घरमुंबईअकरावी प्रवेशाकडे एक लाख विद्यार्थ्यांची पाठ

अकरावी प्रवेशाकडे एक लाख विद्यार्थ्यांची पाठ

Subscribe

मुंबईतून 72 हजार तर नाशिकमधून 6647 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले

पहिल्या फेरीमध्ये प्रवेश मिळूनही पहिल्या पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने राज्यातील तब्बल 1 लाख 13 हजार 794 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये मुंबई विभागातील तब्बल 72 हजार 361 विद्यार्थ्यांनी तर नाशिक विभागातील 6647 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. पहिल्या पंसतीचे कॉलेज मिळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी दुसर्‍या यादीची प्रतिक्षा कायम ठेवली आहे. मुंबई विभागामध्ये 1 लाख 34 हजार 667 विद्यार्थ्यांपैकी 61 हजार 645 विद्यार्थ्यांनी तर नाशिक विभागात 14 हजार 845 विद्यार्थ्यांपैकी 8170 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

अकरावी प्रवेशाची पहिली यादी 12 जुलैला जाहीर झाली. यामध्ये राज्यभरातून यंदा तब्बल 2 लाख 34 हजार 351 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. परंतु पहिल्या पंसतीचे कॉलेज मिळाले नाही म्हणून तब्बल 1 लाख 13 हजार 794 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. तर फक्त 1 लाख 19 हजार 803 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागातून यंदा 1 लाख 85 हजार 318 अर्ज आले होते. पहिल्या यादीत तब्बल 1 लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. त्यापैकी 72 हजार 361 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. तर 373 विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणास्तव कॉलेजांकडून रद्द करण्यात आले. 88 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरवण्यात आले. नाशिकमध्येही 14 हजार 845 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील 6647 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. निम्याहून अधिक विद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालय दुसर्‍या यादीत मिळेल या आशेने प्रवेश नाकारले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीतील अकरावीच्या प्रवेशाकडे पाठ फिरवल्याने दुसर्‍या यादीसाठी आता मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत संधी मिळाली नाही व ज्यांनी दुसर्‍या पसंतीचे कॉलेज मिळाल्याने प्रवेश नाकारला आहे, अशा विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश मिळण्याची संधी आहे.

- Advertisement -

प्रवेशासाठी सायंकाळपर्यंत मुदत
प्रवेशासाठी तीन दिवसांची मुदत देऊनही अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाही. त्यामुळे मंगळवारी प्रवेश घेण्याची वेळ दुपारी 3 वाजताची होती. अपुर्‍या प्रवेशामुळे कॉलेजांना ही वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढवून दिली होती. त्यामुळे मंगळवारी 3 ते 6 वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी संकेतस्थळ सुरु ठेवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -