घरमुंबईरुग्णांनी ढासळलेल्या आत्मविश्वासाची विकेट काढली

रुग्णांनी ढासळलेल्या आत्मविश्वासाची विकेट काढली

Subscribe

अस्थिविकाराने त्रस्त या रुग्णांची ही जिद्द इतर अनेकांना उमेद देऊ शकते. क्रिकेटच्या सामन्याची मजा या रूग्णांनी अगदी मनापासून लुटली आणि ढासळलेल्या विश्वासाची विकेट काढली

ऑक्टोबर हा अस्थिविकार जागृती महिना समजला जातो. त्यामुळे अस्थिविकार असणाऱ्या रूग्णांसाठी मुंबईतील कोहिनूर हॉस्पिटलतर्फे बॉक्स क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यामध्ये ज्यांच्यावर ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया झाल्या अशा रूग्णांनी भाग घेतला होता. त्यांचा उत्साह पाहून एकप्रकाराने या अस्थिविकाराच्या रूग्णांनी ढासळलेल्या आत्मविश्वासाची विकेटच काढल्याचे पाहायला मिळाले. या रूग्णांबरोबरच हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारीदेखील सहभागी झाले होते.

रंजक ठरला सामना

केवळ ५-५ षटकांच्या या सामन्यात प्रत्येक संघात ८ रुग्ण, १ ऑर्थोपेडिक सर्जन आणि १ फिजिओथेरपिस्ट असा समावेश होता.  एकदा ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात आली की, साधारणपणे पूर्वीप्रमाणे हालचाल करता येत नाही असा समज आहे. मात्र या सामन्यामध्ये हा समज पूर्णतः पुसून काढल्याचं दिसून आलं. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही त्याच उत्साहामध्ये हे सर्व रूग्ण डॉक्टरांशी खेळले. मात्र हा खेळ खेळण्यापूर्वी डॉक्टरांच्या देखरेखीखाली खेळाचा सरावही या रूग्णांनी केला होता. चपळता कमी असली तरीही त्यांचा उत्साह तरूणांना लाजवेल असा होता. त्यामुळे हे अस्थिविकाराचे रूग्ण आहेत यावर विश्वास ठेवणेही अशक्य झाले होते. दरम्यान हा ५ षटकांचा सामना अतिशय रंजक ठरला.

- Advertisement -

काय होते खेळाडूंचे अनुभव

 “५७ व्या वर्षीच माझी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सहा महिन्यात बरीच मेहनत घेऊन मी बऱ्यापैकी चालू लागलो. त्यानंतर मी पूर्वीप्रमाणे ट्रेकिंग सुद्धा करू लागलो. आज इथे खेळताना मला अजिबात कठीण वाटले नाही.” असे  यावेळी अॅन्थनी डिसूझा यांनी नमूद केले. तर कंदारे दाम्पत्य उत्साहाने सांगत होते, की “आमचे दोघांचेही गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे, पण पहिल्यापासून आम्ही व्यवस्थित चालून फिरून आहोत. या खेळासाठी दोन दिवस सराव केला फक्त, त्यापलीकडे काही नाही तरी आज आत्मविश्वासाने खेळलो. खूप मस्त वाटतंय.”

डॉ. गुरविंदर यांनीही मांडले मत

गेली २१ वर्षे गुडघ्याच्या शस्त्रक्रिया करण्याचा तगडा अनुभव असलेले डॉ गुरविंदर यांनी स्पष्ट केले की “गुडघ्याच्या आजाराला हल्ली वयाचे बंधन नाही. तरुणांचे सांधेही वृद्धांच्या तोडीचे असू शकतात तसेच व्यवस्थित काळजी घेतली तर वृद्धांचे सांधेही तरुणांइतके सुदृढ असू शकतात. शस्त्रक्रिया तर मी अनेक वर्षे करतोय, त्यात फक्त एकदाच गुडघा पुन्हा बदलावा लागला आहे. अन्यथा शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी, व्यायाम केला तर कोहिनूरच्या रुग्णांना कधी फार त्रास झाला नाही. याचं श्रेय तज्ज्ञांच्या कौशल्या सोबतच पेशंटच्या जिद्दीलाही जातं.”

- Advertisement -

दरम्यान रुग्णांची सोय आणि सुरक्षितता ध्यानात घेऊन सामन्याच्या ठिकाणी रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका, अस्थिविकार तज्ज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट उपलब्ध होते, ज्यामुळे रुग्णांनी क्रिकेटचा बिनधास्त आनंद लुटला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -