घरमहाराष्ट्रआंबेडकरी चळवळीची मोठी हानी

आंबेडकरी चळवळीची मोठी हानी

Subscribe

दलित पँथर चळवळीच्या काळात एकदा राजा ढाले आणि मी एका व्याख्यानासाठी परळ हिंदमाता परिसरात गेलो होतो. व्याख्यान हे हिंदमाता परिसरात अपना बाझार परिसरात इमारतीच्या गच्चीवर होते. भाषणाच्या ओघातच राजा ढाले यांनी एक वक्तव्य केले त्यामुळे आमची व्याख्यान संपल्यानंतर मोठी पंचायत निर्माण झाली होती. या व्याख्याना दरम्यान रामाच्या निमित्ताने एक चिकित्सा झाली होती की, राम एवढा लहान वयाचा, तर रावण एवढा बलवान. पण रावण शिवधनुष्य पेलू शकला नाही, असे वक्तव्य राजा ढाले यांनी व्याख्याना दरम्यान केले. त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या.

व्याख्यान संपवून आम्ही खाली आल्यानंतर आमच्या दोघांवरही प्रचंड दगडफेक सुरू झाली. त्यानंतर आम्ही हिंदमाताच्या समोरच्या इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो. इराणी हॉटेलचा मालक आमच्या ओळखीचा होता. त्यामुळे सर्व वातावरण निवळण्याची आम्ही वाट पाहिली. सर्व वातावरण शांत झाले आहे, याची खात्री झाल्यानंतरच आम्ही इराणी हॉटेलमधून बाहेर पडलो. मी दयानंद कॉलेजमध्ये होतो. कॉलेज संपले की आम्ही इराणी रेस्टॉरन्टला नेहमीच जायचो. पण इराणी मालकाशी असणार्‍या ओळखीमुळे आम्ही तिथून सुखरूप सुटलो.

- Advertisement -

चळवळीच्या काळात अत्याचार व्हायचे तेव्हा तरूण मराठी लेखकांनी मिळून एक फतवा काढला होता. मी, नामदेव ढसाळ आणि राजा ढाले बाबुराव बागुलांकडे गेलो होतो. आमची लेखकांची मागणी होती की आम्हाला शस्त्र द्या. पण बाबुराव बागुलांची भूमिका होती की कशाला शस्त्राचा वापर करायचा ? आपण लोकशाही मार्गाचा स्विकार केला आहे अशी. पण राजा ढाले यांनीच बाबुराव बागुलांना त्यांचीच एक कविता वाचून दाखवली. त्या कवितेतील संदर्भ विचारत तुम्ही कवितेत असे का लिहिले असा सवाल केला.

बाबुराव बागुलांच्या कवितेत असे होत की
यांनी चूक केली इथे जन्म घेण्याची
त्यांनी ती सुधारली पाहिजे
देश सोडून अथवा भीषण युद्ध करून

- Advertisement -

बाबुराव बागुलांच्या याच कवितेच्या ओळीचा संदर्भ घेत युद्ध कशाला असा सवाल राजा ढाले यांनी बागुलांना केला होता. मग सही का करत नाही ? असेही ढाले यांनी बागुलांना यावेळी विचारले.

आज राजा ढाले यांच्या निधनाची बातमी ऐकून खरच वाईट वाटले. अतिशय वाईट झाले. पँथरच्या चळवळीतील एक मोठा नेता आज हरपला. समाजातील विविध विषय मांडत अनेक मासिकाच्या निमित्ताने चळवळ उभी करणारा , आंबेडकरी साहित्याचा व्यासंगी, अभ्यासू विचारवंत असा नेता गेला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी आपल्या मासिकाच्या माध्यमातून प्रस्थापित साहित्याविरोधात बंड उभे केले. नंतर दलित पँथरच्या काळामध्ये त्यांनी अनेक तरूणांना चेतना दिली. तरूणांना त्या काळात निर्भिडपणे अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची त्यांनी ताकद दिली. दलित पँथरच्या चळवळीनंतर त्यांनी साहित्य क्षेत्रातही मोठी कामगिरी केली हे विशेष. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. – अर्जुन डांगळे,प्रख्यात दलित साहित्यिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -