घरमुंबईएसटी महामंडळाकडून विनाअपघात सुरक्षितता मोहिमेचे आयोजन

एसटी महामंडळाकडून विनाअपघात सुरक्षितता मोहिमेचे आयोजन

Subscribe

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, असे ब्रीदवाक्य असणार्या एसटी महामंडळाने १० ते २५ जानेवारीपर्यंत विनाअपघात सुरक्षितता मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण व्हावा, कर्मचार्यांमध्ये सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे पनवेल एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. या मोहिमेअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल हेमांगिनी पाटील यांनी वाहन चालक – वाहकांना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल मोटार वाहन निरीक्षक अर्पणा चव्हाण, वरिष्ठ आगार व्यवस्थापक मो. प. वानखेडे, आगार व्यवस्थापक विलास गावडे, डी. के. म्हात्रे, सहाय्यक वाहक अधीक्षक, चालक – वाहक उपस्तित होते.

प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणारी आपली लाल डब्याची एसटी आता सुरक्षितता पंधरवडा साजरा करण्यासाठी प्रवासाला निघाली. रस्ते वाहतुकीला सुरक्षित प्रवास या अत्यंत महत्त्वाच्या घटकाची सर्वांना जाणीव रहावी, याहेतूने राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही विनाअपघात सुरक्षितता मोहिम राबवण्यात आली आहे. दरम्यान, देशभर सुरक्षितता पंधरवाडा साजरा होत असताना पनवेलमध्ये ही मोहिम राबविली जात आहे. चालकांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, समुपदेशन अशा विविध मार्गांनी अपघात विरहीत सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच सुरक्षित सेवा बजावणार्‍या चालकांना प्रोत्साहित करण्यासाठी रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे, सुरक्षित सेवेचे बिल्ले देऊन या सुरक्षित पंधरवाड्यात सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच २५ वर्षाच्या वर अपघात विरहीत सेवा देणार्‍या चालकांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

- Advertisement -

एसटीला अनेक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यात सर्वांत जास्त वेळा चालक-वाहकांना सामोरे जावे लागते. रस्ते खचणे, पूर येणे,पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद होणे, झाडे कोसळणे असे प्रकार जून आणि जुलै या महिन्यांत सर्वाधिक वेळा होतात. पहिल्या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने अचानक आपत्ती उद्भवते. पनवेल तालुक्यात प्रत्येक गावात एसटीची सेवा आहे. एखाद्या गावात आपत्ती उद्भवल्यास सरपंच,ग्रामपंचायत सदस्यांनी एसटीला सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीत. तत्पूर्वी सरपंचांनी संबंधित गावांतील संभाव्य धोकादायक ठिकाणांची माहिती एसटीकडे पाठवल्यास व्यवस्थेसाठी सोयीचे ठरेल. एखादा रस्ता खचल्यास, रस्त्यावर झाडे पडल्यास किंवा अन्य आपत्तीने वाहतूक खंडित होत असल्यास संबंधित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी ती माहिती आपत्ती नियंत्रण कक्ष अथवा एसटीच्या नियंत्रण कक्षाला दिल्यास पुढील कार्यवाही करणे शक्य होऊ शकते. त्यामुळे संबंधित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -