घरमुंबईअर्णव यांच्याविरोधातील दावा मागे घेतला; तरीही परमबीर सिंग यांना दंड

अर्णव यांच्याविरोधातील दावा मागे घेतला; तरीही परमबीर सिंग यांना दंड

Subscribe

बदनामी केल्याचा आरोप करत परमबीर सिंग यांनी ९० लाख रुपये व त्यावर १२ टक्के व्याज, असा दावा गोस्वामी यांच्याविरोधात दाखल केला होता. हा दावा सिंग यांनी बिनशर्त मागे घेतला. मात्र या दाव्यामुळे गोस्वामी यांना खटल्यासाठी वकील नेमावा लागला. त्यामुळे सिंग यांना दिड हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा बुधवारी मागे घेतला. नगर दिवाणी न्यायालयाने परमबीर सिंग यांना दिड हजार रुपायांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम गोस्वामी यांना मिळणार आहे.

बदनामी केल्याचा आरोप करत परमबीर सिंग यांनी ९० लाख रुपये व त्यावर १२ टक्के व्याज, असा दावा गोस्वामी यांच्याविरोधात दाखल केला होता. हा दावा सिंग यांनी बिनशर्त मागे घेतला. मात्र या दाव्यामुळे गोस्वामी यांना खटल्यासाठी वकील नेमावा लागला. त्यामुळे सिंग यांना दिड हजार रुपयांचा दंड ठोठावला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

या दाव्याला गोस्वामी यांनी विरोध केला होता. मुळात सिंग हे निवृत्त पोलीस आयुक्त आहेत. आरोपी सचिन वाझे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून कामे करायचा असे सिंग यांनीच सक्तवसुली संचलनालयाला सांगितले होते. त्यामुळे त्यांची बदनामी करण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तिवाद गोस्वामी यांच्यावतीने करण्यात आला होता.

अखेर सिंग यांनी हा दावा मागे घेत असल्याचा अर्ज न्यायालयात केला. बुधवारी या अर्जावर सुनावणी झाली. हा दावा बिनशर्त मागे घेतला जात असल्याचे सिंग यांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर गोस्वामी यांचे वकील म्हणाले, आमची न्यायालयाबाहेर तडजोड झालेली नाही. सिंग यांना स्वतः दावा मागे घ्यायचा आहे. मात्र या दाव्यामुळे गोस्वामी यांना नाहक मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे सिंग यांना दंड ठोठवावा, अशी मागणी गोस्वामी यांच्याकडून करण्यात आली.

- Advertisement -

याला सिंग यांच्याकडून विरोध करण्यात आला. आम्ही तडजोड करत आहोत, असे अर्जात कोठेही म्हटलेले नाही. आम्ही बिनशर्त हा दावा घेत आहोत. आमचा दंडाच्या मागणीला विरोध आहे, असे सिंग यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले.

बिनशर्त मानहानीचा दावा मागे घेण्याचा अर्ज मंजूर केला जात आहे. तसेच सिंग यांना दिड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम गोस्वामी यांना द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -