक येथे महाविकास आघाडीच्या वतीने सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी शिवसेना उपनेते बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू असताना टरबूज फोडण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तर आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे.

दादर प्लाझा येथे आज मराठा समाजाचे आंदोलन
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत दादर प्लाझा येथे रविवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. याबाबत पार पडलेल्या बैठकीत मराठा समाजाचे नेतृत्व निवडण्यावर भर देण्याचे ठरले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली. मराठा समाजाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
मी सर्वसामान्य मराठा शेतकर्‍याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. मला समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणार्‍यांपासून सावध राहावे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एका बाजूने चर्चा, दुसर्‍या बाजूने लाठीहल्ला
शिंदे सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे आंदोलन सुरु झाले, मात्र आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुसकावून लावले. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलनस्थळी आले. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली तर दुसर्‍या बाजूने लाठीहल्ला केला. आंदोलकांना माझा सल्ला आहे की त्यांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावे कारण हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. चर्चा सुरू असताना असा बळाचा गैरवापर करणे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष बघितले नाही तेव्हा मुख्यमंत्री यांनी लक्ष द्यावे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मराठा, धनगर आरक्षणासाठी वटहुकूम काढा
दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मनाविरोधात गेला म्हणून केंद्र सरकारने तोच निर्णय संसदेत बहुमताच्या आधारे फिरवून दिल्लीवर कब्जा मिळवला. अगदी त्याचप्रमाणे संसदेने बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगर, ओबीसी… आदी सगळ्यांना आरक्षण मिळवून द्या, सर्वांना न्याय द्या. सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस असे वागूच शकत नाहीत. कोरोना काळात जीवाची बाजी लावून ज्या पोलिसांनी महाराष्ट्र वाचविला ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात का?
-उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)

घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणार्‍या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासीयांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या भावनांशी सहमत असून शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री

आंदोलकांची चूक नाही, सरकार चुकले!
जालना येथील घटनेत आंदोलकांची कोणतीही चूक नाही, चूक झाली ती राज्य सरकारची. उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो. जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे, पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचे विस्कटलेले राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे.
– राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

सरकारच्या आदेशानेच मराठा समाजावर लाठीचार्ज
इंडियाच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आरक्षणाची मागणी करणार्‍या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. हा लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाला. देशभरातील महत्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये यासाठी भाजपने जालन्याची घटना घडवून आणली. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, हे सर्व सत्तेतील हुकूमशाही व्यवस्थेचा परिणाम आहे. सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस एवढे धाडस करणार नाहीत.
– नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

घटनेची चौकशी झाली पाहिजे
देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे 60 मोर्चे निघाले, पण एकदाही शांतता भंग झाला नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले नाही. कुठे गालबोटही लागले नाही, पण शुक्रवारी या आंदोलनाला गालबोट लागले. त्यामुळे या झालेल्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. या घटनेवरून कुणीही राजकारण करू नये. आंदोलक व जखमींना भेटण्यासाठी येणार्‍यांनी अवश्य यावे, पण राजकारण करू नये.
– चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -