घरमुंबईआघाडीत कसलेही मतभेद नाहीत

आघाडीत कसलेही मतभेद नाहीत

Subscribe

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्पष्टीकरण, मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार

महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केला. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

अदानी प्रकरणातील संयुक्त संसदीय समिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी, छत्रपती संभाजीनगरमधील सभेला नाना पटोले यांनी फिरवलेली पाठ आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत आलबेल नसल्याची चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना पटोले यांनी आघाडीत कुरबुरी असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

- Advertisement -

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही. आघाडीतील नेते एकमेकांना भेटत असतात, त्याप्रमाणे ही भेट झाली आहे. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे असा कोण काढत असेल तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीत सुसुत्रता आहे. आजही आमची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होत असते. महाविकास आघाडी भक्कम आहे. त्याची भीती विरोधी पक्षांना वाटत आहे. म्हणूनच आघाडीची नागपूरची १६ तारखेची सभा होऊ नये म्हणून भाजप त्यांच्या एका आमदाराला पुढे करुन विरोध करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. पण कोणी कितीही अडथळे आणले तरी महाविकास आघाडीची नागपुरातील वज्रमूठ सभा तर होणार आहे त्याचबरोबर अमरावती, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि मुंबई येथेही सभा होतील, असे पटोले म्हणाले.

काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा मुंबई भेटीचा कोणताही अधिकृत कार्यक्रम आमच्याकडे आलेला नाही. परंतु ते मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना भेटणार असतीत तर त्यात वावगे काय? असा सवालही नाना पटोले यांनी केला.

- Advertisement -

निवडणुकीसाठी काँग्रेसची समन्वय समिती
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने निवडणूक समन्वय समिती गठीत केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या १७ सदस्यांच्या या समितीत विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. समन्वय समितीत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -