घरमुंबईपनवेल महापौरपदासाठी राजकीय फिल्डिंग!

पनवेल महापौरपदासाठी राजकीय फिल्डिंग!

Subscribe

रामशेठ ठाकूर यांचा वरदस्त कोणाला?

पनवेल महपौरपदासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आपला प्रभाव दाखविण्यासाठी इच्छुकांचे समर्थक आता थेट रायगड जिल्ह्यातील भाजपचे सर्वेसर्वा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करू लागले आहेत. पनवेल महापौरपदाच्या फिल्डिंगमध्ये खारघर अग्रेसर आहे. मात्र, भाजप नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा वरदस्त कोणाला ? यावर पनवेल महापौर पदाच्या इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. पनवेलच्या पहिल्याच निवडणुकीत 78 नगरसेवकांपैकी 51 नगरसेवक जिंकून आणून भाजपने माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवला. पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा मान डॉ. कविता चौतमल यांना मिळाला. 1 डिसेंबर 2019 रोजी पनवेल महापालिका महापौर पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असून पुढील अडीच वर्षासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपद राखीव झाले आहेत.

- Advertisement -

महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून खारघरमधील इच्छुक नगरसेविकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. पहिली संधी पनवेलला दिली आता दुसरी संधी खारघरला द्या, अशी जोरदार मागणी होत आहे. खारघर मधून नगरसेविका असलेल्या भाजपच्या खारघर शहर अध्यक्षा लीना अर्जुन गरड, भाजपचे रायगड जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम यांच्या पत्नी संजना कदम आणि भाजप खारघर शहर सरचिटणीस किरण पाटील यांच्या पत्नी नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असून महपौरपदासाठीच्या इच्छुकांमध्ये यांची नावे पुढे आहेत. महापौरपदाची अडीच वर्ष पूर्ण होऊन एक महिना होऊन गेला तरी पक्षाकडून कोणत्याही प्रकारे हालचाली होत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
खारघरमधून नगरसेविका लीना गरड आणि नगरसेविका संजना कदम यांच्या समर्थकांनी थेट रामशेठ ठाकूर यांचा पनवेल येथील बंगला गाठून आपल्या उमेदवारासाठी महापौरपदाची मागणी केली आहे. त्यामुळे पनवेल महापौरपदाची निवड आता रंगतदार झाली आहे. शेवटी , माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पक्षाकडे कोणाची शिफारस करतात, यावर सगळे गणित अवलंबून आहे.

रायगड आणि खारघर भाजपचे जुने आणि खंदे कार्यकर्ते म्हणून समीर कदम यांची ख्याती आहे. मागील 25 वर्षांपासून ते भाजपात सक्रिय आहेत. पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत खारघर प्रभाग सहामधून समीर कदम यांच्या पत्नी संजना कदम निवडून आल्या आहेत. पनवेल मधील भाजपचे सध्याचे सर्वेसर्वा रामशेठ ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाअगोदर पनवेल आणि रायगड भाजपची धुरा बाळासाहेब पाटील यांच्याकडे होती. भाजपचे निष्ठावंत , पनवेलचे भूमीपुत्र आणि खारघरवासी म्हणून संजना कदम यांचे नाव देखील प्रभावी ठरत आहेत. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या भाजप खारघर महिला शहर अध्यक्षा लीना गरड यांचा मागील राजकीय प्रभाव वाढला आहे.

- Advertisement -

नगरसेविका नेत्रा पाटील या तळागाळातील जनतेशी जोडलेल्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. भाजपचे सेक्रटरी किरण पाटील हे मागील 20 वर्षांपासून खारघरच्या राजकारणात सक्रिय आहेत. आता रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर खारघरला संधी देतात का, कि पुन्हा महापौर पदाचा मान पानवेलकडेच ठेवतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पनवेल महापौरपदासाठी दहा नगरसेविका इच्छुक असून अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे रामशेठ ठाकूर यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -